आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद- पर्यटकांना पर्यटन स्थळांसंबंधी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याच्या हेतूने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) सुरू केलेल्या प्रमाणित गाइड निवड कार्यक्रमातून विविध चाचण्या पार करत औरंगाबादेतून ४० जण पात्र ठरले. हे गाइड पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) वास्तू सोडून अन्य ठिकाणी सेवा देतील. औरंगाबादेत अशी ५० ते ६० ठिकाणे असल्याने गाइड्सना कमाईची चांगली संधी मिळणार आहे. १२ वर्षांच्या खंडानंतर एमटीडीसीने गाइड तयार करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
अनेक पर्यटन स्थळांवर गाइड नसल्याने पर्यटकांची गैरसोय होते. ही बाब ओळखून सन २००५ पर्यंत एमटीडीसीच्या वतीने गाइड प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जायचा. नंतर तो बंद पडला. एमटीडीसीने सप्टेंबर महिन्यात जाहिरात काढून अर्ज मागवले. मुंबईनंतर सर्वाधिक ६६ अर्ज औरंगाबाद विभागातून आले. यातून ६३ पात्र ठरले. ६१ उमेदवार १७ सप्टेंबरला लेखी परीक्षेला बसले. २२ सप्टेंबरला एमटीडीसीचे तत्कालीन वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे, पर्यटन अधिकारी विजय जाधव यांनी मुलाखती घेतल्या.
दहा दिवसांचे प्रशिक्षण :
४० जणांना प्राध्यापक अमित तिवारी, आयआयटीएम ग्वाल्हेरचे बरुआ, विद्यापीठाच्या पर्यटन प्रशासन विभागाचे संचालक राजेश रगडे, प्रा.डॉ. माधुरी सावंत यांनी प्रशिक्षण दिले. यशस्वी ४० उमेदवारांना ओळखपत्र व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नियंत्रण अधिकारी रवींद्र पवार, प्रादेशिक अधिकारी विजय जाधव आदींची उपस्थिती होती.
६० ठिकाणी पर्यटकांना देतील माहिती
निवड झालेले गाइड एएसआयच्या स्थळांव्यतिरिक्त अन्य ठिकाणांवर सेवा बजावतील. यासाठी एमटीडीसीने जिल्ह्यात अशी ५० ते ६० ठिकाणे निवडली आहेत. यात जायकवाडी धरण, आपेगाव, गौताळा, सिद्धार्थ उद्यान, शिवछत्रपती पुराणवस्तुसंग्रहालय आदींचा समावेश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.