आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौदा वर्षांनी भारतीय सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियात खेळले 100 पेक्षा अधिक चेंडू; मयंकचे अर्धशतक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- आपली पहिली कसोटी खेळत असलेल्या मयंक अग्रवालने (७६) शानदार अर्धशतक झळकावत टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी भारताने २ बाद २१५ धावा काढल्या. १४ वर्षांनी टीम इंडियाच्या सलामीवीराने ऑस्ट्रेलियात १०० पेक्षा अधिक चेंडू खेळले. यापूर्वी २००४ मध्ये आकाश चोपडा आणि वीरेंद्र सेहवागने सिडनीत २३५ चेंडूंचा सामना केला होता. चेतेश्वर पुजारा ६८ चेंडूंवर नाबाद अाहे. चार सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी आहे.
 
नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात टीम इंडियाने मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारी (८) यांना सलामीला पाठवले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११३ चेंडूंत ४० धावांची भागीदारी केली. या वर्षी भारताने सहा सलामी जोड्या कसोटीत उतरवल्या. विहारीला वेगवान गोलंदाज कमिन्सने बाउन्सरवर बाद केले. त्यानंतर मयंकने दुसऱ्या विकेटसाठी पुजारा (६८*) सोबत ८३ धावा जोडल्या. मयंकलादेखील कमिन्सनेच बाद केले. पुजाराने कर्णधार विराट कोहलीसोबत (४७*) नाबाद ९२ धावांची भागीदारी केली. पुजाराचे हे कसोटीतील २१ वे अर्धशतक ठरले. चालू मालिकेत त्याने आतापर्यंत एक शतक व दोन अर्धशतकांसह २९० धावा काढल्या. कोहली २२४ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.

 

८७ व्या षटकांत पेनकडून कोहलीला जीवनदान
पुजारा व कोहलीने भागीदारीदरम्यान २०० पेक्षा अधिक चेंडूंचा सामना केला. सामन्यात ८३ व्या षटकांत ८७ व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर पेनने स्टार्कच्या चेंडूवर कोहलीचा झेल सोडला. स्टार्क ऑफस्टम्पपासून बाहेर जाणारा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात होता. चेंडू बॅटची कड घेत यष्टीमागे गेला. डाव्या बाजूला पेनने झेप घेतली, मात्र, तो झेल घेऊ शकला नाही.   


आशियाबाहेर सलामीवीर म्हणून दुसरी सर्वोच्च खेळी
मयंक अग्रवालने ७६ धावा काढल्या. देशाबाहेर कोणत्याही भारतीय सलामीवीराची पदार्पणातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी सुधीर नायकने १९७४ मध्ये इंग्लंडविरुद्ध ७७ धावांची खेळी केली होती. आतापर्यंत चार सलामीवीर अाशियाबाहेर पदार्पणात अर्धशतक करू शकले आहेत. सुनील गावसकर व विनू मंकड यांनीदेखील अशी कामगिरी केली.


मेलबर्नची खेळपट्टी खराब नाही : अग्रवाल  
मयंकने म्हटले की, पहिल्या सामन्यात धावा करणे चांगले वाटत आहे. मी गेल्या काही दिवसांपासून चांगले प्रदर्शन करत आहे. आता मी या फाॅर्मला मालिकेत पुढे नेऊ इच्छितो. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज चांगल्या लाइनलेंथमध्ये गोलंदाजी करत आहेत. खेळपट्टीत कोणताही दोष नाही. सुरुवातीला खेळपट्टी थोडी मंद होती, जेवणानंतर त्यात वेग आला होता.
सामन्यात व्हिक्टोरियाचा पीटर हॅड्सकोम्बच्या स्थानावर अष्टपैलू मिशेल मार्शचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला. सामन्यापूर्वी फेसबुक पेज तयार करण्यात आले होते, ज्यात सामन्यादरम्यान चाहत्यांनी मार्शची खिल्ली उडवली. गोलंदाजीदरम्यान मार्शवर हुटिंग झाली. हेडने म्हटले की, मार्शची खिल्ली उडवणे ही चांगली गोष्ट नाही. त्याने चांगली गोलंदाजी केली, असे मला वाटते.

 

बातम्या आणखी आहेत...