politics / तब्बल १९ वर्षांनंतर शरद पवार आज जामखेडला 

नातू रोहित पवारसाठी जोरदार मोर्चेबांधणी 

दिव्य मराठी

Aug 19,2019 11:52:00 AM IST

जामखेड/अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तब्बल १९ वर्षांनंतर सोमवारी जामखेडला येत आहेत. निमित्त नागेश विद्यालयाच्या इमारतीचे उदघाटनाचे असले, तरी खरे कारण म्हणजे त्यांचे नातू रोहित जामखेड-कर्जत विधानसभा मतदारसंघातील इच्छूक उमेदवार आहेत. हा मतदारसंघ एकेकाळी पवारांचा बालेकिल्ला मानला जात असे. १९९५ च्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रेमानंद रूपवते यांच्या प्रचारार्थ पवार आले होते. त्यावेळी सभेत गोंधळ उडाला. तेव्हा भाजपचे सदाशिव लोखंडे विजयी झाले. त्यानंतर पवारांनी जामखेडकडे दुर्लक्ष केले. पक्षाची पिछेहाट होत हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मतदारसंघाचे प्रश्न घेऊन अजित पवारांकडे जात, त्यावेळी ते एकच सांगत अगोदर पक्षाचा आमदार निवडून आणा. त्यामुळे कार्यकर्ते घरचा रस्ता धरत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे कधी जमले नाही. दोन्ही काँग्रेसमधील दुफळीचा फायदा भाजपला झाला. आता शरद पवार यांचे नातू रोहित यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. दुष्काळात प्रत्येक गावांत त्यांनी टँकरने पाणी वाटप केले. अनेक कुटुंबातील मुला-मुलींना दत्तक घेतले. दुष्काळात जे दगावले, त्यांच्या कुटुंबीयांना मदत केली. खर्डा परिसरातील गितेबाबा मंदिर जीर्णोध्दारासाठी भरीव मदत केली. प्रत्येक गावात सप्ताहाचे आयोजन केले. शाळांमधील मुलींना सॅनिटरी नॅपकिन वाटले. रोहित पवार यांच्या मातुश्री सुनंदा पवार यांनी खेळ पैठणीचा कार्यक्रम घेऊन महिलांना सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध केले. विविध सामाजिक उपक्रमांमुळे रोहित पवार जनतेत सहभागी होत आहेत. पवार घराण्याचा नातू आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून निवडणूक एकतर्फी राहिलेली नाही. पक्षातील बंडोबांना कसे थंड करायचे हे शरद पवारांना पहावे लागेल. पार्थ पवार यांच्या पराभवामुळे आता ते ताकही फुंकून पिणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

X