आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेदारखेडा- नदीच्या काठावर गुरे चारण्यासाठी गेलेला शेतकरी डोहात पूर्णा नदीच्या डोहात बुडाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेला २४ तास उलटून गेले तरी अद्यापही संबंधीत शेतकऱ्याचा शोध लागलेला नाही. दरम्यान नदीची पाणीपातळी वाढल्याने रात्री ८ वाजता थांबवलेली शोधमोहिम आज सकाळी पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
भोकरदन तालुक्यातील मेसखेडा येथील वसंता शांतीलाल क्षिरसागर ( जैन) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ते केदारखेडा येथील पूर्णा नदीकाठावर गुरे चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी काही गुरे पाण्यात गेल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी वसंता जैन डाेहात उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते डोहात बुडाले. या घटनेची माहती मिळताच ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही.
दरम्यान महसूल व पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. त्यानुसार भोकरदन व जालना अग्निशमन दलाचे जवान दुपारी ३ वाजता तेथे दाखल झाले. त्यांनी शोधमोहिम सुरु केली मात्र त्यांचा शोध लागला नाही. दरम्यान नदीचे पाणी वाढत असल्याने रात्री आठ वाजेच्या सुमारास शोधमोहिम थांबविण्यात आली. दरम्यान शनिवारी सकाळी पुन्हा शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे. तहसीलदार योगिता कोल्हे स्वत: घटनास्थळी हजर आहेत.
तर केटीवेअरचे दरवाजे उघडणार...
नदीची पाणीपातळी वाढत असल्याने शोधमोहिमेत अडथळे येत आहेत. त्यामुळे घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करणार आहे. सध्या तरी नदीच्या पात्रात शोधमाेहिम सुरु करण्यात आली आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनीही मोठी गर्दी केली आहे.
वाळू उपशामुळे मोठे खड्डे...
भोकरदन तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात बेसुमार वाळूचा उपसा करण्यात येतो आहे. त्यामुळे पात्रात मोठ मोठे खड्डे पडले आहे. नदीला पाणी आल्याने या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वसंता क्षिरसागर हे डोहात बुडाल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.