आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३४६ दिवसांनंतर रासपचे आमदार रत्नाकर गुट्टेंना मिळाला जामीन

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

परभणी - शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलल्याप्रकरणी कारागृहात असलेले गंगाखेड शुगर्सचे सर्वेसर्वा व रासपचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना गुरुवारी (दि. ५) सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तब्बल ३४६ दिवस कारागृहात राहिलेले व कारागृहातूनच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले डॉ. गुट्टे यांना यानिमित्ताने दिलासा मिळाला आहे. राज्यभरात गाजलेल्या गंगाखेड शुगर्सच्या कर्ज प्रकरणात २६ मार्च २०१९ रोजी रत्नाकर गुट्टे यांना औरंगाबादच्या सीआयडी पथकाने अटक केली होती. तेव्हापासून त्यांना जामीन मिळाला नव्हता. ते कारागृहातच होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रासपकडून त्यांनी कारागृहातूनच संपूर्ण निवडणूक लढवत विजय संपादन करीत राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. गंगाखेड शुगर्सने २९ हजार शेतकऱ्यांच्या नावाने सहा बँकांकडून ३२८ कोटी रुपयांचे पीक कर्ज उचललेले होते. कारखान्याच्या संचालक मंडळाने व बँकांच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याचे शेअर्स घेतले होते व ऊस पुरवला होता, अशा शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलले होते. त्यावरून गुट्टे यांच्यावर ५ जुलै २०१७ रोजी गुन्हा दाखल झाला होता.  २८ फेब्रुवारी २०१९ रोजी कारखान्याच्या तीन प्रमुख अधिकाऱ्यांना सीआयडीने अटक केली होती. त्यानंतर २६ मार्च रोजी गुट्टे यांनाही सीआयडीने अटक करून गंगाखेडच्या कनिष्ठ न्यायालयात हजर केले होते.  तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत होते. यादरम्यान परभणी कारागृहात ते होते. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातूनही जामीन न मिळाल्याने गुट्टे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. गुरुवारी त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.

गंगाखेडमध्ये जल्लोष

आ. रत्नाकर गुट्टे यांना जामीन मंजूर झाल्याचे समजताच गुट्टे मित्रमंडळ व रासपच्या कार्यकर्त्यांनी गंगाखेड शहरात फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. मतदारसंघातील रखडलेली विकास कामे गतीने पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...