आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांत तेलंगानातील मेडिगट्टा कालेश्वर प्रकल्प पूर्णत्वाकडे पण चाळीस वर्षांनंतरही दुधना प्रकल्प पूर्ण हाेण्याची प्रतीक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - तेलंगणातील मेडिगट्टा कालेश्वर प्रकल्प अवघ्या तीन वर्षांत पूर्णत्वाकडे जात असताना मराठवाड्यातील दुधना प्रकल्प गेल्या चाळीस वर्षांपासून अजूनही पूर्ण झालेला नाही. १९७९ मध्ये २८ कोटींचे बांधकाम मूल्य असलेला हा प्रकल्प दिरंगाईमुळे २३४१ कोटींवर गेला आहे. गेल्या चार वर्षांत तीन वेळा या प्रकल्पाला नवीन डेडलाइन मिळाली  आहे. 


राज्यातल्या सर्वाधिक रखडलेला प्रकल्प म्हणून दुधनाची ओळख आहे. या धरणाची मूळ प्रशासकीय मान्यता ३० मे १९७९ रोजी २८ कोटी ४२ लाख रुपयांची होती. त्यानंतर १० ऑक्टोबर १९९९ राेजी ४७४ कोटी ०६ लाखांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर २१ जानेवारी २००८ १०२५ कोटी ७८ लाखांची दुसरी मान्यता मिळाली. तिसरी सुधारित मान्यता २३४१ कोटी ६७ लाख १३ ऑक्टोबर २०१६  राेजी मिळाली. आतापर्यंत या प्रकल्पावर  मे २०१९ अखेर २१८३ कोटी ७  लाख रुपये खर्च करण्यात येऊनही ताे अपूर्णच आहे.

 
१८ लाख हेक्टर सिंचन होणारा प्रकल्प तीन वर्षांत : मेडीगट्टा कालेश्वर या प्रकल्पाचे  भूमिपूजन २ मे २०१६ रोजी करण्यात आले. या प्रकल्पाची अंदाजपत्रकीय किंमत ८० हजार कोटी असूून १८ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पातील पाणी तेलंगणात नेण्यासाठी १५३९ किमीचे कालवे तयार करण्यात आले आहेत. यावर २० उपसा सिंचन योजना तयार केल्या आहेत, तर  दुधनाचे कालवे फक्त ११७ किमीचे असून अजूनही तीन किमीचे कालवे होणे बाकी आहेत.  दुधनामुळे  ५३ हजार हेक्टर सिंचन होणार आहे. २०१६ मध्ये पैसे मिळाल्यानंतर या प्रकल्पाला ३ वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.  दुधनाला पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे प्रकल्प रखडत गेला.
अशी वाढत गेली मुदत : दुधना प्रकल्पाच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रस्ताव पाठवला होता. त्याला औरंगाबादमध्ये अाॅक्टाेबर २०१६ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तब्बल दहा महिने मंजुरी न मिळाल्याने तर  सहा महिने वाळूपट्टयांचे लिलाव न झाल्यामुळे वाळू मिळाली नाही. 

 

परभणी जिल्ह्याला दिलासा देणारे धरण
दुधनाची क्षमता १२.१४ टीएमसी इतकी आहे. यावर्षी  दुष्काळात परिस्थिती गंभीर झाल्यामुळे मे महिन्यात दुधनातून पाणी सोडल्यामुळे परभणी शहराचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. दुधनाची एकूण सिंचन क्षमता ५३ हजार ३७९ हेक्टर आहे. परभणी आणि जालना जिल्ह्यातील ११६ गावांना याचा लाभ होतो.

 

मराठवाड्याकडे पाहण्याची गरज
तेलंगणाचा प्रकल्प राजकीय इच्छाशक्ती असल्यानंतर काय होवू शकते याचे उदाहरण आहे. मराठवाड्यातल्या सिंचन प्रकल्पांना कायम अपुरा निधी मिळाल्यामुळे मराठवाड्याचे प्रकल्प रखडले असून दुधना हे त्याचे उदाहरण आहे.नेत्यांनी इतक्या ताकदीची इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे. 
शंकरराव नागरे,जलतज्ञ

 

दुधना धरणाच्या कामात भूसंपादनाची अडचण निर्माण झाली होती. वाळू न मिळाल्यामुळे ६ महिने काम थांबले होते. मात्र आता कामाने गती घेतली आहे. मार्च २०२० पर्यत ही कामे करण्याची मुदत आहे.
अजय कोहीरकर, कार्यकारी संचालक, गोदावरी पाटबंधारे महामंडळ
 

बातम्या आणखी आहेत...