Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | After assurance of water supply Fasting stopped at Barshi

आश्वासनानंतर बार्शीतील पाणीप्रश्नी उपोषण थांबवले

प्रतिनिधी | Update - Aug 25, 2018, 10:05 AM IST

उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही खंडित पाणीपुरवठ्यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

  • After assurance of water supply Fasting stopped at Barshi

    बार्शी- उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही खंडित पाणीपुरवठ्यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या निषेधार्थ व पालिकेच्या कारभाराविरोधात येथील ज्येष्ठ नागरिक अप्पासाहेब पवार यांनी लाक्षणिक उपोषण केले. माजी आमदार राजेंद्र राऊत व नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी आंदोलनकर्ते पवार यांच्याशी चर्चा करून पाणीपुरवठ्यातील अडचणी व केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मुख्याधिकारी शिवाजी गवळी यांनीही पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत प्रयत्न करण्यात येत असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर पवार यांनी उपोषण थांबवले.


    या वेळी माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे, जलदाय अभियंता अजय होनखांबे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. कम्युनिस्ट नेते तानाजी ठोंबरे, पालिकेतील विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनीही या उपोषणास पाठिंबा दिला होता. मुख्याधिकारी यांनी पवार यांना लेखी आश्वासन दिले. शहराला उजनी व चांदणी या प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. परंतु चांदणी जलाशयातून पाणी संपल्यामुळे तेथून होणारा पाणीपुरवठा सध्या बंद आहे. तसेच कंदर, कुर्डुवाडी, बार्शी, चांदणी या ठिकाणांच्या पंपिंग स्टेशनला २४ तास वीजपुरवठा चालू असणे अपेक्षित आहे. मात्र, वीज मंडळाकडून तेथील वीजपुरवठा वारंवार खंडित केला जातो. त्यामुळे शहरातील पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरता येत नाहीत. याबाबत वीज मंडळाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. तसेच उजनी ते बार्शी दरम्यानची जलवाहिनी २० वर्षांपेक्षा जुनी आहे. अधूनमधून तिची गळती होते. या सर्व कारणांमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. आता वीजपुरवठ्यामध्ये सुधारणा झाली अाहे. सध्या दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. चांदणी जलाशयात पुरेसे पाणी आल्यास पाणीपुरवठ्यात आणखी सुधारणा होईल. त्यासाठी पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे.


    चार महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत
    चार महिन्यांहून अधिक काळापासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. एक दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा दोन दिवसांआड सुरू झाला. तरी तशी अधिकृत घोषणा पालिकेने केलेली नाही. काही भागात चार-चार दिवस पाणीपुरवठा होत नाही. खंडीत वीजपुरवठ्यामुळेच अडचणी येत असल्याचे पालिकेचे म्हणणे होते. यात सुधारणा होऊन पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित असताना अद्यापही विविध भागात पाण्याची ओरड आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. शुक्रवारी उपोषण सुरू केले होते.

Trending