आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सर असूनही रोज कार्यमग्न राहायचे पर्रीकर, मृत्यूपूर्वी एक तास आधीही ते कामाबद्दलच बोलत होते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निधनापूर्वी एक तास पर्रीकरांसोबत होत. गोवा विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र आर्लेकर

मी रविवारी दुपारी दीड वाजता पर्रीकरजींना भेटायला गेलो. प्रकृतीबद्दल विचारले तेव्हा ते कामाबद्दल बोलत राहिले. ते बोलू शकत नव्हते, तरीही प्रयत्न करत होते. तेव्हा मी तेथून निघून आलो. ऑफिसमध्ये पोहोचलो ना पोहोचलो तोच त्यांच्या निधनाची बातमी आली. मी तत्काळ पर्रीकरांचे घर गाठले. त्यांचे पार्थिव पाहून मला त्यांच्यासोबत घालवलेली ३० वर्षे आठवली. एक वर्षापूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे कळले. परंतु त्यांच्या कामावर परिणाम झाला नव्हता. उपचारांसाठी ते अमेरिकेत गेले तरी व्हीसीने ते काम पाहत. बैठका घेत. ते म्हणत, ‘मी आता पडून राहिलो तर आजारी पडेन. काम करत राहिले तर जगण्याची उमेद वाढते.’ म्हणूनच कदाचित ते कडक उन्हात एका पुलाची पाहणी करण्यासाठी आले होते. ऑफिसमध्ये ते येऊ शकत नव्हते तेव्हा घरूनच काम सांभाळत. मंत्रिमंडळाची बैठक घेत. त्यांचा साधेपणा एक आदर्श होता.

 

२००४च्या चित्रपट महोत्सवात पोलिसांसोबत वाहतूक नियंत्रण करताना घामाघूम झालेल्या पर्रीकरांना पाहून पाहुणेही आश्चर्यचकित झाले होते. त्यांची साधी राहणी एक आदर्श होती. मुलाच्या लग्नात पाहुणे सुटाबुटात होते आणि पर्रीकर एक हाफ शर्ट व साधी पँट, पायात सँडल अशा वेशात पाहुण्याची सेवा करत होते. ते १६-१८ तास काम करत. एकदा ओएसडी गिरिराज वरणेकरांसोबत मध्यरात्रीपर्यंत ते एका प्रकल्पाबद्दल चर्चा करत होते. निघताना वरणेकरांनी विचारले, उद्या किती वाजता येऊ? उत्तर होते, थोड्या वेळाने साडेसहा वाजता या. वरणेकर सव्वासहाला मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचले तेव्हा पर्रीकर सव्वापाचपासूनच फायली घेऊन बसलेले दिसले. 

बातम्या आणखी आहेत...