आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Controversial Statement Of Karnataka Navnirman Sena President Bhimashankar Patil Maharashtra Karnataka Bus Service Stopped

महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा बंद, कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर उमटले पडसाद

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

सांगली : 'महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला,' असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांच्याविराेधात मराठी भाषकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात अाहेत. पाटील यांचा निषेध म्हणून काेल्हापूरमध्ये मराठी भाषकांनी रविवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या प्रतिमेचे बसस्थानकासमाेर दहन केले.

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे शिवसैनिकांनी तिरडी माेर्चा काढत कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांतील बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.

काही दिवसांपूर्वी बेळगावात मराठी दुकानाच्या पाट्या फोडण्यात आल्या. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा इशारा कन्नड वेदिका संघटनेतर्फे दिला हाेता. या तणावाच्या पार्श्वभूमीवर नुकसान टाळण्यासाठी कोल्हापूर-सांगली ते कागल, निपाणी, बेळगाव, विजापूर, अथणी, रायबाग, बंगळुरू अशा मार्गांच्या बसेस शनिवारी रात्रीपासूनच बेळगाव आणि कोल्हापूर-सांगली स्थानकातच थांबवण्याचा निर्णय पाेलिस व एसटी महामंडळाने घेतला.

कानडिगांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा शनिवारी संध्याकाळी जाळला. त्याची प्रतिक्रिया तातडीने कोल्हापूर व सांगली येथे उमटली. युवा सेनेने कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या पुतळ्याचे दहन केले.

काेल्हापुरात कानडी चित्रपट बंद पाडला

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर शहरातील एका थिएटरमध्ये सुुरू असलेल्या कन्नड सिनेमाचे शो बंद पाडले. शिवसेनेने आक्रमक आंदोलन हाती घेतल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील परिस्थिती काहीशी तणावाची बनली आहे. कर्नाटका बँक तसेच उडप्यांच्या हॉटेलसमोर पोलिसांनी अधिक बंदोबस्त तैनात केला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...