आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांनी प्राशन केले विष, पण मुलीने धैर्याने सोडवला दहावी गणिताचा पेपर 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद - सततच्या दुष्काळामुळे शेतातील पीक आणि कुटुंब जगवताना आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याने  आयुष्यच संपवण्याचा निर्णय घेत विष प्राशन केले. बेशुद्धावस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच वेळी या शेतकऱ्याच्या लेकीला दहावीचा गणिताचा पेपर द्यायचा होता. वडिलांची प्रकृती नाजूक असताना या लेकीने मन कठोर करून पेपर दिला. पण घरी परतली तेव्हा वडील आयुष्याच्या लढाईत पराभूत झाल्याचा निरोप मिळाला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे कळाले.   गिरजाराम अंबादास काळे (वय ४८) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.  


खुलताबाद शहरातील मोठी आळी येथील रहिवासी  गिरजाराम अंबादास काळे हे सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास आपल्या सर्व्हे नंबर १२१ मधील शेतात गेले होते. सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांनी आपल्या जनावराचे दूध काढले.  त्यानंतर ते शेतातील जनावरांच्या गोठ्यालगत बेशुद्ध अवस्थेत पडलेले शेजारच्या एका शेतकऱ्यास दिसून आले.  या शेतकऱ्याने गिरजाराम काळे यांच्या  कुटुंबातील लोकांना माहिती दिल्यानंतर तत्काळ  गिरजाराम यांना खुलताबाद येथीलच शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तपासून घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे  गिरजाराम यांना  घाटीत हलवण्यात आले.  औरंगाबाद घाटीत उपचार सुरू असताना गिरजाराम यांची प्राणज्योत मालवली.  गिरजाराम यांच्या शेतात जनावराच्या गोठ्याशेजारी एक विषाची बाटली व त्यात थोडे विषही आढळून आले.   


मुलीची अस्वस्थता : काळे यांची मुलगी मोनिका आणि पुतण्या अतुल  हे दोघेही दहावीचे परीक्षार्थी आहे. सोमवारी त्यांचा गणिताचा पेपर होता. वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने मोनिकाच्या जिवाची घालमेल सुरू होती.  मुख्याध्यापक शिवाजी नीळ यांच्या वतीने क्रीडा शिक्षक राजेंद्र गंगावणे, चंद्रकांत चौधरी यांना मोनिकाला परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याकरिता समजूत घालण्यासाठी पाठवले होते.  त्यांनी समजूत घातल्यानंतर  मोनिका व एकनाथने घृष्णेश्वर महाविद्यालयातील परीक्षा केंद्र गाठले.   इकडे मुलगी अायुष्याचे गणित सोडवत होती तर तिकडे वडील आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होते.  पेपर सोडवून तिने लगबगीने घर गाठले. पण दुर्दैव.. घरी पोहोचताच तिला वडील गेल्याचे कळले.


कर्जात रुतला आयुष्याचा गाडा
गिरजाराम काळे यांना एक एकर शेती असून काही शेती त्यांनी बटाईने केली होती. त्यांनी शेतात अद्रक व ऊस लागवड केली होती.  अद्रकीचे बेणे त्यांनी उसनवारीवर आणले होते. हे पीक वाचवण्यासाठी त्यांनी टँकरने पाणी दिले. यात हजारो रुपये खर्च झाले. पण अपेक्षित उत्पन्न झाले नाही. वर्षभरापूर्वीच त्यांनी मोठ्या मुलीचे लग्न केले होते.  दुसऱ्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती.  त्यातच नापिकीमुळे कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. 

बातम्या आणखी आहेत...