आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्टकाळाशी महायुद्ध : सोळा दिवसांच्या मोठ्या खंडाने पावसाची तूट ३८.४१ टक्क्यांवर; मराठवाड्यातील खरीप पिके धोक्यात, निम्म्यावर प्रकल्पही कोरड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद  - गत सोळा दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. १ जून ते २६ ऑगस्टपर्यंत अपेक्षित ५१५.८४ मिमी पावसाच्या तुलनेत ३१७.७१ मिमी म्हणजे ६१.५९ टक्केच पर्जन्यमान झाले आहे. ३८.४१ टक्के तुटीचा पाऊस आजवर झाला आहे. बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात दुष्काळ अधिक गडद होत चालला आहे. निम्म्यावर प्रकल्पही कोरडेठाक आहे. साडेशेहचाळीस लाख हेक्टरवरील खरीप पेरणी धोक्यात आली आहे. 

यंदा मराठवाड्यात हवामान विभाग व हवामान शास्त्रज्ञांचे भाकित अनपेक्षित हवामान बदलाने  खोटे ठरवले आहे. जूनमधील पाऊस वादळाने पळवला. जुलैत पोषक वातावरणाचा अभाव राहिला. त्यामुळे २५ जुलैपर्यंत अतिशय कमी पाऊस पडला. २५ ते ११ ऑगस्ट मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हाूपर, सोलापूर, भामरगड, कोकण मध्ये अतिवृष्टी झाली. तर मराठवाड्यातही १३४.३ मिमी पाऊस पडला. मात्र, गत सोहळा दिवसांपासून पुन्हा पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असून बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ तीव्र होत चालला आहे. त्यानंतर हिंगोली, परभणी व लातूर जिल्ह्यांचा नंबर लागतो.  औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद, पैठण, जालना जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत. १ जून ते २६ ऑगस्टपर्यंत कमी दिवसांत काही वेळेत पाऊस पडला आहे. खंडाचे दिवस अधिक राहिले आहेत. त्यामुळे खरिपातील सर्वच पिकांवर दुष्परिणाम झाले आहेत. त्याचा उत्पादकता, गुणवत्ता व दर्जावर परिणाम होणार असल्याचे कृषी तज्ञ सांगत आहेत. 

गतवर्षीच्या तुलनेत जायकवाडीत दुप्पट पाणी संचय
२७ ऑगस्टपर्यंत गतवर्षी ४११ मिमी पाऊस पडला होता. तर ४३.७७ टक्के पाणी संचय झाला होता. यंदा ६५ टक्के कमी म्हणजे केवळ १५६ मिमी पाऊस पडला. धरणात मात्र, ८६.५० टक्के जलसंचय झालेला आहे. ९१ टक्क्यांवर तो गेला होता. गत सोळा दिवसांत पाऊस पडला असता तर आणखी पाणी पातळी १०० टक्क्यांवर जाऊन खाली पाणी संचय होऊन मराठवाड्यातील पाणी टंचाई कमी करण्यास मोठी मदत झाली असती. खंडाने सर्वांची चिंता वाढवली आहे. एकट्या धरणात पाणी असून उपयोग होणार नाही. एकूण गोदावरी खोऱ्यातील धरणांत केवळ ३४.३६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. निम्म्यावर प्रकल्प कोरडे ठाक आहेत. त्यामुळे सर्वत्र जोरदार पावसासाठी विविध माध्यमातून ईश्वराला साकडे घातले जात आहे.
 

साडेतेवीस लाख नागरिकांना टँकरद्वारे पाणी 
मराठवाड्यात ९६४ गावे व वाड्या १६७ मधील २३ लाख ५२ हजार २४४ नागरिकांना १२६८ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात १८८ गावे व २० वाड्यांचा समावेश आहे.  बीड जिल्ह्यात १३ लाख ३ हजार ९१२ आणि उस्मानाबाद  ४ लाख ६ हजार ७०० नागरिकांना टँकरने पाणी िदले जात आहे.
 

४२ हजारांवर गुरांना चारा 
चारा छावण्या ६३ सुरू आहेत. त्यापैकी ४७ बीड जिल्ह्यात व १६ उस्मानाबाद जिल्ह्यात आहेत. ३९ हजार ९९५ मोठी व २३४० लहान मिळून ४२ हजार जनावरे छावणीत चारापाणी घेत आहेत. 

शहरावर ढगाळ छाया
गेल्या तीन दिवसांपासून शहरावर ढगांचे आच्छादन अधिक वेळ राहिले. अधून मधून पावसाचे थेंबही पडलेत. कमाल तापमान ३० तर किमान २०.१ अंश सेल्सियस होते. मंगळवारी तापमानात किंचित बदल होता. सायंकाळ ते सकाळ वातावरणात गारवा वाढला आहे. 
 

असा पाऊस आणि अशी आहे तूट
जिल्हा    अपेक्षित    प्रत्यक्ष %        तूट 
औरंगाबाद    ४४४.७५     ३३३.७५    ७४.५९    २५.४१
जालना    ४५६.०३    २८०.३१    ६१.४७    ३८.५३
परभणी    ५१४.७०    २८८.१४    ५५.९८    ४४.०२
हिंगोली    ६४५.९७    ३३८९.३८    ६०.२८    ३९.७२
नांदेड    ६५३.७९    ४९२.३३    ७५.३०    २४.७०
बीड    ४१०.००    १८१.२९    ४४.२२    ५५.७८
लातूर    ५०३.२६    ३०१.६०    ५९.९३    ३९.०७
उस्मानाबाद     ४९८.१८    २७६.८४    ५५.५७    ४४.४३
एकूण    ५१५.८४    ३१७.७१    ६१.५९    ३८.४१
 

बातम्या आणखी आहेत...