आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुईत स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांनंतर पोहोचले पिण्याचे पाणी; पंरतू रस्ते व वीज समस्या कायम 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- वाशीम आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील घनदाट जंगलात वसलेले रुई हे वनग्राम आहे. वाशीम जिल्ह्यात अंध-आदिवासी अधिक संख्येने आहेत. पण या पाड्यात गोंड आदिवासींची १२ घरे आहेत. शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, रस्ते अशा प्रकारच्या प्राथमिक सोयी-सुविधांपासूनच हे गाव आजवर वंचित होते. येण्याजाण्यासाठी रस्ताच नसल्याने शासकीय योजनाही रुईपासून कोसो दूर. जलहक्क कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांच्या प्रयत्नांमुळे रुईमध्ये हातपंप लावण्यात आले. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७२ वर्षांनंतर येथे पिण्याच्या पाण्याची सोय झाली. 

 

नदीच्या काठावर असूनही तहानलेले राहिलेल्या या गावाला आता शुद्ध पिण्याचे पाणी मिळत आहे. वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीरपासून २२ किमीवर काटेपूर्णाच्या घनदाट जंगलात रुई हे गाव आहे. पूर्वी गाव चारही बाजूने सीताफळांच्या बनांनी वेढलेले होते. आता सीताफळांच्या झाडांची आणि ग्रामस्थांचीही संख्या कमी झाली आहे. गावात आता ३९ गावकरी राहतात. कारण इतरांनी स्थलांतर केल्याचे जलहक्क कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांनी सांगितले. 

 

महावितरणच्या असहकार्यामुळे अंधार : 
रुईपाड्याची पाणी समस्या सुटली, पण रस्ते व वीज समस्या कायम आहेत. त्यातही वीज आली तर खूप सुविधा होऊ शकते. पण महावितरणच्या असहकार्यामुळे गावात वीज येऊ शकलेली नाही. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक घर आणि प्रत्येक गावात वीज देण्याची घोषणा करीत असताना रुईपाड्यात ती न पोहोचल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गावातील सिंगलफेज वर्षभरापासून बंद आहे. १२ उंबऱ्यांच्या गावातील घरे कधी उजळून निघणार असा गावकऱ्यांचा प्रश्न आहे. गावकऱ्यांना त्यांचे वनहक्क मिळाले, गावात वीज आली तर स्थलांतरित झालेले गावकरी गावात परततील, असे कुळकर्णी म्हणाले. 

 

आधी हंडाभर पाण्यासाठी लागायचा दीड तास : 
गावात नदीतून पाणी भरण्याची पारंपरिक पद्धत होती. नदीच्या पात्रात एक ते दीड फूट खड्डा (झिरा) खोदायचा. त्यात जमा झालेले अशुद्ध पाणी काढून फेकायचे. त्यानंतर त्यात जमा झालेले शुद्ध पाणी हंड्यात भरायचे. एक हंडा भरण्यासाठी किमान १ ते २ तास वेळ लागायचा. परंतु आता हातपंप लावल्यामुळे पाणी भरण्यासाठीचा वेळ वाचला आहे. 

 

७२ वर्षांनंतर गावात आले अधिकारी 
वाशीम जिल्ह्यात रुईसारखी अनेक गावे आहेत. उपविभागीय महसूल अधिकारी धनंजय गोगटे हे या गावात पोहोचलेले पहिले शासकीय अधिकारी आहेत. ग्रामसेवक मुकेश सुरडकर यांनी १४ व्या वित्त आयोगातून निधी हातपंपासाठी निधी मंजूर करून दिला. त्यानंतर लागलीच हातपंप खोदण्यात आला. तेव्हा फक्त ६० फुटांवर पाणी लागले, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. 
 

बातम्या आणखी आहेत...