वादग्रस्त पुस्तक / राज्यभरात आंदोलनानंतर वादग्रस्त पुस्तक अखेर मागे, लेखकाची माफी; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा

मुंबईत सोमवारी लेखक गोयलविरोधात निदर्शने करताना काँग्रेस कार्यकर्ते. मुंबईत सोमवारी लेखक गोयलविरोधात निदर्शने करताना काँग्रेस कार्यकर्ते.

  • पुस्तकाशी भाजपचा संबंध नाही, ते  वैयक्तिक मत : जावडेकर
  • पवार ‘जाणता राजा’ कसे ? - सुधीर मुनगंटीवार

प्रतिनिधी

Jan 14,2020 07:46:50 AM IST

मुंबई - नरेंद्र मोदींची थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणारे दिल्ली भाजप नेत्याचे वादग्रस्त पुस्तक अखेर मागे घेण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी सांगितले की, ‘भावना दुखावल्याप्रकरणी पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागितली असून पुस्तकही मागे घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराज महान शासक होते. लोककल्याणासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. अनेक शतकांनंतरही त्यांची चिरंतन प्रेरणा आजही कायम आहे. त्यांची तुलना इतर कुणाशीही होऊ शकत नाही,’ असे जावडेकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


दिल्ली भाजप नेते जयभगवान गोयल लिखित ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या हिंदी पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन झाल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट उसळली. मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबादसह राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. सोलापूर, औरंगाबाद येथे पोलिस ठाण्यातही तक्रार देण्यात आली होती. अखेर रात्री या प्रकरणावर पडदा पडला.

पुस्तकाशी भाजपचा संबंध नाही, ते वैयक्तिक मत : जावडेकर

तत्पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी पूजक आहे. मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे धाडसी निर्णय घेणारा पंतप्रधान अनेक वर्षांनंतर देशाला लाभला आहे. पक्षाने आदेश दिल्यास पुस्तक मागे घेऊ, असे गोयल म्हणाले.हाेतेे. मात्र महाराष्ट्रात उमटलेली तीव्र प्रतिक्रिया आणि भाजपची झालेली कोंडी पाहून अखेर रात्री उशिरा पुस्तक मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली.

भाजपचा खोडसाळपणा


छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. छत्रपतींच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपने मोदींशी तुलना करण्याचा खोडसाळपणा केला आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

पवार ‘जाणता राजा’ कसे ?


शरद पवार यांना ‘जाणता राजा’ ही छत्रपतींची उपाधी दिली होती. भाजपने कधी विरोध केला नाही. ब्रह्मांड अंतापर्यंत छत्रपतींची बरोबरी कोणी करू शकत नाहीत. मोदीसुद्धा नाहीत, असे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

वारसांनो, राजीनामे द्या :

भाजपमध्ये गेलेले छत्रपतींच्या सातारा गादीचे वारस उदयनराजे, शिवेंद्रराजे व कोल्हापूर गादीचे संभाजीराजे यांनी छत्रपतींची तुलना मोदींशी केल्याबाबत बोलले पाहिजे व त्यांनी भाजपचे राजीनामे दिले पाहिजेत,अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी केली.

‘तान्हाजी’ करमुक्त करा प्रेस नोटमध्ये मागणी


महाराष्ट्र प्रदेश भाजपकडून कोणतीही अधिकृत भूमिका मांडली गेली नाही. प्रदेश भाजपने सायंकाळी प्रेस नोट जारी केली. त्यात ‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली, परंतु पुस्तकाबद्दल चकार शब्दानेही उल्लेख नव्हता. तसेच विरोधी पक्षनेते, भाजप प्रदेश अध्यक्ष,भाजप मुख्य प्रवक्ते या पुस्तकाच्या वादावर बोलले नाही.

X
मुंबईत सोमवारी लेखक गोयलविरोधात निदर्शने करताना काँग्रेस कार्यकर्ते.मुंबईत सोमवारी लेखक गोयलविरोधात निदर्शने करताना काँग्रेस कार्यकर्ते.
COMMENT