आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेत आमदारांच्या सात जागा रिक्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अशोक अडसूळ

मुंबई - १४ व्या विधानसभेचा नेता कोण, याचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंकडे असलेल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत सध्या चढाओढ सुरू झाली आहे. दरम्यान, विधान परिषदेचे चार आमदार विधानसभेत गेल्याने व तिघांनी पक्षांतरामुळे राजीनामा दिल्यामुळे आता विधान परिषदेत सात जागा रिक्त झाल्या आहेत, त्यांच्या जागी लवकरच निवडणूक हाेऊ शकते.

विधानसभेत निवडून गेल्यामुळे तसेच पक्षांतरामुळे विधिमंडळातील चार बड्या पक्षांचे संख्याबळ घटले आहे. भाजपचे चंद्रकांत पाटील व शिवसेनेचे तानाजी सावंत हे विधान परिषद सदस्य विधानसभेवर निवडून आले आहेत. तर, धनंजय मुंडे, राहुल नार्वेकर हे विधानसभेवर गेल्याने आणि रामराव वडकुते यांनी पक्षांतर केल्याने राष्ट्रवादीचे १७ असलेले संख्याबळ आता १४ झाले आहे. काँग्रेसचे अमरिष पटेल हे भाजपवासी झाले असून चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेचे शिवबंधन बांधले आहे. या दोघांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. परिणामी काँग्रेसचे १६ संख्याबळ आता राष्ट्रवादी इतकेच १४ इतके राहिले आहे.

धनंजय मुंडे परळीतून विजयी झाले आहेत. त्यांच्याकडे असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आता रिक्त झाले आहे. वरिष्ठांच्या या सभागृहात हेमंत टकले राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. मुंडेंच्या जागी त्यांना विरोधी नेतेपदी संधी मिळण्याची शक्यता आहे. शरद रणपिसे काँग्रेसचे गटनेते आहेत. इतर छोट्या पक्षांच्या पाठिंबा घेऊन काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भाई जगताप किंवा शरद रणपिसे यांना संधी मिळेल. युतीचे सरकार सत्तारूढ झाल्यास तिसरा माेठा पक्ष म्हणून विधानसभेचे विराेधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे जाईल. त्यामुळे आघाडीत सामंजस्य राहिल्यास राष्ट्रवादी परिषदेचे विराेधी पक्षनेतेपद काँग्रेसलाही देऊ शकते.

नवविर्वाचित सदस्यांना शपथ देण्यासाठी तसेच बहुमत सिद्ध करण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत नवी विधानसभा अस्तित्वात येईल. त्यावेळी परिषद भरवण्यात येणार नाही. त्यामुळे ज्येष्ठ सभागृहातील उलथापालथी नागपूर येथे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातील हिवाळी अधिवेशनात घडू शकतात. 

युती तुटल्यास समीकरणे बदलतील...
१. बाॅम्बे सायमल्टेनियस मेंबरशिप अॅक्ट १९५७ अन्वये दुसऱ्या सभागृहाचा सदस्य होताच पहिल्या सभागृहाचे सदस्यत्व आपोआप रद्द होते. त्यामुळे विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांचे परिषदेचे सदस्यत्व रद्द हाेईल.
२. विधान परिषदेत युतीचे संख्याबळ अधिक आहे. सभापती राष्ट्रवादीचा तर उपसभापती शिवसेनेचा आहे. युती अभंग राहिल्यास हिवाळी अधिवेशनात सभापती पदही युतीकडे (भाजपकडे) जाऊ शकते.
३. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये सामील झाल्यास परिषदेतील चित्र पूर्ण उलटे होईल. भाजपकडे विरोधी पक्षनेतेपद येईल. 
  
४. विधान परिषदेतील निवडणुका घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. सरकारच्या सल्ल्याने या निवडणुका होतात. 
५. एखाद्या सदस्याने राजीनामा दिल्याने पाेटनिवडणूक घेतली जाते. त्या जागेवर निवडून येणाऱ्या आमदाराला त्या पदाचा केवळ उर्वरित काळ मिळतो. विधानसभेत गेलेले जे ४ सदस्य आहेत, त्यांच्या जागी निवडणुका इतक्यात होऊ शकतात. 

विधान परिषदेतील रिक्त झालेल्या जागा 
१. चंद्रकांत पाटील, भाजप (कोथरूडमधून विजयी). 
२. तानाजी सावंत, शिवसेना (परंड्यामधून विजयी). 
३. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी (परळीतून विजयी). 
४. राहुल नार्वेकर, राष्ट्रवादी (कुलाब्यामधून विजयी). 
५. अमरीश पटेल, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश (परिषदेचा राजीनामा). 
६. चंद्रकांत रघुवंशी, काँग्रेसमधून शिवसेनेत (राजीनामा). 
७. रामराव वडकुते, राष्ट्रवादीतून भाजपत (राजीनामा). 

सध्याचे पक्षीय बलाबल, एकूण सदस्य ७८ 
भाजप २१, शिवसेना १२, राष्ट्रवादी १४, काँग्रेस १४, 
अपक्ष ६, छोटे पक्ष ४, रिक्त ७

बातम्या आणखी आहेत...