आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • After The Bye Elections, The JDS Does Not Seem To Be Making An Alliance With The BJP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोटनिवडणुकीनंतर जेडीएस भाजपशी, हातमिळवणी करेल असे वाटत नाही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू : कर्नाटकमधील पोटनिवडणुकीनंतर जेडीएस भाजपशी हातमिळवणी करण्याची शक्यता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी फेटाळून लावली. राज्यात मध्यावधी निवडणुकीचीच शक्यता असून त्यात काँग्रेस पक्ष विजयी होईल, असा दावा त्यांनी केला. पोटनिवडणुकीनंतर आवश्यक तेवढे संख्याबळ न मिळाल्यामुळे भाजप सरकारला राजीनामा द्यावा लागेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

हुबळी येथे पत्रकारांशी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सिद्धरामय्या म्हणाले की, 'जेडीएस भाजपला पाठिंबा देईल, असे मला वाटत नाही. माझे जेडीएस नेत्यांशी यासंदर्भात बोलणे झालेले नाही, पण जेडीएससोबतच्या भूतकाळातील अनुभवावरून मला तशी खात्री वाटत आहे.' ९ डिसेंबरला राज्यातील १५ विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर सत्ताधारी भाजपने बहुमत गमावल्यास पक्षाची भूमिका काय असेल याबाबत विचार केला जाईल, असे संकेत जेडीएसच्या नेत्यांनी याआधीच दिले आहेत. आम्हाला मध्यावधी निवडणूक नको आहे, असेही त्यांनी म्हटले होते.


भाजपला पोटनिवडणुकीत आवश्यक संख्याबळ मिळाले नाही तर त्या पक्षाच्या सरकारला राजीनामा द्यावा लागेल, असे मत सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले. भाजपला आवश्यक संख्याबळ न मिळाल्यास काँग्रेस पक्ष विधानसभेत सरकारने बहुमत सिद्ध करण्याची मागणी करेल का, या प्रश्नावर सिद्धरामय्या म्हणाले की, भाजप सरकारला राजीनामा द्यावाच लागेल, विश्वासदर्शक ठरावाची गरजच काय आहे? भाजप सरकार पडल्यास तुम्ही मुख्यमंत्री व्हाल का, या प्रश्नावर ते म्हणाले, 'मी तसे म्हणालो आहे का? माझ्या मते मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आम्ही निश्चितपणे जिंकू. 


मध्यावधी निवडणुकीनंतर तुम्ही मुख्यमंत्री व्हाल का, या प्रश्नावर 'पक्षश्रेष्ठी आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षच याबाबत निर्णय घेईल,' असे उत्तर सिद्धरामय्या यांनी दिले.

पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली होईल, असा विश्वास व्यक्त करून सिद्धरामय्या म्हणाले की, सध्या प्रचार सुरू आहे. मी पाच मतदारसंघांत गेलो आहे. ३ डिसेंबरच्या आधी इतर मतदारसंघांत जाणार आहे. भाजपला सर्व १५ जागा मिळतील, असा दावा मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी केला असल्याच्या वृत्ताकडे लक्ष वेधले असता सिद्धरामय्या म्हणाले की, पराभव पत्करावा लागणार याची जाणीव झाल्यामुळे येदियुरप्पा काहीही बोलत आहेत.


काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी बंड केल्यामुळे या दोन्ही पक्षांचे आघाडी सरकार कोसळले होते. या १७ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले होते. त्यापैकी १५ आमदारांच्या मतदारसंघांत पोटनिवडणूक होत आहे. या १५ पैकी १२ जागा काँग्रेसकडे तर तीन जागा जेडीएसकडे होत्या.

जेडीएसचे अनेक आमदार संपर्कात; भाजप आमदार लिंबावल्लींचा दावा

बंगळुरू : जेडीएसचे अनेक आमदार आमच्या पक्षाच्या संपर्कात असून त्यांनी भाजपत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असा दावा भाजपचे राज्य सरचिटणीस अरविंद लिंबावल्ली यांनी सोमवारी केला. भाजपला पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागेल, त्या पक्षाला बहुमत गमवावे लागेल आणि अशा स्थितीत आम्ही भाजपला पाठिंबा देऊ आणि सरकार वाचवू, असे जेडीएसचे नेते म्हणत आहेत. त्यावरून त्यांच्यातील 'असुरक्षितता' दिसते, अशी टिप्पणीही लिंबावल्ली यांनी केली.

कर्नाटक राज्य 'काँग्रेसमुक्त' करणार; मुख्यमंत्री येदियुरप्पा यांची टिप्पणी

बंगळुरू : 'काँग्रेसमुक्त भारत' करण्याचे भाजपचे राष्ट्रीय स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आधी 'काँग्रेसमुक्त कर्नाटक' प्रत्यक्षात आणावा लागेल, त्याची सुरुवात राज्यातूनच करावी लागेल, अशी टिप्पणी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी सोमवारी केली. विजयनगर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या प्रचारसभेत ते बोलत होते. काँग्रेसवर टीका करताना येदियुरप्पा म्हणाले की, काँग्रेसची सध्याची परिस्थिती एवढी दयनीय आहे की या पक्षाकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढेही संख्याबळ नाही.