आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सयाजी शिंदे यांच्या टीकेनंतर बेल महोत्सव लांबणीवर 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीवर परखडपणे टीका केल्यामुळे चर्चेत आलेले अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत २२ ऑगस्ट रोजी नाशिक महापालिकेने आयोजित केलेला बेल महोत्सव तडकाफडकी लांबणीवर टाकला असून राज्य शासनाच्या नाराजीच्या भीतीने कार्यक्रम लांबणीवर टाकला, की शिंदे यांनी कार्यक्रमास येण्यास नकार दिला यावर जोरदार चर्चा रंगली आहे.    सह्याद्री देवराईचे जनक असलेले सयाजी शिंदे महापालिकेच्या उद्यान विभागाचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. गेल्यावेळी ३४ ठिकाणी देवराई प्रकल्पाचा त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याअंतर्गत ६० दुर्मिळ प्रजातींचा समावेश असलेल्या ३००३ वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्याचवेळी येत्या श्रावणात बेल महोत्सव भरवला जाणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले होते. आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या बेलांची तीन हजार झाडे शहरात लावली जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने २२ ऑगस्टचा मुहूर्त निश्चित केला होता. सर्व तयारी पूर्ण झाली होती. शिंदे यांनी राज्य शासनाच्या वृक्ष लागवडीवर टीका केल्यामुळे महापालिकेसमोर मोठा पेच निर्माण झाल्याचे वृत्त आहे. त्यातून २२ ऑगस्ट रोजीचा कार्यक्रम रद्द करून पुढे टाकल्याचे वृत्त आहे. या संदर्भात पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. उद्यान विभागाचे अधीक्षक शिवाजी आमले यांचाही भ्रमणध्वनी संपर्काबाहेर असल्यामुळे नेमके कळाले नाही. 

0