आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतरही मराठवाड्यातील ३१७ प्रकल्प कोरडेच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औैरंगाबाद : मराठवाड्यात अपेक्षित सरासरीच्या केवळ ७० टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील ७४९ लघु प्रकल्पांपैकी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील ३१७ लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. विशेष म्हणजे २३५ लघु प्रकल्प हे जाेत्याच्या खाली आहेत. तर मराठवाड्यातल्या ७५ मध्यम प्रकल्पांपैकी २८ मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे राज्यात एकीकडे पूर परिस्थिती असली तरी मराठवाड्यातले पाणी संकट कायम अाहे. परतीच्या पावसावरच मराठवाड्याची आशा कायम आहे.

मराठवाड्यात या वर्षी पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याचे संकट कायम राहिले आहे. मराठवाड्यात औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातच अपेक्षित सरासरीच्या ८०% पाऊस झाला आहे. मात्र इतर जिल्ह्यांत ६५ टक्यांपर्यंतच पाऊस झाल्यानेे प्रकल्पांत पाणीसाठा झाला नाही.

लघु प्रकल्पांत केवळ दहा टक्के पाणीसाठा : मराठवाड्यात ७४९ लघु प्रकल्पांत १७१२ दलघमी प्रकल्पीय क्षमता असताना केवळ १७१ दलघमी इतका पाणीसाठा झाला आहे. हे प्रमाण केवळ १० टक्के इतके आहे. गेल्या वर्षी अाज तारखेपर्यंत २२ टक्के तर २०१७ मध्ये १५ टक्के इतका पाणीसाठा होता. औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ पैकी ४० लघु प्रकल्प कोरडे आहेत. तर जालनातील ५७ पैकी ३७ बीड १२६ पैकी ९४ लातूर १३२ पैकी ३७ तर उस्मानाबाद २०५ पैकी १०९ प्रकल्प कोरडे आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यातले २३५ प्रकल्प जाेत्याच्या खाली आहेत. यामध्ये ९२ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी तर ४० प्रकल्पांत २५ ते ५० टक्के आणि १७ प्रकल्पात ५० ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. तर ४८ लघु प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात मध्यम प्रकल्पांत १०% पाणीसाठा
औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघु प्रकल्पांची १८८ दलघमी क्षमता असताना ३२ दलघमीच पाणीसाठा असून हे प्रमाण केवळ १७ टक्के आहे. ४० लघु प्रकल्प कोरडे असून २२ प्रकल्प जाेत्याच्या खाली आहेत. यामध्ये केवळ अकरा प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा आधिक पाणीसाठा आहे. तर जिल्ह्यातल्या १६ मध्यम प्रकल्पांत २०५ दलघमी क्षमता असताना केवळ२० दलघमी इतका पाणीसाठा आहे. हे प्रमाण केवळ १० टक्के इतके आहे. विशेष म्हणजे यापैकी ५ कोरडे तर ७ जाेत्याच्या खाली आहेत. यामध्ये खेळणा अजिंठा अंधारी हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर गडदगड ४ टक्के आणि पूर्ण नेवपूरमध्ये ७ टक्के पाणीसाठा आहे.

केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणात केवळ सहा दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे.

७५ मध्यम प्रकल्पांपैकी २८ कोरडे
मराठवाड्यात ७५ मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची क्षमता ९४० दलघमी इतकी असून केवळ ८७ दलघमी इतका पाणीसाठा आहे. यामध्ये २८ प्रकल्प कोरडे असून २९ प्रकल्प जोत्याखाली आहेत. केवळ ८ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १६ पैकी ५, जालना ७ पैकी १, बीड १६ पैकी ९, लातूर ८ पैकी २, उस्मानाबाद १७ पैकी ११ मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. मराठवाड्यातील येलदरी, सिद्धेश्वर माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, सिनाकोळेगाव आणि दुधना हे माेठे प्रकल्प मृत साठ्यातच अाहेत.

बातम्या आणखी आहेत...