आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्चन्यायालयाच्या निकालानंतर अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचे न्यायमूर्तींवरच गंभीर आरोप, म्हणाले- सर्वोच्च न्यायालयात जाणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले 16 टक्के आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. आम्ही दिलेले आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर टिकवून दाखवू, असा दावा छातीठोकपणे मुख्यमंत्र्यांनी अनेकवेळा केला होता. हे आरक्षण दिल्यानंतर पाच दिवसांत याविरोधात पहिली याचिका दाखल झाली. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या निकालानंतर त्यांनी राज्य सरकार आणि न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केल आहे. शिवाय सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचंही ते म्हणाले.


अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन त्यांच्यावर निशाणा साधला. या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गाच्या आरक्षणाची कत्तल झाली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वाच्या विरोधात हे आरक्षण असल्याचे ते म्हणाले. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच राज्य सरकारला आपल्याच बाजूने निकाल लागणार आहे हे कसे समजते, विनोद तावडे यांनी आपल्याच बाजूने निकाल लागणार हे सकाळीच सांगितले होते, या प्रकरणात पक्षपातीपणा झालाय, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली.


न्यायमूर्तींवरही गंभीर आरोप
सदावर्तेंनी न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. न्यायमूर्ती मोरे यांच्यावर त्यांनी पक्षपातीणाचाही आरोप केला. या सर्व प्रक्रियेमध्ये न्यायाचा सिद्धांत बाजूला ठेवला गेला असून खुल्या प्रवर्गावर अन्याय करण्यात आला असल्याचे ते म्हणाले. फक्त ताकदीच्या जोरावर खुल्या प्रवर्गावर हा अन्याय करण्यात आला, असेही ते म्हणाले. न्यायमूर्ती रणजित मोरेंनी हे प्रकरण समोर घेणार नाही असे सांगितले होते, मग यावर निर्णय कसा दिला, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.