hunger strike / बदलीविरोधात महावितरण कार्यालसमोर उपोषणाला बसला होता कर्मचारी नवरदेव; शिस्तभंगाचे आदेश येताच चढला बोहल्यावर

लग्नाचे निम्मे विधी उपोषण मंडपातच पार पडले
 

दिव्य मराठी

Jul 20,2019 08:44:00 AM IST

अमरावती - बदलीच्या मागणीसाठी अमरावती येथील महावितरण कार्यालयासमोर उपोषणास बसलेले नवरदेव निखिल तिखे यांना शुक्रवारी प्रशासनापुढे झुकावे लागले. कोणत्याही प्रकारची मागणी मान्य न करता उलट त्यांच्यावरच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे महावितरणच्या मुख्य अभियंत्याने जाहीर करताच नवरदेव तिखे उपोषणस्थळ सोडून नियोजित लग्न सभामंडपात जाऊन बोहल्यावरच चढले. दरम्यान, वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित केल्याचा वर्कर्स फेडरेशनचा दावा आहे.


लग्नाचे सर्व विधी उपोषणाच्या मंडपातच पडल्यामुळे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता उपोषण मंडपातच निखिल तिखे यांचे लग्न लागणार, असे फेडरेशनने सांगितले होते. मात्र, गुरुवारी महावितरणच्या अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी त्यांना कारवाईचा इशारा दिला. “कार्यालयासमोर सुरू असलेला लग्नविधीचा कार्यक्रम म्हणजे महावितरणची प्रचंड बदनामी करणारा आहे. त्यामुळे मागण्या मान्य न करता आपण संबंधित कर्मचाऱ्यावर शिस्तभंगासोबतच भविष्यात कठोर कारवाई करणार आहोत,’ असे त्या म्हणाल्या. त्यानंतर, काही वेळातच उपोषणकर्ते निखिल तिखे हे उपोषणाच्या ठिकाणावरून बेपत्ता झाले, तर वरिष्ठ स्तरावरून आश्वासन मिळाल्याने उपोषण स्थगित करत असल्याचे सांगून तिखे यांचा विवाह सोहळा नियोजित मंगल कार्यालयात होईल, असे फेडरेशनकडून सांगण्यात आले.

लग्नाचे निम्मे विधी उपोषण मंडपातच पार पडले
महावितरण कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेशी संबंधित मागणीसाठी येथील मुख्य अभियंता कार्यालयासमोर एमएसई वर्कर्स फेडरेशनच्या नेतृत्वात सात वीज कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. कर्मचाऱ्यांपैकी निखिल तिखे यांचा १९ जुलैला विवाह होता. परंतु, मागणी मान्य न झाल्यास उपोषण मंडपातच विवाह करणार असल्याची कठोर भूमिका त्यांच्यासह फेडरेशनने घेतली होती. तशा पत्रिकाही छापल्या, दोन दिवस उपोषण मंडपात केलेल्या लग्नविधीमुळे राज्यभरात हा विषय चर्चेचा झाला होता.

X