आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक विधीनंतर तुळजापुरात नवरात्रोत्सवाची सांगता; पहाटे सीमोल्लंघन, त्यानंतर मंचकी निद्रेस प्रारंभ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर - खंडे नवमीदिनी सोमवारी(दि.७) दुपारी १२ वाजता होमकुंडावरील अजाबलीच्या धार्मिक विधीनंतर घटोत्थापनाने तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवाची सांगता झाली. तत्पूर्वी सकाळी सिंदफळ येथील मानकरी गजेंद्र लांडगे यांनी वाजतगाजत विधी पूर्ण केला. मंदिरातील घटोत्थापनेनंतर घराघरातील घट उठवण्यात आले. घटोत्थापनानंतर गेल्या ९ दिवसांपासून सुरू असलेले नवरात्रीचे उपवास सोडण्यात आले.

सोमवारी सकाळी तुळजाभवानी मातेची अभिषेक पूजा पहाटे ५ वाजता प्रारंभ करण्यात येऊन लवकरच संपवण्यात आली. त्यानंतर तुळजाभवानी मातेला महावस्त्र अलंकार घालण्यात येऊन धुपारतीनंतर अंगारा काढण्यात आला. त्याचवेळी होमकुंडावर धार्मिक विधीची जय्यत तयारी करण्यात आली होती. दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयातील शिपाई जिवन वाघमारे यांनी होमकुंडावर धार्मिक विधी पूर्ण केला. त्यानंतर मंदिरातील घट उठवण्यात आले. तत्पूर्वी पहाटे १ वाजता चरणतीर्थ पुजा होऊन मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
 

पलंग पालखीचे स्वागत,
सायंकाळी ६ च्या सुमारास शुक्रवार पेठ येथील पारावर नगरचा पलंग व भिंगारच्या पालखीचे नगराध्यक्ष चंद्रकांत कणे यांनी स्वागत केले. यावेळी पलंग पालखीचे मानकरी, पलंगे, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री उशिरा किसान चौक, साळुंके गल्ली, आर्य चौक मार्गे पलंग पालखीचे तुळजाभवानी मंदिरात वाजत गाजत मंदिरात आगमन झाले. यावेळी पालखी मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तर जागोजागी पलंग पालखीवर कुंकवाची उधळण करण्यात आली.
 

पहाटे सीमोल्लंघन, त्यानंतर मंचकी निद्रेस प्रारंभ
> मंगळवारी (दि.८) पहाटे तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा पार पडणार असून,त्यानंतर तुळजाभवानी माता नगरच्या पलंगावर श्रम निद्रेसाठी विसावेल. 
 
> अश्विन पोर्णिमेला पहाटे मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान होईल.
 

मंदिर रात्रभर खुले राहणार
दरम्यान सोमवारी दुपारी होमकुंडावरील धार्मिक विधीनंतर तुळजाभवानी मंदिरात रात्रभर विविध धार्मिक विधी सुरू असल्याने तुळजाभवानी मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात आले. दररोज सायंकाळी ७ वाजता होणारी तुळजाभवानी मातेची अभिषेक पुजा गुरुवारी नवमीला मध्यरात्री करण्यात आली. मध्यरात्रीच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघन सोहळ्याची तयारी करण्यात येऊन तुळजाभवानी मातेची मूर्ती १०८ साड्यांमध्ये  लपेटणे  प्रारंभ करण्यात आला.