Home | National | Other State | After the retirement from army, 50 people started their business

सैन्यातून निवृत्तीनंतर प्रशिक्षणाद्वारे ५० जणांचे उद्योग सुरू

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 15, 2019, 11:46 AM IST

यूएस इंडिया अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्थेच्या उपक्रमाचे केले कौतुक

 • After the retirement from army, 50 people started their business

  बंगळुरू - वीस वर्षे सैन्यात राहिलेल्या जवानास निवृत्तीनंतर सामान्य नागरिकांसारखे जगणे खूप कठीण होऊ शकते. काहीशीच अशीच अडचण आर.वाय. नायडू यांच्यासमोर होती. निवृत्ती तोंडावर येत असतानाच त्यांनी इतर पर्यायांबद्दल विचार करण्यास सुरूवात केली होती. त्यांना खासगी नोकरी, शेती किंवा सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यात रस नव्हता. निवृत्तीच्या २० दिवस आधी त्यांनी एक निर्णय घेतला आणि त्यांचे आयुष्य पार पालटून गेले. आज ते एक यशस्वी उद्योजक आहेत. महिना ४.५ ते ५ लाखापर्यंतचे उत्पन्न त्यांना मिळू लागले आहे. संस्थेने २०१६ ते आतापर्यंत ५० जवानांना उद्योजक म्हणून प्रशिक्षणासाठी मदत दिली आहे. आतापर्यंत ७५० हून जास्त जवान कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथे त्यांचा आरआे प्रकल्प आहे. हे सर्व ‘आय क्रिएट इंडिया’ मुळे शक्य होऊ शकले. सैन्यातून निवृत्त होणाऱ्या जवानांना आय क्रिएट इंडिया उद्योजक होण्यासाठी आवश्यक सर्व प्रशिक्षण देण्याचे काम करते. त्याविषयी...

  डेरी उद्योग सुरू केल्याने दर महिन्याला आता माझी दोन लाख रुपयांची कमाई होऊ लागली

  मी प्रशिक्षणानंतर बंद पडलेली डेअरी पुन्हा सुरू केली. त्याशिवाय अर्थ मुव्हर्सचा उद्योगही उभारला. लष्करात होतो. तेव्हा दुर्गम भागांत अवजड वाहने चालवण्याचा अनुभव पाठीशी होता. आज माझ्याकडे दोन अर्थ मुव्हर व दोन ट्रॅक्टर आहेत. बचतीतून २२ लाखांची गुंतवणूक केली होती. सर्व खर्च निघून आता दर महिन्याला १.५ ते दोन लाख रुपयांची कमाई होते. सप्टेंबर २०१८ मध्ये आय क्रिएटशी संपर्क साधला. प्रशिक्षण घेतल्यानंतर मिळालेल्या प्रशिक्षणामुळे खूप फायदा झाला. तेथे डेअरी क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन मिळाले. तंत्रज्ञानाबद्दलही माहिती मिळाली, असे नामदेव घोटाने यांनी सांगितले.

  ७० लाख गुंतवणूक करून आरआे वॉटर प्रकल्प सुरू केला, खर्च जाऊन ७० हजाराची कमाई होते
  २० वर्षे देशाची सेवा केल्यानंतर मी कुटुंबाला मला सुखाचे आयुष्य द्यायचे होते. परंतु माझ्याकडे पदवी नव्हती किंवा चांगली नोकरी मिळेल, असे शिक्षणही नव्हते. ऑक्टोबर २०१८ मध्ये बंगळुरूमध्ये आय क्रिएटच्या लोकांची भेट झाली. चर्चेतून अनेक पर्याय समाेर आले. मला आरआे प्रकल्पाचे काम लक्षात आले. विजयनगरम येथे मी राहतो. तेथे कोणताही आरआे प्रकल्प नव्हता. आरआेचे पाणी मागवण्यासाठी २५ किमी जावे लागायचे. स्वत: ला जावे लागे. कार्यशाळेतील प्रशिक्षणानंतर ७० लाख रुपयांची गुंतवणूक करून विजयनगरम येथे प्रकल्प सुरू केला. त्यात ५० लाख पीएमइजीपी योजना मिळाली. श्रीवरि नावाचे ब्रँड आता सेट झाले आहे. दर महिन्याला ५ लाखांची उलाढाल होते. ५० ते ७० हजार रुपये शिल्लक राहतात. आता बॉटलच्या उत्पादनाचा प्रकल्पाच्या तयारीत आहे, असे आर.वाय. नायडू यांनी सांगितले.

  कशी झाली सुरुवात : भारतीय वंशाचे अमेरिकी दाम्पत्य हर्ष-अरूणा भार्गव १९९९ मध्ये भारतात आले होते. तेव्हा सैन्य भरतीत गोंधळ झाल्याने पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने भार्गव दाम्पत्य व्यथित झाले व त्यांनी नोकरी मिळवून देण्यासाठी संस्था सुरू करण्याचा संकल्प केला. या विचारातूनच आय क्रिएट इंडियाचा आरंभ झाला. आज वडोदरा, गांधीनगर, हुबळी व गोव्यात त्याचे केंद्र सुरू आहेत.

  एक ते तीन महिन्यांचे प्रशिक्षण : संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास काम म्हणाले, आय क्रिएट इंडियाने डायरेक्टोरेट ऑफ इंडियन आर्मी वेटरन्ससोबत एक सामंजस्य करार केला होता. त्यानुसार देशभरात चार केंद्राद्वारे दर महिन्याला ५ दिवसांची कार्यशाळा होते. त्यानंतर तज्ञांद्वारे १ ते ३ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. उद्योग सुरू झाल्यानंतर काही समस्या आल्यास सल्लाही दिला जातो. मदतीसाठी मॅजिक फंडही सुरू केला .

Trending