आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना व्हायरसविरुद्ध, युद्ध आमुचे सुरू...;इराणहून 58 भारतीय विमानाने मायदेशी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : इराणमध्ये अडकलेल्या ५८ भारतीयांंचा पहिला जत्था मंगळवारी भारतात दाखल झाला. भारतीय वायुसेनेचे सी-१७ ग्लोबमास्टर हे विमान त्यांना घेऊन मंगळवारी सकाळी गाझियाबाद हिंडन विमानतळावर दाखल झाले. त्यात ३१ महिला, २५ पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

या सर्व भारतीयांची कोरोना व्हायरसची तपासणी करण्यात आली. भारतीयांसमवेत इराणमधून ५२९ नमुने तपासणीसाठी आणण्यात आले आहेत. इराणमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला असून, आतापर्यंत २४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये जवळपास दोन हजार भारतीय नागरिक आहेत. भारतात परतलेले हे सर्वजण धार्मिक यात्रेसाठी इराणला गेले होते. तेथे कोरोनाचे संकट आल्यानंतर त्यांनी पुन्हा भारतात परतण्याची विनंती केली होती. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर प्रसाद यांनी इराणच्या भारतीय दुतावासातील अधिकारी आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत. आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी केलेल्या कामाचेही कौतुक केले आहे.

डॉ. प्रसाद यांनी पहिला जत्था दाखल होताच ट्विटरवर याची माहिती दिली. ते म्हणाले की, भारतीय यात्रेकरूंना तेहरान येथून घेऊन विमान भारतात दाखल झाले आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी सहकार्यासाठी इराणच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. तेथे अडकलेल्या उर्वरित भारतीयांनाही माघारी आणण्यासाठी पावले उचलली जात आहेत. प्रसाद यांनी सोमवारी श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरच्या लोकांची भेट घेतली. त्यांची मुले मोठ्या संख्येने इराणमध्ये शिकत आहेत. तेहरानमधून लवकरच त्यांना मायदेशी आणले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. भारतात आणल्यानंतर कोरोना संक्रमित लोकांसाठी बनवलेल्या विशेष केंद्रात त्यांना ठेवण्यात येणार आहे.

दक्षिण कोरियात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७५१३

सेऊल : दक्षिण कोरियात कोरोना विषाणूचा (कोव्हिड-१९) संसर्ग झालेले आणखी १३१ रुग्ण मंगळवारी आढळले. या देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता ७५१३ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ५४ झाली आहे. कोरियात स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजता आणि सायंकाळी पाच वाजता असे दोन वेळा कोरोना रुग्णांची माहिती दिली जाते.

गेल्या २० दिवसांत दक्षिण कोरियामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. २९ फेब्रुवारी ते ९ मार्चपर्यंत ७४८२ प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे देशभरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सेऊलपासून तीनशे किलोमीटरवरील जायोंगसँग प्रांत आणि लगतच्या दाग शहरात कोरोना विषाणू बाधितांची संख्या अनुक्रमे १११७ आणि ५६६३ इतकी झाली आहे. गियॉन्गी प्रांतातही ही संख्या वाढून आता ३०४ झाली आहे. दक्षिण कोरियात कोरोना विषाणू बाधितांची सर्वाधिक प्रकरणे दाग शहरात उघडकीस आली आहेत. सरकारने या शहराला ‘स्पेशल केअर झोन’ जाहीर केले आहे. आतापर्यंत देशभरातील दोन लाख दहा हजार नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. यापैकी एक लाख ८४ हजार जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. १८ हजार ४५२ नागरिकांवर उपचार केले जात आहेत.

जपानमध्ये संकट अधिकच गहिरे; आकडा ५१० पार

टोकियो : जपानमध्ये कोरोनाचे संकट अधिकच गहिरे झाले आहे. आरोग्य मंत्रालय आणि स्थानिक प्रशासनाने सांगितले की, मंगळवारी आणखी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संक्रमितांचा आकडा वाढून ५१० वर पोहोचला आहे.

या ५०१ कोरोनाग्रस्तांमध्ये डायमंड प्रिन्सेस क्रूज जहाजावरील एकाही व्यक्तीचा समावेश नाही. यातील बहुतांश संक्रमित व्यक्ती या उत्तरेतील होक्काइडो प्रांतातील आहेत. तेथे १०८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तेथे आणीबाणी घोषित करण्यात आली. दरम्यान, आरोग्य मंत्रालय आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी नवे आकडे मंगळवार जाहीर केले. त्यानुसार आयची प्रीफेक्चरने ८६, टोकियोने ६४, अोसाका ५५, कनागावा ४१ आणि चिबा प्रीफेक्चरने २२ कोरोना संक्रमितांची पुष्टी केली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, सध्या ३३ जणांची प्रकृती गंभीर आहे. हे सारे व्हेंटिलेटरवर आहेत. त्यातील काहीना कोरोना केंद्रात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयानुसार जपानमध्ये कोरोनामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी काही जण डायमंड प्रिन्सेस क्रूजवरील संक्रमितही आहेत. तर ३४६ जणांना घरी सोडण्यात आले.

कराचीत एकाच दिवसात नऊ प्रकरणे उजेडात, एकूण संख्या वाढून सोळावर

कराची : जीवघेणा कोरोना व्हायरस आता पाकिस्तानातही हात-पाय पसरत आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार कोरोनाची एकाच दिवसात ९ प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या महिन्यापासून जगभर धुमाकूळ घालणाऱ्या या आजाराची एकाच दिवस इतकी प्रकरणे उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे.

पंतप्रधानांचे विशेष आरोग्य सल्लागार डॉ. जफर मिर्झा यांनी सांगितले की, ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. हे सर्व परदेशात जाऊन आले आहेत. एका संशयिताच्या तपासणीदरम्यान बाकीची सर्व प्रकरणे समोर आली. त्यांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
सिंधच्या आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार या नऊ लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या ९ पैकी ६ जण दोहा मार्गाने सिरीयातून आले आहेत. अन्य तिघे लंडनहून व्हाया दुबईमार्गे परतले आहेत.

श्रीनगरीमधील खालसाच्या शाळेतील कोरोनाची भीती दर्शवणारे हे बोलके छायाचित्र. कोरोनाच्या भयापोटी विद्यार्थी वर्गातही मास्क घालूनच बसत आहेत.