MahaElectioni / २२० जागांवर आघाडीचा निर्णय, उर्वरित जागी चर्चा; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

मी राष्ट्रवादीतच, कोणत्या खास सूत्रधार सांगण्यावरून बातम्या केल्या जातात हे तपासले पाहिजे -  भुजबळ 

Sep 07,2019 08:44:00 AM IST

पुणे - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा सुरू आहे. २२० जागांबाबत निर्णय झाले आहेत. त्यातील काही जागी अदलाबदलाे स्वरूप अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित जागांबाबात मित्रपक्षांशी चर्चा होत आहे. ४ ते ५ दिवसांत आघाडीची आणखी एक बैठक घेऊन उमेदवारांची अंतिम यादी तयार होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात शुक्रवारी दिली.


विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या छाननी समितीची बैठक पुण्यात बारामती हॉस्टेल येथे झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे नेते छगन भुजबळ, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, नवाब मलिक आदी उपस्थित होते.


जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादीकडे राज्यभरातून एकूण ८१३ जणांनी अर्ज दाखल केले. इंदापूरच्या जागेवरून हर्षवर्धन पाटील यांनी टीका केली होती. इंदापूरच्या जागेबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी निर्णय घेतील. ‘वंचित’ला अधिकाधिक मते मिळून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी व्हावी असा कट आहे. त्यासाठी मुख्यमंत्री ‘वंचित’ला शक्य त्या मार्गांनी ताकद देण्याचा प्रयत्न करत आहेत, उदयनराजे भोसलेंनी अद्याप राष्ट्रवादी पक्ष सोडल्याची भाषा केलेली नाही. त्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही पाटील म्हणाले.

मी राष्ट्रवादीतच : भुजबळ
शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना छगन भुजबळ यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीस हजेरी लावली. भुजबळ म्हणाले, माझ्या पक्षांतरांच्या चर्चा केवळ मीडियामधून सुरू होतात व मीडियात संपतात. कोणत्या खास सूत्रधार सांगण्यावरून बातम्या केल्या जातात हे तपासले पाहिजे. शिवसेना पक्षप्रमुख किंवा नेते अनेक वेळा भेटतात आणि चर्चा होते हे त्यांचे प्रेम आहे.

X