आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक कर्ज, विमा मिळाला; कर्जमाफीही मिळाली; आंदाेलन कशासाठी समजेना, हिंगोलीतील विक्रीस काढलेल्या गावातील परिस्थिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - सेनगाव तालुक्यातील ताकतोडा  ग्रामस्थांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, पीक कर्ज देण्यात यावे, पीक विमा देण्यात यावा आणि सेनगाव येथे एमआयडीसी स्थापन करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी पुकारलेले आंदाेलन तिसऱ्या दिवशीही सुरू हाेते. विशेष म्हणजे  ग्रामस्थांच्या बहुतांश मागण्या यापूर्वीच पूर्ण झाल्या असतानाही  ग्रामस्थ आंदोलन का करीत आहेत, त्यांच्या मागे काही राजकीय षड‌्यंत्र तर नाही ना अशा शंका-कुशंकांनी अधिकारी हतबल झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची समजूत कशी काढायची हा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे ग्रामस्थांनी गाव विक्री काढले आहे. आपल्या मागण्यांसाठी या ग्रामस्थांनी सर्व कामधंदे बंद करून गावात ग्रामपंचायतीसमोर ठाण मांडले अाहे. साेमवारी त्यांनी शाळाही भरून दिली नाही.  उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, गट विकास अधिकारी किशोर काळे यांनी भेट देऊन ग्रामस्थांची भेट घेतली. गावात राबवण्यात येत असलेल्या संपूर्ण योजनांची त्यांना माहिती दिली. परंतु ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांचे काही एक न ऐकता आपले आंदोलन पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 


सरकारी आकडेवारीनुसार सत्यस्थिती : ताकतोडा येथील शेतकऱ्यांना कर्जमाफीपोटी मोठी रक्कम मिळाली आहे. त्यात एसबीआय गोरेगाव शाखेतून कर्जदार ३६७ तर महाराष्ट्र ग्रामीण बँक आजेगाव या शाखेतील ८ अशा एकूण ३७५ शेतकऱ्यांपैकी २९०  शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी १८९ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफी मिळाली.  तब्बल १ कोटी ४७ लाखांचे कर्ज माफ झाले. उर्वरित १०५ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया चालू आहे.  ५७८ शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र ठरले.  ५२५ शेतकऱ्यांना ४० लाख ६६ हजार १४४ रुपये वाटप झाले आहेत.  केवळ ५३ शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित असून त्यांना ३ लाख १० हजार ५७२ एवढी  दुष्काळी अनुदान रक्कम देण्यात येणार आहे. याशिवाय  पात्र शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात आला. हे गाव आजेगाव मंडळात असून या मंडळात ४ हजार हेक्टरवरील पात्र असणाऱ्यांना गेल्या हंगामात पीकविमा देण्यात आला आहे.   या मंडळातील केवळ खरीप ज्वारी पीक विम्यासाठी पात्र ठरले.  ताकतोडा येथील ज्या २२ शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाचा विमा भरला होता, त्यांना  १ लाख ४२ हजार ४८५ रुपये  आतापर्यंत वितरित केले आहेत. त्यामुळे  ताकतोडा येथील बहुतांश शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळाला आहे. असे  असताना सुद्धा शेतकरी गाव विक्री काढण्यास का पुढे आले आहेत?  असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. 

 

अधिकाऱ्यांचे काेणीच ऐकेना
उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांनाही कर्जाबाबत संपूर्ण माहिती दिली. परंतु ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांचे काही एक न  ऐकता आपल्या मागण्यांवर ठाम राहून, गाव विकण्याची आमची मागणी  पूर्ण करा, अशी मागणी लावून धरली आहे.