आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यातील ५ दिवस पत्नी व दोन दिवस पती करणार स्वयंपाक; स्टॅम्प पेपरवर अटी लिहून कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी प्रथमच जिल्हा विधी प्राधिकरणात पोहोचले दांपत्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - शनिवार व रविवारी पती घरकाम करणार आणि पत्नी बाहेरची कामे पाहणार. दोघांपैकी एक आजारी पडले तर हॉटेलमधून जेवण आणण्यात येईल. अशा प्रकारच्या अटी लिहून त्याला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी हे जोडपे जिल्हा विधी प्राधिकरणात गेले.  आजवर प्राधिकरणात महिला पती व सासरच्या मंडळीविरोधात जात असत. प्रथमच या जोडप्यांनी आपसातील वाद काही अटीवर मिटवून घेतले. दोघांनी सर्व अटी १०० रुपयांच्या बाँड पेपरवर लिहून ते प्राधिकरणात गेले. प्राधिकरणाच्या सचिवांनी दोघांच्या तडजोडीचा मान राखत हे प्रकरण जिल्हा न्यायालयात पाठवून देण्याचे ठरवले. तेथे त्यांच्या कागदपत्रीय तडजोडीस कायदेशीर मान्यता मिळेल. प्राधिकरणाचे सचिव न्यायधीश आशुतोष मिश्रा यांनी सांगितले, आमच्याकडे पत्नीला पतीने घराबाहेर काढले, पत्नीने सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दिली, अशा स्वरुपाची प्रकरणे येतात. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून आपसात सुरू असलेली भांडणे समजूतदारपणा दाखवत मिटवली आहेत. त्यांना यासाठी वकिलाची गरज पडली नाही अथवा कायद्याने हस्तक्षेप करण्याचीही गरज भासली नाही. पती व पत्नी दोघे एका खासगी कंपनीत अधिकारी पदावर आहेत. त्यांच्या विवाहाला दहा वर्षे झाली. त्यांनी आपसात काही अटीवर करार केला आहे. करार तोडल्यास दोघांनीही एकमेकांना शिक्षेची तरतूदही केली आहे. अशा प्रकारचा करार किती दिवस टिकतो, यावरच त्याचे यश अवलंबून आहे. 

 

 पती-पत्नीच्या अटी..एकमेकांच्या आईवडिलांवर टोमणे मारायचे नाहीत 

अटी ...

> पाच दिवस पत्नी जेवण तयार करणार आणि घर सांभाळणार. शनिवार-रविवारी पती जेवण तयार करणार, घर सांभाळण्याबरोबरच मुलांचे होमवर्क घेणार. यादरम्यान दोघांपैकी एक जण आजारी पडला तर बाहेरून जेवण मागवण्यात येईल.
> मुलांचा सांभाळ करण्यासाठी घरी उशिरा येण्याबाबत दोन तास आधीच एकमेकांना माहिती कळवली जाईल. 
> दोघांनीही एकमेकांच्या आई-वडिलांबाबत टोमणे मारायचे नाहीत अथवा कोणताही हस्तक्षेप करायचा नाही. दोघेही आपल्या आईवडिलांच्या उदरनिर्वाहासाठी रक्कम आपल्या मर्जीनुसार देतील.
> मुलांच्या भवितव्यासाठी आपापल्या खात्यातील रक्कम  गुुंतवणूक करतील. 
> मुलांच्या शाळेतील पालक सभेला एक महिना पत्नी, तर दुसऱ्या महिन्यात पती जाईल. जर कोणी बाहेरगावी जाणार असेल तर ५ दिवस आधी सूचना देईल.
> घरातील खर्च दोघेही समसमान करतील. 
> विकत घेतलेले घर संयुक्तपणे मुलांच्या नावे असेल. 

 

स्वत:साठी दंडाची तरतूद
> अटीचे उल्लंघन झाल्यास ते एकमेकांपासून विभक्त होऊ शकतात. 
> मुलांच्या संदर्भातील अटींचे उल्लंघन झाले तर त्याच्यासोबत राहायचे नाही. उलट मुलांच्या पालनपोषणासाठी दरमहा २० हजार रुपये द्यावे लागतील. 

 

नियम ... प्राधिकरणात आलेल्या पती-पत्नीची समुपदेशनाद्वारे तडजोड केली जाते. येथे त्यांच्यातील करारानंतर कोणत्याही न्यायालयात सुनावणी होणार नाही. 

 

मुलांसाठी केला करार... मिश्रा म्हणाले, या जोडप्यास दोन अपत्ये आहेत. ती दोन्ही आईवडिलांमध्ये सुरू असलेल्या भांडणांनी वैतागून गेलेली होती. ६ वर्षांची मुलगी वडिलाकडे राहत हाेती, तर ८ वर्षांचा मुलगा आईकडे राहत होता. दोघे बहीण-भाऊ रविवारी एकत्र येत असत. वेगळे झाल्यानंतर दोन्ही मुले तीन ते चार दिवस अस्वस्थ राहत होती. दोन्ही मुलांचा विचार करून पत्नी व पतीने घर जोडण्यासाठी स्वत:लाच शेवटची संधी दिली आहे.