आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारामतीच्या धर्तीवर औरंगाबादच्या कृषी विज्ञान केंद्रात प्रथमच तीन एकरांवर घेतले ३४ फळ पिकांचे प्रात्यक्षिक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


औरंगाबाद : दुष्काळावर मात करणारे व कमी पाणी, खर्चात अधिक दर्जेदार उत्पादन देणाऱ्या वाणाविषयी शेतकऱ्यांना माहिती व्हावी, त्यांनी त्याचा अवलंब करून उन्नती साधावी, यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे केव्हीके, मराठवाडा शेती साह्य मंडळ, कृषी विभाग आणि बीजोत्पादन कंपनी यांच्या संयुक्त संकल्पनेतून बारामतीच्या धर्तीवर औरंगाबादच्या कृषी विज्ञान केंद्रात प्रथमच तीन एकरांवर विविध ३४ फळ, भाजीपाला आणि अन्नधान्य पिकांचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. महाअॅग्रो राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या तीनशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी माहिती जाणून घेतली. 


दुष्काळात तग धरणारे आणि शाश्वत शेती पिकवण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे आहे. एकूण नैसर्गिक संकटे, शेतीची घसरलेली सुपीकता, कोरडवाहू व बागायती क्षेत्र, पाण्याचे दुर्भिक्ष, बाजारातील मागणी व काय पिकवल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल, याविषयी संशोधन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बारामती कृषी विज्ञान केंद्रात दोनशे एकरांवर पीक प्रात्यक्षिक घेतले जाते. यासाठी पॉलिहाऊस, शेडनेट, ग्रीन हाऊस तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. देशी वाणाबरोबरच विदेशी वाणांचे पीक प्रात्यक्षिक घेतात. महाराष्ट्रात एकमेव यशस्वी आणि भव्य पीक प्रात्यक्षिक म्हणून बारामतीची ओळख आहे. विविध पिकांची लागवड ते काढणीपर्यंतची नोंदणी करून संशोधन केले जाते. औरंगाबादेतदेखील कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या मार्गदर्शनानुसार केव्हीकेच्या शेतावर पीक प्रात्यक्षिक साकारण्यासाठी स्वत: केव्हीके कृषी शास्त्रज्ञांनी दीड एकरावर आणि मराठवाडा शेती साह्य मंडळाचे प्रमुख तथा ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ विजय अण्णा बोराडे यांच्या संकल्पनेतून महाबीजसह बीजोत्पादन कंपन्यांनी पुढाकार घेत तीन एकरांवर मका, बाजारी, हरभरा, कोबी, फुलकोबी, भेंडी, टोमॅटो, मिरची, वांगे, अनेक प्रकारच्या वाणांची लागवड करून रब्बी ज्वारी, करडई, जवस, गहू, सूर्यफूल व त्यामधील आंतरपिके, लागवड तंत्रज्ञान पद्धती, एकात्मिक अन्नद्रव्य आणि कीड व रोग व्यवस्थापन तंत्रज्ञान, हवामान बदलास अनुसरून पीक प्रात्यक्षिक विकसित केले आहे. त्याची पाहणी करून शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. 


सपाट लागवडीऐवजी गादी वाफ्याचा हा होतो फायदा 
शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. यासाठी पाणी जास्त लागते व उत्पादन कमी मिळते. पण गादी वाफा पद्धतीनुसार हरभरा पिकाची लागवड केली, तर सपाट क्षेत्रावरील पाण्याच्या ५० टक्के पाण्यात १८ ते २४ टक्के अधिक उत्पादन मिळते, अशी माहिती कृषी शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे यांनी दिली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी पीक प्रात्यक्षिक व कृषी प्रदर्शनातील तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया उद्योग आदींची माहिती घेतली. 
 

बातम्या आणखी आहेत...