आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी पेरणी 58 टक्केच; रब्बी कर्ज, उद्दिष्ट 70 काेटींचे; वितरीत 13 काेटी 56 लाख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- यंदा रब्बी हंगामासाठी ७० काेटींच्या कर्जाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, रब्बीतील पेरणीची प्रक्रिया जवळपास संपली असून, केवळ १३ काेटी ५९ लाख ५५१ रुपयांचे कर्ज वितरीत झाले आहे. खरीप हंगामात मिळालेले अल्प उत्पन्न, थकबाकी, बँकांसह यंत्रणांची उदासीनता, यामुळे शेतकऱ्यांवर कर्जासाठी सावकाराच्या दारात जाण्याची वेळी आल्याचे उपरोक्त आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. खरीप हंगामातील कर्ज वितरणासारखीच स्थिती रब्बी हंगामातील कर्ज वाटपाची हाेऊ नये, यासाठी लाेकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काेणते प्रयत्न केले, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. यंदा केवळ ३१.३० टक्केच खरीप हंगामासाठी पीक कर्ज वितरीत झाले हाेते. खरिपाचे कर्ज उद्दिष्ट १३३४ काेटी रुपये असताना वितरीत मात्र ४१६ काेटीचे झाले हाेते. 

 

यंदा १ जून राेजीच पावसाने शहरात दमदार एंट्री केली. त्यानंतर एका आठवड्याने ग्रामीण भागात पाऊस झाला. अनेक ठिकाणी पेरणीही झाली. मात्र नंतर वरूण राजाने दीर्घ विश्रांती घेतल्याने पेरणी आटोपलेले शेतकरी चिंताग्रस्त झाले हाेते. यंदा चार महिन्यात ४६ दिवस वरूण राजाने विश्रांती घेतली हाेती. परिणामी खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन प्रचंड घटले. त्यामुळे पिकांना पाणी देण्याची व्यवस्था असलेले शेतकरी रब्बी हंगामाकडे वळले. त्यांनी पैशांची जुळवा-जुळव करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र शेतकऱ्याला बँकांसह अन्य शासकीय यंत्रणांकडून कसा प्रतिसाद मिळाला, हे रब्बी हंगामातील कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आणि झालेल्या वाटपावर नजर टाकल्यास दिसून येते. काही ठिकाणी अल्प पाऊस झाल्याचा परिणामही रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रावर झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

 

असे पडले निकष शेतकऱ्यांच्या मुळावर 
थकबाकीदार असल्याने शेतकरी कर्जापासून वंचित राहत असल्याचे कर्ज वितरणामधील घसरणीच्या कारणांचा शाेध घेतल्यानंतर समाेर आले. शासनाने ३० जून २०१६ ही तारीख गृहित धरून कर्जमाफी केली. त्यामुळे २०१६-१७ व २०१७-१८ या कालावधीत घेतलेले कर्ज न फेडल्याने शेतकरी थकबाकीदार ठरले. ही संख्या जिल्हाबॅंकेची ६३ हजारांवर असून, एकूण थकबाकीदार १ लाखाच्यावर आहे. त्यामुळे थकबाकीदार असलेले शेतकरी कर्जासाठी पात्र हाेऊ शकले नाहीत, असेही तज्ज्ञांचे मत आहे. 

बातम्या आणखी आहेत...