आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार पुत्र, सून, आ. कर्डिलेंच्या दोन्ही कन्यांसह महापौरांचीही प्रतिष्ठा पणाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मनपाच्या आखाड्यात ३३९ उमेदवारांनी उडी घेऊन एकमेकांविरोधात शड्डू ठोकले आहेत. निवडणुकीत भाजपचे खासदार दिलीप गांधी पुत्र सुवेंद्र गांधी, सुनबाई दीप्ती गांधी महापालिकेच्या आखाड्यात उतरलेले आहेत. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची कन्या तथा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची पत्नी शीतल जगताप, कर्डिलेंची दुसरी कन्या ज्योती गाडे देखील रिंगणात उतरल्या आहेत. शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मातब्बरांच्या जय्यत तयारीमुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे. मतदार मात्र, त्यांचा कौल ९ डिसेंबरला देणार आहेत. 

 

महानगरपालिकेच्या निवडणुकीत मातब्बर उमेदवारांच्या लढती पहायला मिळणार आहेत. नेत्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या निवडणुकीत उतरवल्यामुळे कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विधानसभेचे तसेच लोकसभेच्या प्रतिनिधींच्या कुटुंबातील सदस्य रिंगणात उतरल्याने प्रतिष्ठाच पणाला लागली आहे. प्रभाग ४ मध्ये भाजपचे आमदार कर्डिले यांची कन्या ज्योती गाडे या राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपच्या वंदना कुसळकर, तर शिवसेनेच्या कमल दरेकर यांच्यात हा सामना होणार आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचे चिरंजीव योगीराज गाडे शिवसेनेकडून प्रभाग ४ मध्ये उमेदवारी करत आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीकडून जितेंद्र गाडे, तर भाजपचे चंदर मोतियानी यांची लढत होणार आहे. महापालिकेच्या सभापती सारिका भुतकर शिवसेनेच्या उमेदवार आहेत, त्यांच्या विरुद्ध भाजपकडून आरती बुगे, तर राष्ट्रवादीच्या मंदा गंभिरे रिंगणात आहेत. 

 

स्थायी समितीचे विद्यमान सभापती तथा भाजपचे उमेदवार बाबासाहेब वाकळे व शिवसेनेचे अर्जुन बोरुडे यांच्यात थेट सामना होणार आहे. वाकळे यांना ही निवडणूक एकतर्फी वाटत असली, तरी अर्जुन बोरुडे यांचा दांडगा जनसंपर्क असल्याचे विसरून चालणार नाही. त्यामुळे चुरशीची लढत या दोन्ही उमेदवारांमध्ये पहायला मिळेल. प्रभाग ७ मध्ये राष्ट्रवादीचे कुमार वाकळे विरुद्ध अक्षय कातोरे असा सामना रंगणार आहे. प्रभाग ८ मध्ये उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या पत्नी शिवसेनेच्या उमेदवार पुष्पा बोरुडे विरुद्ध भाजपच्या सविता कोटा व काँग्रेसच्या सोनाली सुडके

यांच्यात तिरंगी सामना होईल. 

 

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण स्वत: प्रभाग १० मधून काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात असून त्यांच्याविरुद्ध भाजपचे नरेश चव्हाण, तर राष्ट्रवादीचे जय भोसले यांचे मोठे आव्हान आहे. प्रभाग ११ मध्ये खासदार गांधी यांचे पुत्र भाजपकडून रिंगणात आहेत. गांधी हे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे शेख नजीर अहमद रज्जाक असे आव्हान आहे. या दोन्ही विद्यमान नगरसेवकांमध्ये काट्याची लढत पहायला मिळणार आहे. प्रभाग १२ मध्ये महापौर सुरेखा कदम शिवसेनेच्या उमेदवार आहेत, त्यांची थेट लढत खासदार गांधी यांच्या सुनबाई दीप्ती गांधी यांच्याशी होणार आहे. प्रभाग १३ मध्ये भाजपचे उमेदवार नगरसेवक किशोर डागवाले विरुद्ध मनपाचे सभागृह नेता उमेश कवडे यांच्यात काट्याची लढत पहायला मिळेल, तर श्रीपाद छिंदम याची पत्नी स्नेहा छिंदम याच प्रभागातून रिंगणात आहे, त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीकडून नीलम दांगट, भाजपच्या गायत्री कुलकर्णी अशी लढत होईल. प्रभाग १४ मध्ये राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची कन्या, तर भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची कन्या शीतल जगताप रिंगणात आहे. त्यांच्या विरुद्ध भाजपच्या संगीता गांधी, तर शिवसेनेच्या सुरेखा भोसले रिंगणात आहेत. या लढतीकडेही नगरकरांचे लक्ष असणार आहे. प्रभाग १७ मध्ये शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते विरुद्ध भाजपचे मनोज कोतकर असा रंगतदार सामना होणार आहे. मतदानानंतर निकालाकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. 

 

श्रीपाद छिंदमही रिंगणात 
वादग्रस्त श्रीपाद छिंदम नगरसेवक असून त्याने यापूर्वी उमहापौरपदावरही काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केल्यानंतर त्याच्याविरोधात राज्यभरातून टीकेची झोड उठली होती. परंतु, छिंदमने महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा अपक्ष उडी घेतली आहे. त्याच्या लढतीकडेही सर्वांचे लक्ष आहे. या व्यतिरिक्त काही अपक्ष उमेदवार झुंज देणार आहेत. 

 

मनपा निवडणुकीतील अशा आहेत लक्ष्यवेधी लढती 
निवडणुकीच्या रिंगणात महापौर सुरेखा कदम विरुद्ध दीप्ती गांधी, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे विरुद्ध संजय घुले, पुष्पा बोरुडे विरुद्ध सोनाली सुडके, श्रीपाद छिंदम विरुद्ध अनिता राठोड, सुरेश तिवारी, सभापती बाबासाहेब वाकळे विरुद्ध अर्जुन बोरुडे, सुवेंद्र गांधी विरुद्ध शेख नजीर अहमद, सभापती सारिका भुतकर विरुद्ध आरती बुगे, अनिल शिंदें विरुद्ध दत्ता गाडळकर, मनोज कोतकर विरुद्ध दिलीप सातपुते, शीतल जगताप विरुद्ध संगीता गांधी विरुद्ध सुरेखा भोसले, ज्योती गाडे विरुद्ध वंदना कुसळकर विरुद्ध कमल दरेकर यांच्यातील लढती लक्ष्यवेधी ठरणार आहेत. 

 

२०१३ चेे बलाबल 
महानगरपालिकेच्या २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षीय बलाबल पाहता निवडणूक त्रिशंकु ठरली होती. त्यावेळी शिवसेना १८, राष्ट्रवादी काँग्रेस १८, भाजप ९, काँग्रेस ११, मनसे ४, तर अपक्ष ८ निवडून आले होते. परंतु, २०१८ च्या निवडणुकीत या बलाबलात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतही मनपा त्रिशंकू होण्याची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...