आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चितेवर अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे आधी कुत्र्यांनी, नंतर कावळ्यांनी तोडले लचके

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधी मोकाट कुत्र्यांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडले, नंतर मृतदेहावर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले - Divya Marathi
आधी मोकाट कुत्र्यांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडले, नंतर मृतदेहावर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले

अहमदनगर - अमरधामची सुरक्षा वाऱ्यावर असून मृतदेहाची विटंबना होण्याची शक्यता ‘दिव्य मराठी’ने चार दिवसांपूर्वीच वर्तवली होती. तथापि, मनपाने हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. सोमवारी पहाटेच्या हिंस्त्र कुत्र्यांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडून विटंबना केली. अर्धवट जळालेल्या धडाचे अगोदर कुत्र्यांनी व नंतर कावळ्यांनी लचके तोडले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. मनपात तातडीची बैठक बोलावून अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश महापौरांनी दिले.

अमरधाम स्मशानभूमीत रविवारी १३ ते १४ अंत्यविधी झाले. ओट्यांची संख्या कमी असल्याने काही अंत्यविधी जमिनीवर करण्यात आले. रात्री उशिरा एक अंत्यविधी ओट्याखालीच करण्यात आला. सकाळी काही नागरिक दशक्रिया विधीसाठी अमरधाममध्ये झाल्यानंतर अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्रे ओढत नेत असल्याचे दिसले. त्यानंतर हा प्रकार चव्हाट्यावर येऊन मृतदेहाच्या विटंबनेप्रकरणी संताप व्यक्त होण्यास सुरुवात झाली हा  प्रकार समजताच महापौर वाकळे यांनी अमरधाममध्ये जाऊन पाहणी केली. दुपारी तातडीने विद्युत, आरोग्य व उद्यान विभागाची बैठक त्यांनी घेतली. बैठकीस उपमहापौर मालन ढोणे, उपायुक्त सुनील पवार, डॉ. प्रदीप पठारे, उद्यान विभागाचे शशिकांत नजान, विद्युत विभागाचे पी. एल. शेंडगे, अजय चितळे, संजय ढोणे, अंत्यसंस्कार मंडळाचे स्वप्निल कुऱ्हे आदी उपस्थित होते. महापौर वाकळे यांनी कर्मचाऱ्यांचा कामनिहाय आढावा घेऊन ‘दिव्य मराठी’ने मांडलेल्या सर्व प्रश्नांवर उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

नगर शहरातील नालेगाव येथील अमरधामची मनपाच्या दुर्लक्षामुळे भयावह अवस्था झाली असून तेथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांनाही मरणकळा सोसाव्या लागतात. अमरधाममध्ये अवघे आठ दहन ओटे असून त्यापैकी मोजक्याच ओट्यांना शवदाहिनीच्या लोखंडी जाळ्या आहेत. उर्वरित ओट्यांना जाळ्या नसल्याने त्यावरच सरण रचले जाते. बऱ्याचदा जाळ्या नसल्याने पेटलेली लाकडे ढासळून मृतदेह अर्धवट जळतात. महिलां, तसेच पुरुषांसाठी अमरधाममध्ये स्नानगृहे नाहीत. उघड्यावरच स्नान करावे लागते. स्वच्छतागृहांचीही व्यवस्था नाही. दिवसभर पत्त्यांचे डाव अन् मद्यपींच्या मैफली रंगलेल्या असतात.  अमरधामच्या दुरवस्थेवर ‘दिव्य मराठी’ने २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत तीन भागांची वृत्तमालिका प्रकाशित केली. अमरधामात अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे मनपाचे लक्ष वेधले. वृत्तमालिकेच्या दणक्यानंतर मंजूर असलेली कामे तातडीने सुरू करण्यासाठी मनपाने ठेेकेदाराला पत्रव्यवहार केला. ‘दिव्य मराठी’ने पुन्हा अमरधामात जाऊन तेथील ग्राऊंड रिपोर्ट घेऊन मरणकळा मालिकेचा पाठपुरावा सुरूच ठेवला. त्यावेळी कुत्र्यांचे कळप दहन ओट्याच्या परिसरात घुटमळत असल्याकडे ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधले. तसेच कुत्र्यांकडून मृतदेहाची विटंबना होण्याची शक्यताही वर्तवून छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले. मनपाला याचे गांभीर्य वाटले नाही, पण सोमवारी जेंव्हा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडल्याचे समोर आले, तेव्हा मात्र प्रशासन हादरले. कुत्र्यांचा आठ िदवसांत बंदोबस्त झाला नाही, तर आंदोलनाचा इशारा सत्ताधारी पक्षाचे अजय चितळे यांनी दिला आहे.
  

मृत व्यक्तीच्या नावाची अमरधाममध्ये नोंदच नाही...

नगर शहरातील नालेगाव अमरधामात अंत्यविधीसाठी आणल्यानंतर मृत व्यक्तीची नोंद घेतली जाते. पण विटंबना झालेल्या मृतदेहाच्या नावाची नोंद संबंधित मंडळाकडे नाही. हा मृतदेह बेवारस किंवा वेडसर व्यक्तींचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘दिव्यमराठी’ने या व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी आणणाऱ्या लोकांची माहिती विचारली असता, ते लोक सेवाभावी असल्याचे सांगून त्यांचेही नाव समजू शकले नाही. त्यामुळे या विटंबना झालेल्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच त्याचा अंत्यविधी कोणी केला याचेही नाव समजू शकलेले नाही.

 

बातम्या आणखी आहेत...