आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपक्षांच्या आव्हानांनी गाजणार निवडणूक, प्रभाग १ मध्ये दाेन विद्यमान नगरसेवकांची प्रतिष्ठा पणाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महानगरपालिकेच्या मतदान प्रक्रियेसाठी अवघे काही दिवस हातात राहिल्याने घरोघर पोहोचून प्रचारासाठी जीवाचे रान प्रभाग १ ते ३ मधील उमेदवारांनी केले आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षातील चार विद्यमानांसह शिवसेनेच्या वाघांनी जोरदार तयारी केली आहे. विशेष म्हणजे प्रभागांमध्ये अपक्षांनीही मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे विद्यमानांनी प्रतिष्ठा राखण्याबरोबरच अपक्षांना शह देण्याची रणनिती आखली आहे. तिनही प्रभागांत अपवाद वगळता तिरंगी लढत रंगणार आहे. 


प्रभाग १ मध्ये शिवसेनेचे उमेदवार हेलन पाटोळे, इतरमधून राहुल पाटोळे, शिवाजी साळवे, नितीन शिरसाठ रिंगणात आहेत. या उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यात प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या प्रचार सभेत शहर विकासाचा मुद्दा मोठ्या आवेेगाने मांडणारे कानडे यांनी प्रचाराची यंत्रणा सज्ज ठेवली. तथापि, डॉ. बोरुडे हे विद्यमान नगरसेवक असून या दोघांमध्ये चुरशीचा सामना होण्याची चिन्ह आहेत.

 

शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत बाहेर पडलेल्या शारदा ढवण भाजपकडून रिंगणात आहेत. त्यांच्या समोर शिवसेनेच्या दमयंती नांगरे, मीना चव्हाण यांचे कडवे आव्हान असल्याने येथे तिरंगी लढत रंगण्याची शक्य आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार दीपाली बारस्कर या विद्यमान नगरसेविका असून त्यांच्यासमोर भाजपच्या विद्या दगडे यांचे थेट अाव्हान आहे. तथापि इतर पक्षातील उमेदवार सुरेखा जाधव व सविता रोडे यांनी प्रचार व वैयक्तिक भेटीगाठीला गती दिली, व मतदारांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे. 

 

याच प्रभागात 'ड' मध्ये राष्ट्रवादीचे बारस्कर यांनी कचरा डेपोचा मुद्दा ऐरणीवर आणून तयारी केली. त्यांच्याविरुद्ध शिवसेनेचे चंद्रकांत बारस्कर, भाजपचे संदीप कुलकर्णी, दशरथ शिंदे अशी लढत रंगणार आहे. बारस्कर यांना त्यांच्याकडे असलेली मोठी प्रचार यंत्रणा या जोरावर ही निवडणूक सोपी वाटत आहे. तथापि, निवडणुकीत मतदार कोणतीही जादू घडवून अनेकांचे अंदाजही फोल ठरवू शकतात. 

 

प्रभाग २ मध्ये भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेत तिरंगी लढत 
भाजप उमेदवार विद्यमान नगरसेवक महेश तवले विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार माजी नगरसेवक विनित पाउलबुधे, काँग्रेसच्या रुपाली वारे विरुद्ध भाजपच्या उषा नलावडे, भाजपच्या शीतल शेंडे, शिवसेनेच्या शिल्पा जायभाय व काँग्रेसच्या संध्या पवार अशी तिरंगी लढत होत आहे. याच प्रभागातून शिवसेनेचे वैभव सुरवसे, भाजपचे विशाल नाकाडे विरुद्ध राष्ट्रवादीचे सुनील त्रिंबके

अशी लढत रंगणार आहे. 

 

प्रचार आणि यंत्रणेच्या भ्रमात राहणाऱ्यांचा मतदार टांगा पलटी करू शकतात, अशी काहीशी परिस्थिती या प्रभागात दिसून येत आहे. त्यामुळे निश्चित असा बांधणेच अडचणीचे झाले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार माजी नगरसेवक पाउलबुधे यांनी प्रभागातील प्रश्नांचा अभ्यास करून प्रचार सुरू केला. त्याबरोबरच तवले यांनीही मोर्चेबांधणी केली. या दोघांमध्ये लढत होत असतानाच शिवसेनेचे पांडुरंग दातीर व इतर पक्षातील अभिनय गायकवाड देखील रिंगणात आहेत. हे उमेदवार कसे आव्हान उभे करतात हे आैत्सुक्याचे आहे. महिलांच्या जागेवर काँग्रेसच्या उमेदवार विद्यमान नगरसेविका रुपाली वारे व भाजपच्या नगरसेविका उषा नलावडे यांच्यात सरळ लढत होईल. याव्यतिरिक्त शिवसेनेच्या शोभा सानप, सोनाली कडू रिंगणात आहेत. 

 

काँग्रेसच्या संध्या पवार विरुद्ध भाजपच्या शीतल शंडे यांच्यातील लढत रंगतदार होईल, परंतु ऐनवेळी शिल्पा जायभाय देखील धक्कादायकरित्या आघाडी घेऊ शकतात, असे काही मतदारांचे मत आहे. या प्रभागातील सर्वसाधारण जागेवर राष्ट्रवादीचे सुनील त्रिंबके, शिवसेनेचे वैभव सुरवसे, भाजपच्या विशाल नाकाडे यांच्यात तिरंगी लढत होईल. 

 

प्रभाग ३ मध्ये बसपा, सपाचे आव्हान, अपक्ष जोमात 
प्रभाग ३ मध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या प्रमुख पक्षाबरोबरच बसपा, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी यासह दमदार अपक्षांनी रिंगणात उडी घेतली. या प्रभागातील चारही जागांवरील लढती चुरशीच्या होणार आहेत. बसपाचे उमेदवार फय्याज शेख विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सलिम शेख, भाजपचे सय्यद कैसर असगर यांच्यात लढत रंगणार आहे. 

प्रभाग तीनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपबरोबरच अपक्षांचेही मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे लढती कशा होतील, कोण बाजी मारणार यांचा अंदाज आता जाणकारांनाही वर्तवणे अवघड झाले आहे. तथापि, या प्रभागात बसपचे फय्याज, विरुद्ध राष्ट्रवादीचे शेख सलिम, माजी नगरसेवक मुदस्सर शेख, मीर असिफ सुलतान अशी लढत रंगतदार होणार आहे. याव्यतिरिक्त सय्यद कैसर, रियाज कुरेशी, संजय गाडे, अहमद इसाक, शेख सादिक, सय्यद महंमद अली अझर रिंगणात आहेत. 'ब' जागेसाठी काँग्रेसच्या शबाना शेख, समाजवादी पक्षाच्या समिना पठाण, अपक्ष मिनाज खान अशी तिरंगी लढत रंगण्याची चिन्ह आहेत. याव्यतिरिक्त याच जागेवर परविन शेख (आप), सायरा शेख देखील रिंगणात आहेत. 

 

प्रभागातील 'क' मध्ये काँग्रेसच्या शेख रिजवाना विरुद्ध अपक्ष विद्यमान नगरसेविका नसिम शेख, शेख हमिदा अशी रंगतदार लढत होऊ शकते. परंतु, या प्रभागातील भाजप उमेदवार शेख हसिना रफिक, सपाचे उमेदवार फराह पठाण यांच्यासह शेख सायराबानो बशीर यांनीही निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. घरोघर जाऊन मतदारांच्या भेटी गाठींना गती दिली. त्यामुळे या जागेसाठी प्रसंगी चौरंगी लढतही पहायला मिळू शकते. 'ड' मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक समद खान, अपक्ष उमेदवार वहाब शेख, भाजपचे सय्यद जुबेर यांच्यात तिरंगी लढत होईल. पण, समाजवादी पार्टिचे खान शम्स देखील कडवी झुंज देऊ शकतात. या व्यतिरिक्त या जागेवर शिवसेनेचे भास्कर पांडुळे, समीर पठाण, शेख अल्ताफ, आयुब शेख, समिर जहागीरदार, खलिद शेख आदी उमेदवारही रिंगणात आहेत. 

बातम्या आणखी आहेत...