आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्र उभारणी करणाऱ्या राष्ट्रमाता!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहिल्यादेवींनी देशभर केलेली निर्माण कार्ये आजही प्रेरक आहेत. खरे तर शेकडो राज्यकर्त्यांत वाटल्या गेलेल्या भारत देशाला त्यांनी मंदिरे, घाट, रस्ते, धर्मशाळा आणि बारवांच्या माध्यमातून जोडण्याचे अचाट कार्य केले. आपल्या संस्थानाच्या बाहेर पाहण्याची तत्कालीन राज्यकर्त्यांची प्रवृत्ती नसतानाही अहिल्यादेवींनी केवळ आपल्या होळकर राज्याचा विचार न करता सोमनाथ ते केदारनाथ आणि दक्षिणेत पार रामेश्वरमपर्यंतच्या प्रदेशात आपली निर्माण कार्ये केली. त्याबद्दल त्यांचा आजही सन्मान केला जातो व त्यांना त्यासाठी “राष्ट्रमाता’ असेही म्हटले जाते. परंतु इतिहासकारांच्या नजरेतून सुटलेला भाग म्हणजे बहुसंख्य प्रदेशांतील राज्यकर्ते मुस्लिम असतानाही अहिल्याबाईंनी त्यांच्या राज्यात हिंदू मंदिरे उभारायच्या परवानग्या कशा मिळवल्या हा. यातील काही मंदिरे इस्लामी आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेली होती. त्या निकटच अहिल्यादेवींनी मंदिरे बांधली त्या वेळीही राज्यकर्ते मुस्लिमच होते. केवळ धनाच्या आणि दानशूरता व धार्मिकतेच्या बळावर ही मंदिरे उभारणे अत्यंत अशक्य असेच कार्य होते हे उघड आहे. अहिल्यादेवी केवळ श्रद्धाळू नव्हत्या, तर अत्यंत मुत्सद्दी व धोरणी राजनीतिज्ञ होत्या. 

 

सोमनाथ हे जुनागढ राज्याच्या सीमांतर्गत होते. तेथे बाबी (अथवा बाबई) हे पठाण घराणे राज्य करत होते. जेव्हा मंदिर बांधले तेव्हा मोहंमद महाबत खांजी (पहिला) राज्य करत होता. या घराण्याने मोगल दरबाराशी नेहमीच सख्य ठेवलेले होते. पेशवा दरबारशी त्याचे संबंध चांगले नव्हते. पण सोमनाथ हे भारताचा मानबिंदू मानले गेलेले धर्मस्थान. इतिहासात ते अनेक वेळा उद्ध्वस्त केले गेलेले आहे. औरंगजेबानेही तर ते पुरते नष्ट करण्याचा आदेश दिला होता. अशा स्थितीत तेथेच नसले तर त्याच्याच निकट त्या मानबिंदूची पुनर्स्थापना करणे व तेही मुस्लिम शासक असताना तसे अशक्यच होते.

 

तीच बाब अयोध्येची. अहिल्याबाईंनी अयोध्येला राम मंदिर बांधले तेव्हा असफौद्दुला अमानी हा तेथला सुभेदार होता. काशी विश्वनाथ त्याच्याच अंकित होते. मल्हारराव होळकर यांनी काशी विश्वनाथाच्या मंदिराला उद्ध्वस्त करून तेथे बांधल्या गेलेल्या मशिदीला पाडायचा विचारही केला होता. पण काशीतील तेलंगी ब्राह्मणांनी “तुम्ही निघून जाल आणि पातशहा आमची कत्तल करेल’ अशी भीती व्यक्त करून सर्व मराठा सरदारांकडे गाऱ्हाणे घातले म्हणून ती मशीद मल्हाररावांनी पाडली नव्हती. अर्थात त्या वेळीस मल्हाररावांकडे प्रचंड सैन्याचे बळ होते आणि त्यांचा लष्करी दबदबा मोठा होता. पण अहिल्याबाई सत्तेवर आल्यानंतरची देशातील राजकारणाची दिशा बदलली होती. अंदाधुंदी जास्त वाढलेली होती. अशा स्थितीत अहिल्याबाईंनी या मशिदीला लागूनच जागा मिळवून तेथे काशी विश्वेश्वराची पुनर्स्थापना केली. अयोध्येचे राम मंदिर काय किंवा काशी विश्वनाथ काय, ही बांधकामे करणे अहिल्याबाईंनी कसे शक्य केले हा इतिहास थक्क करणारा आहे.

 

अहिल्यादेवींनी देशभरातील सर्व शासकांच्या दरबारांत आपले वकील नियुक्त केलेले होते. मल्हाररावांनीच त्यांना राजकारणाचे धडे दिले असल्याने त्या जवळजवळ प्रत्येक शासक व मुत्सद्दी यांना चांगल्याच ओळखत होत्या. त्यांचा या शासकांशी दांडगा पत्रव्यवहार जसा होता तसाच आपल्या वकिलांमार्फत होणाऱ्या पत्रव्यवहारातून त्या बित्तंबातम्याही मिळवत असत. पेशव्यांनाही त्यांनी इंग्रजांबद्दल प्रथम सावध केले ते या त्यांच्याजवळील माहितीमुळेच!सोमनाथच्या बाबतीत त्यांनी मुत्सद्दीपणा, आपली प्रतिमा आणि पैशाचा सढळ हस्ते उपयोग केला. तुकोजी होळकर व महादजी शिंदेंच्या प्रबळ सेनेच्या दबावाचा वापर करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे मोहंमद खांजीने अहिल्याबाईंना सोमनाथ मंदिर उभारायला परवानगी दिली. असफौद्दुलाच्या बाबतीत त्यांनी मल्हाररावांच्या नावाच्या दबदब्याचा व दिल्ली दरबारातील वजनाचा उपयोग करून घेतला. अयोध्येत त्यांनी भैरव मंदिरासारखी अजून तीन मंदिरे तर बांधलीच, पण शरयू घाटाचीही बांधणी केली. राम जन्मभूमी अमुकच ठिकाण आहे, अशी काही समजूत त्या काळी अस्तित्वात नसल्याने बाबरी मशिदीशेजारीच नवे राम मंदिर बांधण्याची त्यांना आवश्यकता पडली नाही. टिपू सुलताननेही अहिल्यादेवींना त्याच्याही राज्यात धर्मकार्ये करू दिली. एवढेच नव्हे, तर त्यांना “तत्त्वज्ञ महाराणी’ असेही संबोधले. त्या काळात मंदिरे, रस्ते, घाट, धर्मशाळा याच देशभरातील लोकांना आत्मीयतेने जोडण्याचे साधन होत्या. कोठेही इस्लामचा उपमर्द होणार नाही हे पाहत त्यांनी राष्ट्रीय मानबिंदूही उभारले. अहिल्यादेवींच्या प्रत्येक निर्माणकार्यामागे एक कथा आहे. मुत्सद्दीपणा, नैतिक सामर्थ्य आणि गरज पडली तर दबावही, ही सारी अस्त्रे त्यांनी वापरली ती देशाच्या कानाकोपऱ्यात एक राष्ट्रीयत्वाची भावना जोपासण्यासाठी. त्यासाठी प्रसंगी पेशव्यांशीही मतभेद करून घेतले. वेळ पडल्याने त्यांनी आपल्या व्यक्तिगत संपत्तीवर सत्तेत येताच तुळशीपत्र ठेवले होते. तरीही त्या संपत्तीचा मोह, मग तो अगदी त्यांच्या तत्कालिक युद्ध गरजांसाठी का असेना, अगदी राघोबादादांपासून महादजी शिंदेंनाही अधूनमधून पडेच. पण अहिल्यादेवी त्यांनाही तोंड देत आपले कौशल्य पुरेपूर निर्मितीत लावत राहिल्या. त्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने राष्ट्रमाता म्हणणे उचितच होईल. आज त्यांच्या २९४व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना राष्ट्र ही संकल्पनाही नव्हती तेव्हा भारताला एका सूत्रात गुंफण्यासाठीची निर्माणकार्ये त्यांनी केली हे लक्षात घेत त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...