आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९ विद्यमानांसह आमदार कन्येच्या लढतींकडे लक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर - नगर मनपा निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढला असून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रभागनिहाय उमेदवारांनी प्रचाराचे नारळ फोडून गती दिली. प्रभाग ४, ५ व ६ मध्ये चुरशीच्या लढती पहायला मिळणार आहेत. या प्रभागांत विद्यमान नगरसेवक स्वप्नील शिंदे, नगरसेविका इंदरकौर गंभीर, नगरसेवक योगीराज गाडे, मनोज दुलम, नगरसेविका वीणा बोज्जा, कलावती शेळके, सारिका भुतकर, मनीषा बारस्कर, सभापती बाबासाहेब वाकळे, तसेच भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची कन्या ज्योती गाडेदेखील रिंगणात आहे. त्यामुळे येथील लढतीकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. विद्यमानांकडून विकासाचा आलेख मांडला जात असताना विरोधकांनी मात्र, प्रभागातील प्रश्नांकडे मतदारांचे लक्ष वेधल्याचे चित्र आहे. दरम्यान, तीनही प्रभागांत जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. 

शहरातील प्रभाग ४ मध्ये प्रचार शिगेला पोहोचला असून प्रचाराच्या निमित्ताने वासुदेवांची गर्दी भल्या पहाटपासूनच प्रभागातील रस्त्यांवर दिसू लागली आहे. या प्रभागात नगरसेवक योगीराज गाडे, स्वप्नील शिंदे, इंदरकौर गंभीर यांच्या लढतीकडे लक्ष आहे. सर्वच पक्षांकडून सक्षम उमेदवार देण्यात आल्याने निवडणुकीत चुरस पहायला मिळणार आहे. याच प्रभागातून आमदार शिवाजी कर्डिले यांची कन्या ज्योती गाडे या प्रथमच निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. कर्डिले भाजपचे आमदार असले, तरी त्यांनी कन्येला राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे कन्येच्या विजयासाठी कर्डिले कोणती रणनिती वापरणार याकडे देखील शहराचे लक्ष लागले. 

 

प्रभाग चारचा विस्तार मोठा असून सुमारे १३ हजार ५१७ मतदार आहेत. प्रभागातील रंगतदार लढतींकडे सर्वांचेच लक्ष आहे. राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे यांना आव्हान देण्यासाठी भाजपने वंदना कुसळकर यांना, तर शिवसेनेने कमल दरेकर यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. या तिरंगी लढतीत ऐनवेळी कोण बाजी मारणार? हे १० डिसेंबरलाच स्पष्ट होईल. सर्वसाधारण महिला जागेसाठी भाजपच्या संगीता खरमाळे विरुद्ध राष्ट्रवादीच्या शोभा बोरकर यांच्यातही अटीतटीची लढत होणार अाहे. माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांचे नगरसेवकपद रद्द झालेले अाहे. त्यामुळे राष्ट्रवादीने या निवडणुकीत त्यांची आई शोभा बोरकर यांना उमेदवारी दिलेली आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच तयारीला लागलेले शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक योगीराज गाडे यांनी प्रभाग पिंजून काढलेला आहे. युवा कार्यकर्त्यांच्या जोरावर त्यांनी सुरुवातीपासूनच प्रचाराला गती दिली. तथापि, त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे जितेंद्र गाडे यांचे कडवे आव्हान असणार आहे. दुसरीकडे विद्यमान नगरसेवक स्वप्नील शिंदे यांनी प्रचार यंत्रणा कामाला लावली आहे. मागील निवडणुकीत अपक्ष निवडून आलेले शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे. त्यांच्याविरुद्ध शिवसेनेचे बलराम सचदेव यांच्यासह अपक्ष इंदरकौर गंभीर यांचे कडवे आव्हान आहे. 


पाचमध्ये कराळे, बोज्जा, गंधेंच्या लढतीकडे लक्ष 

प्रभाग ५ मध्ये शिवसेनेशी फारकत घेऊन भाजपशी घरोबा करणारे उमेदवार मनोज दुलम, मनसेची गाडी हुकल्यानंतर धनुष्य हातात घेऊन रिंगणात उतरलेल्या नगरसेविका वीणा बोज्जा, तसेच भाजपचे महेंद्र गंधे यांच्या लढतीकडे लक्ष असणार आहे. या प्रभागात हिंदू राष्ट्रसेना प्रथमच रिंगणात उतरली आहे. भाजप, शिवसेनेत रंगतदार लढती पहायला मिळणार आहेत. 
शिवसेनेशी निवडणुकीपूर्वी फारकत घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणारे मनोज दुलम भाजपकडून रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेचे उमेदवार माजी नगरसेवक जयंत येलूलकर यांच्यात थेट लढत होण्याची चिन्ह आहेत. दुलम यांचे पारडे जड वाटत असले, तरी येलूलकर यांचाही जनसंपर्क दांडगा असल्याने ते कशी रणनिती आखतात याकडे लक्ष आहे. ओबीसी महिला जागेसाठी शिवसेनेकडून विद्यमान नगरसेविका कलावती शेळके आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेच्या वीणा बोज्जा यांचे आव्हान आहे. बोज्जा यांनी ऐनवेळी शिवसेनेतून उमेदवारी करत आव्हान उभे केले आहे. शेळके विरुद्ध बोज्जा विरुद्ध भाजपच्या आशा कराळे अशी तिरंगी लढत याही ठिकाणी दिसणार आहे. सर्वसाधारण जागेवर भाजपचे महेंद्र गंधे मातब्बर मानले जातात. त्यांच्यासमोर शिवसेनेचे पराग गुंड, काँग्रेसचे योगेश सोनवणे यांचे आव्हान आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत हिंदू राष्ट्रसेनेच्या अपक्ष उमेदवार चंद्रकला गेंट्यालही नशिब आजमावत आहेत. या प्रभागातील मातब्बर उमेदवारांमुळे लढती चुरशीच्या ठरतील, परंतु इतर पक्षातील उमेदवारांनीही कंबर कसल्याने प्रस्थापितांना निवडणूक सोपी राहिलेली नाही. एेनवेळी कोण बाजी मारणार व कोण पराभूत होणार याची चर्चा सुरू झाली आहे. 

 

प्रभाग सहामध्ये मातब्बरांच्या लढती होणार चुरशीच्या 
प्रभाग सहामध्ये भाजपमधून इच्छुकांची संख्या वाढल्यानंतर विद्यमान नगरसेविका मनीषा बारस्कर यांना डावलण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी उघड बंडखोरी करत रिंगणात उडी घेतली. या प्रभागात सभापती बाबासाहेब वाकळे, सारिका भुतकर, रवींद्र वाकळे, रवींद्र बारस्कर, वंदना ताठे यांच्या लढतीकडे सावेडीकरांचे लक्ष आहे. कोण बाजी मारणार याचे तर्क लढवले जात आहेत. 

 

प्रभाग ६ मधील चार जागांसाठी कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार असणार याचा अंदाज जाणकारांनाही बांधणे अवघड झाले होते. परंतु, उमेदवारी माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट झाले. सभापती तथा शिवसेनेच्या सारिका भुतकर विरुद्ध भाजपच्या आरती बुगे, राष्ट्रवादीच्या मंदा गंभीरे यांच्यात चुरशीचा सामना पहायला मिळेल. भाजपचे सभापती बाबासाहेब वाकळे यांच्यासमोर शिवसेनेचे उमेदवार अर्जुन बोरुडे यांचे आव्हान आहे. वाकळे हे विद्यमान सभापती असून त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. जनसंपर्काच्या जोरावर त्यांना विजय सोपा वाटत आहे. पण बोरुडे हे देखील दमदार उमेदवार आहेत, हे विसरून चालणार नाही. महिला जागेसाठी तिरंगी लढत पहायला मिळेल. भाजपने डावलल्यानंतर बंडखोर चेहरा म्हणून समोर आलेल्या मनीषा बारस्कर यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यांच्यासमोर भाजपच्या वंदना ताठे तर शिवसेनेच्या पुष्पा वाकळे यांचे थेट आव्हान आहे.

 

या जागेसाठी भाकपच्या उमेदवार उज्ज्वला वाकळे देखील रिंगणात आहेत. ताठे व पुष्पा वाकळे हे दोन्ही उमेदवार संपूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरले असल्याने अनेकांचा अंदाज चुकणार आहे. या प्रभागातील चौथ्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वाकळे, भाजपचे रवींद्र बारस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आकाश दंडवते यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. 

 

या प्रभागात जोरदार प्रचार सर्वच पक्षीयांकडून सुरू आहे. हा प्रभाग संवेदनशील मानला जातो. सावेडीकर या प्रभागात कोणाला कौल देणार हे दहा डिसेंबरलाच स्पष्ट होईल. तोपर्यंत मतदानाचे आवाहन उमेदवार करणार आहेत. दरम्यान, यातून काेण बाजी मारणार याकडे आता लक्ष लागले आहे. 

बातम्या आणखी आहेत...