आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपसाेबत अम्मांचा पक्ष...परंतु अम्मांना पर्याय नाही, मात्र स्टॅलिनने घेतली करुणानिधींची जागा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोस्टरमध्ये करुणानिधींपेक्षा माेठे स्टॅलिन : फोटो चेन्नईतील आहे. येथे डीएमकेच्या पोस्टर्समध्ये स्टॅलिन आपले वडील करुणानिधींपेक्षा माेठे दिसत आहेत. दुसरीकडे एआयएडीएमकेच्या पोस्टर्समध्ये अम्मांचेच महत्त्व दिसत आहे - Divya Marathi
पोस्टरमध्ये करुणानिधींपेक्षा माेठे स्टॅलिन : फोटो चेन्नईतील आहे. येथे डीएमकेच्या पोस्टर्समध्ये स्टॅलिन आपले वडील करुणानिधींपेक्षा माेठे दिसत आहेत. दुसरीकडे एआयएडीएमकेच्या पोस्टर्समध्ये अम्मांचेच महत्त्व दिसत आहे


चेन्नई । चेन्नईतील मरिना बीच व त्याच्या जवळपास राजकीय वातावरण सारखेच आहे. समुद्रातून निघणाऱ्या उंच लाटा व पाेस्टरवर लावलेल्या नेत्यांच्या फाेटाेमुळे दाेघांचे महत्त्व दिसून येते. डीएमकेच्या पाेस्टरमध्ये स्टॅलिनचा विशाल फाेटाे असून दिवंगत करुणानिधींचा फाेटाे लहान आहे. स्टॅलिन एक मजबूत चेहरा म्हणून समाेर आले आहेत. दुसरीकडे एआयएडीएमकेच्या पाेस्टरमध्ये जयललितांचे महत्त्व अजूनही दिसून येते. त्यांचाकडून एक संदेश दिला जात आहे की, आमचा चेहरा अजूनही 'अम्मा'च आहे. 


चेन्नई, पुद्दुचेरी, कडलोर, कांचीपुरम, विल्लुपुरम व धर्मपुरी...या आठ लोकसभेच्या जागांवरील संघर्षही असाच दिसताे. विशेषज्ञ म्हणतात, शशिकलाच्या भावाच्या बंडखाेरीच्या शक्यतेने एआयएडीएमकेने पोस्टरमध्ये अम्माचा चेहराच ठेवण्याची रणनीती ठरवली आहे. चेन्नईतील 'द हिंदू' दैनिकाचे राजकीय पत्रकार डेनिस म्हणतात, 'तामिळनाडूतील राजकारण चेहऱ्यांवरूनच चालते. एआयएडीएमकेकडे असा चेहरा नाही जाे पोस्टरमध्ये अम्माची जागा घेईल.' राजकीय विश्लेषक डाॅ.सुमंत सी रमण म्हणाले, 'चेन्नईतील महापुराची परिस्थिती राज्य सरकार सांभाळू शकले नाही. यामुळे सरकारविरोधात राग आहे. परंतु मागील तीन महिन्यांत मंत्र्यांच्या कामात वेग दिसून आला' 

 

सुपरस्टार रजनीकांत याच्या एका इशाऱ्यावर तामिळनाडूत काहीही हाेऊ शकते. सध्या ते स्वत:ला न्यूट्रल दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. कमल हसनही आपले पत्ते उघड करत नाहीत. मुक्त पत्रकार रामाजयम म्हणतात, 'येथे डबल अँटिइन्कबन्सी आहे. लाेकांना वाटते जयललिता यांच्यानंतर सरकारकडून कामे झाली नाहीत. तसेच माेदी यांच्या जीएसटी, नाेटबंदीसारख्या निर्णयामुळे मध्यमवर्गीय व्यापारी नाराज आहे. जर एआयएडीएमके स्वबळावर लढली असती तर त्यांना जास्त फायदा झाला असता. सर्जिकल स्ट्राइकचा मुद्दा येथे परिणामकारक नाही. परंतु सवर्ण आरक्षणामुळे मध्यमवर्गीय मोदी यांच्या बाजूने दिसत आहे. मात्र, वनियरसारखा ओबीसी समाज या निर्णयाने नाराज आहे.' आणीबाणी आणि द्रविड आंदाेलन पाहिलेले टीसीएसचे माजी कर्मचारी टी.एस.रंगराजन म्हणतात, 'माेदी यांच्याबराेबर आल्यामुळे एआयएडीएमकेचे नुकसान हाेणार असून, डीएमकेला फायदा हाेणार आहे. लाेकांमध्ये तामिळ विरुद्ध हिंदी असा संदेश गेला आहे. हे लाेकांना आवडणार नाही. एआयडीएमके भाजप युतीत माेदींना पुढे दाखवले गेले आहे. परंतु डीएमके-कांॅग्रेस आघाडीत स्टॅलिन यांना पुढे दाखवले गेले आहे. त्याचा फायदा डीएमकेला मिळणार आहे.' 

 

'मन की बात'मध्ये माेदी यांनी येथील स्टार्टअप YOURSTORY चा उल्लेख केला हाेता. या वेबसाइटला माेदी यांनी यावर्षी जानेवारी महिन्यात मुलाखत दिली हाेती. YOURSTORY चे चेन्नईतील विभागीय व्यवस्थापक तिरुपती यांनी सांगितले की, मुलाखतीनंतर आम्हाला खूप सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. यामुळे युवकांमध्ये माेदी लाेकप्रिय आहेत, हे स्पष्ट हाेत आहे. परंतु ही लाेकप्रियतेचे मतांमध्ये किती बदल हाेईल, हे सांगू शकत नाही. सर्जिकल स्ट्राइकचा लाेकांवर विश्वास दिसत नाही आणि केंद्राच्या योजनांसंदर्भात नाराजी आहे. यामुळे भाजप काेणत्या मुद्यांवर निवडणूक लढवेल, असे जेव्हा भाजपचे प्रदेश अध्यक्ष डॉ. तमिलसाई सौदराजन यांना विचारले तेव्हा त्यांनी बाेलण्यास नकार दिला. प्रश्न विचारण्यापूर्वी त्यांनी संवाद साधण्यास हाेकार दिला हाेता. डीएमकेचे राष्ट्रीय महासचिव शालमूगम म्हणाले, नोटबंदी व जीएसटीने बेराजगारीचे प्रमाण वाढले आहे. 

 

कसे असेल मतांचे गणित 

मुद्दे : नोटबंदी, जीएसटीचा प्रभाव 
पुद्दुचेरीच्या अपवाद वगळता इतर १० जागांवर माेठ्या मुद्द्यांचा प्रभाव दिसेल. जयललिता यांच्या मृत्यूनंतर सरकारचे नियंत्रण संपल्याचा समज लाेकांना झाला आहे. नोटबंदी व जीएसटी प्रभावी मुद्दे आहे. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायण सामी यांचा साधेपणा व प्रश्न साेडवण्याची पद्धत लाेकांना आवडते. शेतकरी सम्मानसारखरी याेजना येथे आधीपासून आहे. पुद्दुचेरीत भाजपची चर्चा किरण बेदींमुळे आहे. 

 

आघाडी: शशिकलांच्या भावाकडून नुकसान 
शशिकला यांचा भाऊ व्ही. दिवाकरन यांना अम्मा मक्कल मुन्नेतरा खजगम पक्षाची स्थापना केली. हा पक्ष एआयएडीएमकेची ५ ते १० टक्के मते खाईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. एआयएडीएमकेकडे त्याची भरपाई करणारा एकही चेहरा नाही. भाजप+एआयएडीएमके+पीएमके एकत्र आहे. तर डीएमके, कांॅग्रेस यांची आघाडी आहे. 

 

समीकरण : जाती-धर्म चालत नाही 
चेन्नईतील तीन जागा मध्य, उत्तर व दक्षिणेत निवडणूक जाती, धर्माच्या आधारे लढली जात नाही. उत्तरेत कामगारांची मते निर्णायक आहे. चेन्नईतील सर्वात विकसित भाग दक्षिण आहे. येथील नागरिक उच्चशिक्षित आहे. येथे श्रीमंतांची संख्याही जास्त आहे. यामुळे सवर्ण आरक्षणाचा मुद्दा येथे चालू शकेल. मध्यमध्ये मध्यमवर्गीयांचा प्रभाव आहे. विल्लुपुरममध्ये दलित गेमचेंजर होऊ शकता. 
 

बातम्या आणखी आहेत...