आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्यापेक्षा माझी श्रद्धा मोठी, अशी भूमिका चालणार नाही 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - 'तुमच्या श्रद्धेपेक्षा माझी श्रद्धा मोठी', ही भूमिका चालणार नाही. राज्ययंत्रणेने कोणत्याही धर्माला पाठिंबा देता कामा नये, तर निरपेक्षच असले पाहिजे. धर्माच्या नावावर कोणताही भेदभाव करू नये, अशी टीका मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर रविवारी पुण्यात केली. 

 

'वर्ड््स काउंट' या शब्दोत्सवात ते बोलत होते. 'ऑर्गनायझर'चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ही संकल्पना अंमलात आणणाऱ्या तसेच प्रसिद्ध लेखिका आणि स्तंभलेखिका अद्वैता कला या वेळी उपस्थित होत्या. प्रफुल्ल केतकर यांनी, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, मुस्लिम धार्मिक तत्त्वज्ञान आणि भारतीय राज्यघटना, डॉ. आंबेडकरांची मते इत्यादी मुद्यांवर असदुद्दीन ओवेसी यांना प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना खासदार ओवेसी म्हणाले, भारत हे बहुविध संस्कृती आणि बहुविध धर्म, पंथ असलेले राष्ट्र आहे. देशात राहणाऱ्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रथा तसेच परंपरा आहेत. त्यामुळे भारतामध्ये समान नागरी कायदा आणणे शक्य नाही. हिंदूंमुळे नव्हे, तर केवळ भारतीय राज्यघटनेमुळे भारत हे राष्ट्र धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. राज्यघटना लोकशाहीशी अभिन्न आहे. त्यामुळे राज्ययंत्रणेने कोणत्याही धर्माची बाजू न घेता निरपेक्ष असले पाहिजे. भारताच्या राज्यघटनेतील अनेक कलमांमध्ये धर्मनिरपेक्षता दिसते. घटनेच्या सरनाम्यात विविधता आहे. त्याशिवाय धर्मनिरपेक्षता येऊ शकत नाही. भारतात धर्मनिरपेक्षता आहे, कारण भारताची घटना. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना वाटते तसे हे राष्ट्र हिंदूंमुळे नव्हे, तर केवळ आणि केवळ घटनेमुळेच धर्मनिरपेक्ष राहिले आहे." 

 

बुरख्याबद्दल बोलले जाते, पण, घुंघटवर बोलतो का? 
मुस्लिम धार्मिक तत्त्वज्ञान आणि घटना या विषयावर विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ओवेसी म्हणाले, "मी भारतीय मुसलमान असून त्याचा मला सार्थ अभिमान आहे. 'एआयएमआयएम'चा देशाच्या राज्यघटनेवर विश्वास आहे. मुस्लिमांच्या शरियामध्ये केवळ लग्न आणि घटस्फोट यांच्यासारख्या कौटुंबिक विषयांवर निर्णय घेतले जातात. ते निर्णय मान्य नसतील तर न्यायालयातही दाद मागता येते. पण या गोष्टींचा प्रचंड बाऊ केला जातो. बुरख्याबद्दल बरेच बोलले जाते, पण आपण घुंघटवर बोलतो का? खरे तर महिलांना हवे तसे कपडे घालता आले पाहिजेत. त्यांच्या आवडीनिवडीवर आपले निर्बंध लादले जाऊ नयेत.' 

 

कोण जास्त हिंदू हे दाखवण्याची मोदी-राहुल यांच्यात स्पर्धा 
"सध्या कोण जास्त हिंदू आहे, हे दाखवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यामध्ये स्पर्धा चालली आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये काही फरक नाही. शेतकरी, बेरोजगारी, दलित आदिवासी यांचे प्रश्न वाढत आहेत. मात्र, कायद्याची निवडकपणे अंमलबजावणी केली जात असून, सोयीस्करपणे काहीच व्यक्तींवरचे गुन्हे माघारी घेतले जात आहेत, असा आरोपही ओवेसी यांनी केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...