आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लीबियात शरणार्थी शिबीरावर हवाई हल्ला: 40 जणांचा जागीच मृत्यू, किमान 80 जण जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिपोली - लीबियाच्या शरणार्थी शिबीरावर हवाई हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात किमान 40 जणांचा मृत्यू झाला असून इतर 80 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये प्रामुख्याने आफ्रिकी देशातील नागरिकांचा समावेश आहे. युद्ध आणि दहशतवादामुळे मध्यपूर्व आणि आफ्रिकी देशातील नागरिक चांगल्या आयुष्यासाठी युरोपमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. अशाच लोकांना अडवून या शिबीरांमध्ये ताब्यात ठेवण्यात आले होते. त्याच शिबीरावर हवाई हल्ला झाला.


मीडिया रिपोर्टनुसार, त्रिपोलीच्या ज्या कॅम्पवर हल्ला झाला त्या एकाच ठिकाणी 120 शरणार्थी होते. त्यापैकी 40 जणांचा मृत्यू झाला. तर 80 जण तात्पुरत्या रुग्णालयांत जीवन-मरणाचा संघर्ष करत आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, लीबियाच्या आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. घटनास्थळी सर्वत्र मृतदेह आणि जखमी पडले आहेत. लीबिया सरकारसह संयुक्त राष्ट्रने या घटनेचा तीव्र निषेध केला. तर लीबियातील सरकारविरोधी बंडखोरांनी या हल्ल्यासाठी सरकारलाच जबाबदार धरले आहे.


2011 पासून अराजक लीबिया...
2011 मध्ये लीबियन तानाशहा मुअम्मर गद्दाफीची भर रस्त्यावर हत्या करण्यात आली. तेव्हापासूनच देश बकाल आणि अराजक आहे. गद्दाफीला पायउतार करण्यासाठी ज्या सशस्त्र बंडखोर संघटना स्थापित झाल्या, त्या सर्वांनी आप-आपल्या भागात सरकार स्थापनेचा दावा केला. अशात बंडखोरांमध्येही संघर्ष पेटला. याच सरकारांपैकी एक गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल अकॉर्डला संयुक्त राष्ट्रने पाठिंबा दिला. त्याच सरकारचे नेतृत्व करणारे पंतप्रधान फैज अल-सराज यांनी घटनेचा तीव्र निषेध केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, ज्या शरणार्थी शिबीरावर हल्ला झाला त्याच ठिकाणी सरकार आणि बंडखोरांमध्ये संघर्ष सुरू होता. सोबतच, अमेरिकेकडून सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून लीबियातील सशस्त्र संघटना आणि दहशतवाद्यांना लक्ष्य केले जातो. परंतु, शरणार्थी शिबिरावर हल्ला कुणी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.