आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी सकाळ!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमनचं चार बिघे वावर सुदाम सावकारानं बळकावलं. कोरभर भाकरीचा का होईना; पण तेवढाच आधार होता. तोही असा काढून घेतला गेला. मोलमजुरीवर कसं तरी भागवत होती. सुमनच्या बापाला लेकीचे हाल काही पाहवत नव्हते. म्हणून म्हशीची पारडी सुमनला आणून दिली. तीच ही झेली. सुमननं तिला जतन केलं. तिच्याच जिवावर सुमनचा मोडका संसार आता सावरणार होता.

 

सारं घरच गप झालं. वेळ थांबून राहिली. नुस्ती थांबली नाही, सरकत सरकत आठ वर्षे मागे जाऊन त्या कडूकाळ्या दिवसापाशी स्थिर झाली. अप्पा बाजारला म्हणून घरातून बाहेर पडला. रात्र झाली तरी त्याचा पत्ता नव्हता. सुमनचा जीव टांगणीला लागला. 

 

सरू सरपणाचा भारा घेऊन आली. डोक्यावरचा भारा दणकन ओट्यावर टाकून, घरात आली. आल्या आल्या शिक्काळ्याचं भाकरीचं टोपलं तिनं खाली घेतलं. अन्‌ जेवायला बसली. तेवढ्यात गवत्याही आला. लाकडाचं फळकूट असलेली त्याची क्रिकेटची बॅट त्यानं कोपऱ्यात टाकली. तोही फतकल मारून जेवायला बसला. कढईच्या बुडाला उरलेलं थोडसं पिठलं पाहून तो नाखुश झाला अन्‌ सरूला म्हणाला, 
"सरूताई, काय गं माला ठिवलं का पिठलं? सारंच घेऊन टाकलं!'' 
"तुझे त्‌ डोळेच फुटलेय बाबा! पातिल्याखाली पाह्य; वाटीत काढून ठिवलंय!'' कपाळावर येणाऱ्या झिपऱ्या आवरत सरू रागानं म्हणाली.
सुमन दळण घेऊन आली. आल्या आल्या तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.
"काय गं सरे, गावभर हुंदडून न्हायी आली तं बसली खावटायला? इथं माय  मरमर मरते! त्याचं हाये का 
तुमाला कायी!'' 
"काय गं, सरपण घेऊन आले म्या!'' 
"बरं बरं! जेवण झालं का झेलीला सोड अन्‌ चारायला घेऊन जा!'' 
"आई, माझी शाळा बुडंल. म्या न्हायी जानार!'' 
"ह्ये साळावालेऽऽ कंबरात लाथ घालीन!'' 
"आई म्या न्हायी जानार त्‌ न्हायी जानार!'' 
सरूच्या उलटून बोलण्याचा सुमनला असा काही राग आला; तिनं सरूला झोडपायला सुरुवात केली. तिची आंधळी सासू मध्ये पडली. 
"यंवढं मारावं का लानलव लेकराला?'' 
"चांगली तेरा वर्षांची घोडी झालीय; ती काय लान ऱ्हायली. तुमचा लेक गेला गळ्याला फास लावून. हे उलीउली लेकरं अन्‌ आंधळी आयी ठिवलीय माझ्या मढ्यावर! कसं करायचं म्या यकटीनं? म्याबी घ्यायला पाह्यजे व्हता गळफास! म्हण्जे सुटले आस्ते ह्या जंजाळातून!'' 
आंधळी सासू गप झाली. सारं घरंच गप झालं. वेळ थांबून राहिली. नुस्ती थांबली नाही, सरकत सरकत आठ वर्षे मागे जाऊन त्या कडूकाळ्या दिवसापाशी स्थिर झाली. अप्पा बाजारला म्हणून घरातून बाहेर पडला. रात्र झाली तरी त्याचा पत्ता नव्हता. सुमनचा जीव टांगणीला लागला. नाही नाही ते मनात येऊ लागलं. घरात ये, बाहेर ये.. अशा येरझाऱ्या तिच्या सुरू होत्या. त्यात ती गवत्याच्या वेळी पोटुशी. ती सासूला म्हणाली, 
"अहो, तुमच्या लेकाला बाजाराहून यायला लईच उशीर व्हऊन ऱ्हायलाय!'' 
"आगं, थांबला असंल इडंतिडं; येईल, तू नको जिवाला खावू!'' 
"त्यांचा जीव काही थाऱ्यावर न्हायी बायी. त्या मेल्या सुदाम सावकाराचं कर्ज हाये नं डोक्यावर. शेतात कायी पिकलं न्हायी! त्यानं तंबीच देली; पैसे दे न्हायी त्‌ वावर नावावर कर!'' 
"त्याच्या वाडवडलानपासून अशाच जमिनी हडप करत आले मेले!'' 
"आई, मला भूक लाग्लीय जेवायला दे नं!'' लहानगी सरू म्हणाली. 
"दम धर, तुझा अप्पा आला की बसू समदेच!'' 
"सुमन, तू दोन घास खाऊन घे, दोन जीवशी हाये! पोरीलाही जेवायला दे! आमी मागावून जेवू मायलेक!'' 
मायलेकी जेवायला बसल्या. सुमननं घासही उचलला नव्हता तोच दाराशी बाजारच्या पिशव्या घेऊन गावचा तुकाराम उभा! बाजारच्या पिशव्या पोहोचल्या घरी; पण सरूचा बाप... सुमनचा नवरा... भागाईचा लेक काही पोहोचू शकला नाही! त्यानं फाशी घेतली. पाटाजवळच्या बाभळीला.. 
सुमनचं चार बिघे वावर सुदाम सावकारानं बळकावलं. कोरभर भाकरीचा का होईना; पण तेवढाच आधार होता. तोही असा काढून घेतला गेला. मोलमजुरीवर कसं तरी भागवत होती. सुमनच्या बापाला लेकीचे हाल काही पाहवत नव्हते. म्हणून म्हशीची पारडी सुमनला आणून दिली. तीच ही झेली. सुमननं तिला जतन केलं. तिच्याच जिवावर सुमनचा मोडका संसार आता सावरणार होता. मोलमजुरीचं काम तर करतच होती. आंधळ्या सासूची जबाबदारी अन्‌ उलीउली दोन लेकरं ती वाढवत होती. झेली गाभण राहिली तेव्हा जास्तच वाईट दिवस आले होते. मोलमजुरीचं कामही लागत नव्हतं. मात्र, आता झेली व्यायला आली होती. पोट लोंबकळून आलं होतं. दोन दिवसांत व्याली तर सुमनची दलिंद्री जाणार होती. तीच आता सुमनची आयीबायी होऊन तिच्या फाटक्या संसाराला टाका मारणार होती! म्हणून तर सुमन गेले पंधरा दिवस झेलीची जरा जास्तच काळजी घेत होती. मजुरीच्या कामाला गेली तरी झेलीसाठी गवतगुळी घेऊन येत होती. 
सरू झेलीला रानावनात चारायला नेऊ लागली. आपल्या आईच्या संसाराला शहाणी होऊन मदत करू लागली. एक दिवस सुमन भाकरी थापत बसली होती. सरू चुलीत जाळ घालत होती. सरूला काही आठवलं, ती आईला म्हणाली,
 "आयी, माझ्या शाळेतली मीनाक्षीय नं! त्या नव्या कॉलनीतली. तिडं बऱ्याच जणांना दुधाचे उकाडे लावायचे आहे.'' 
"अगं बायी, बरं व्हईल मंग!'' भाकरीला पाणी लावत तव्यावर उलटी टाकत सुमन म्हणाली. 
"आयी, आपली झेली किती लिटर दूध देईन गं?'' 
"दहा लिटर त्‌ कुडं गेलं न्हायी.''
 सरूनं वीस रुपये लिटरनं दहा लिटर दुधाचा हिशेब बसवला अन्‌ आईस म्हणाली, 
"आपल्याला दोनशे रुपये रोज मिळंल.'' 
"मग तरी मला क्रिकेटची बॅट घेता येईल!'' गवत्या म्हणाला. 
"पाह्य गं आयी  ह्याला क्रिकेटच्या बॅटचं पडलं!'' 
"त्याचं चांग्लं किरकेट काढते म्या!''
"आयी, आपल्या बयीच्या डोळ्याचं आपरेशन करता येईल न्हायी काय गं?'' 
सुमन काही बोलली नाही.. 
अर्ध्या रात्रीच झेलीला वेणा सुरू झाल्या, सुमननं घाईघाईनं सरूला अन्‌ गवत्याला उठवलं. सरू अन्‌ गवत्या लगोलग गावातल्याच जनावरांच्या डॉक्टरकडे निघाले. अंधाराचं भेव वाटायचं त्याचं वय, मात्र बहीणभावंडं रमतगमत निघाले होते. आनंदानं त्यांचं ऊर उचंबळून आलं होतं. 
"गवत्या, आपल्या झेलीला पारडी व्हायला पाह्यजे!'' 
"नाही रेडकू! म्या त्याला नांगराला जुपील!'' 
"वावर आहे का नांगरायला? त्या मेल्या सुदाम सावकारानं घेतलं नं हिसकावून!''
"म्या मोठा झालो नं त परत घेईन त्याच्याकून!'' 
"ऱ्हाव दे! तू तसाच चालला पैलवान.'' 
"काय गं सरूताई?'' गवत्या जरासा गुरंगाटला. 
"अरे, आपल्या झेलीला पारडीच व्हायला पाहिजे! म्हणजे ती मोठी झाली, की तीबी दूध दईल मग आईला कामाला जायचीच गरज राहनार न्हायी. आपल्या झेलीचं दहा लिटर दूध अन्‌ इचं आणखी दहा लिटर; म्हणजे चारशे रुपये रोज आपल्याला पडेल; हायेस कुडं''
सरू अन्‌ गवत्या डॉक्टरला घेऊन आले. अन्‌ समोरचं दृश्य पाहून अवाक् झाले. सुमन गोठ्यातल्या भिंतीला पाठ टेकून बसली होती. झेलीचं पारडू मेलेलंच जन्माला आलं होतं; अन्‌ झेलीही दगावली होती. गवत्या अन्‌ सरू झेलीला बिलगून रडत बसले. त्यांचा चिमुकला हंबरडा किती तरी वेळ सुरूच होता. सुमनच्या आंधळ्या सासूच्या डोळ्यातून घळाघळा पाणी सुरू होतं. सारं संपलं होतं. ज्या म्हशीच्या जिवावर ह्या घराची भाकर चालणार होती, ती म्हैसच दगावल्यानं घर कोलमडून पडलं. सुमनला तर काहीच सुचेना! वाटलं संपून टाकावा हा जीव! अन्‌ व्हावं ह्या साऱ्यातून मोकळं. सुमनच्या डोळ्यासमोर जे दृश्य आलं ते फार भयानक होतं. ती नुस्ती कल्पना असूनही, सुमनच्या काळजाचा थरकाप उडाला.. 
सरूनं अन्‌ गवत्यानं फाशी घेतली होती. 
अन्‌ आंधळी सासूही फासाला लटकलेली.. 
तिला असा काही धरधरून घाम फुटला. डोळ्यांसमोर तरळलेलं दृश्य लांब भिरकावून दिल्यासारखं सुमन ताडकन उठली! पदरानं घाम पुसला. तोच पदर कंबराला खोचला. 
"सरूऽऽ गौतमाऽऽ पोरांनो जा राणू चांभाराला बोलावून आणा! म्हशीला ठिकाण्याला लावावं लागंल!''
दुसऱ्या दिवशी ती उठली अन्‌ मळ्याकडं निघाली. जो मळा सुदाम सावकारानं हिसकावून घेतला होता. त्याच्यावर तिला आता ताबा मिळवायचा होता. चालता चालता तिच्या पायाला ठेच लागली; म्हणून ती खाली वाकली तर झेलीची घाटी हाताला लागली. ठणण आवाज झाला. डोळ्यात पाणी तरळलं; ते पुसत मनोमन म्हणाली, 
"झेले बाई तू मेली! पण जाता जाता मला जित्तं करून गेलीस! त्या सावकारानं थोडीच माझ्या जमिनीची माती तिजोरीत बंद करून ठिवलीय! त्या मातीवर पांभर फिरली तर माझी माणसं जगतील; त्यांना जगवायचं तर मला जमीन परत मिळवलीच पाह्यजे!''
तिच्या डोळ्यात हजार सूर्य फुटून आलेली नवी सकाळ उगवली होती. आता कुठलाच सुदाम सावकार तिला अडवू शकला नसता! तिचं वावर दृष्टीच्या टप्प्यात नाचू लागलं..!

 

ऐश्वर्य पाटेकर
oviaishpate@gmail.com
 लेखकाचा संपर्क : ८८३००३८३६३

बातम्या आणखी आहेत...