Home | Magazine | Rasik | Aishvary patkar writes about Kharchi

खर्ची

ऐश्वर्य पाटेकर | Update - Apr 14, 2019, 12:16 AM IST

कारण तिच्या बरोबरीचे किती तरी म्हातारी-कोतारी बाया माणसं गावातून जत्रेच्या निमित्ताने कमी झाली होती...

 • Aishvary patkar writes about Kharchi

  जत्रा म्हटल्यावर तर राधीच्या आजीच्या काळजाची गोधडी तडतडा उसवली. नात्याची हिरवळ ऊन लागून करपून गेली. कारण तिच्या बरोबरीचे किती तरी म्हातारी-कोतारी बाया माणसं गावातून जत्रेच्या निमित्ताने कमी झाली होती...


  राधीनं चूल-बोळक्याचा खेळ मांडला होता. तिच्या आजीलाही या खेळात तिनं सामील करून घेतलं होतं. नाही तरी, तिला प्रत्येक गोष्टीत आजी लागायचीच. आजीशिवाय तिचं पान हलायचं नाही. आजीलाही राधीशिवाय करमायचं नाही. दोघी एकाच वयाच्या होऊन जायच्या. मैत्रिणीच जणू. आजीनं जरा राधीची गंमत घेतली, म्हणाली,
  ‘राधाबाई ,लई नवरानवरीचा खेळ मांडला; व्हनारचंय यक दिस तुजं लग्न!’
  ‘आजी, मी माझं लग्न झालं की तुला किनी माझ्या घरी घेऊन जाईन!’
  ‘राधाबाई तू तुझ्या मायबापाला यकटी. तशी काही आवश्यकता पडायची, न्हायी!’
  ‘म्हणजे गं, आजी?’
  ‘तुजा नवराच घरजावई व्हऊन येईन इडं!’
  ‘बरंच होईन की मग, म्हणजे माझी आजी माझ्याबरोबरच राहीन!’ आजीला लडिवाळ विलगत ती म्हणाली.
  तेवढ्यात दाराशी तवेरा गाडी उभी करत, राधीचा बाप काशिनाथ घरात आला. आल्या -आल्या आपल्या आईला जरा रागावूनच म्हणाला,
  ‘आई, भर बरं तुजे कपडे!’
  ‘काशी, घास कुटका खाईल अन् पडलं बाबा इडं सांदीकोपऱ्याला,अंगाचं मुटकळं करून! पन म्हातारपनी नको असं माला घराबाहयर कहाडू!’
  ‘आई तुला कुडे म्या घराबाह्यर कहाडतोय, तुला जत्रेला त् घेऊन जातोय!’
  जत्रा म्हटल्यावर तर राधीच्या आजीच्या काळजाची गोधडी तडतडा उसवली. नात्याची हिरवळ ऊन लागून करपून गेली. कारण तिच्या बरोबरीचे कितीतरी म्हातारीकोतरी बाया माणसं गावातून जत्रेच्या निमित्ताने कमी झाली होती. जत्रेला जायला कुणाला आवडणार नाही! आधी गावातील ही माणसं जत्रेला जातात म्हटल्यावर, नवल वाटायचं. कोण कोण हातावर खर्ची टेकवायचं. पण जत्रेला गेलेले कुणीच म्हातारे मायबाप परत आले नाही. मग मात्र जत्रा म्हटलं की गावातील आपला मुक्काम संपल्याची सूचना त्यांना वाटू लागली. आज तीच वेळ राधीच्या आजीवर आली होती. खरं तर आयाबायांकडे ती मोठ्या विश्वासाने अनेकदा बोलली होती की, ‘माझा काशी माला आंतर द्यायचा न्हायी!’ ती काशीला म्हणाली,
  ‘नको बाबा जत्राखेत्रा. न्हायी सोसायची माला; हाडाचा पार चुना जालाय!’
  पण काशिनाथ कुठचा ऐकतो. तो तर निर्दयी झाला होता. त्याने आईचं बखोटं धरलं. ओढत तवेरात बसवू लागला. मात्र राधी बिलगली आपल्या आजीला.
  ‘बाबा, कुठे नेताय आजीला?’
  ‘अगं,जत्रेला घेऊन चाललोय!’
  ‘मग मी पण येणार जत्रेला, आजीबरोबर यायचंय मला!’
  ‘राधे नाहक हट करू नको, तुला न्हायी येता येनार. तू थांब घरी तुझ्या आई बरुबर.’
  ‘मग आजीला पण नका नेऊ!’
  तिने आजीला कवळीच घातली होती. हट्टालाच पेटली होती ती. काशिनाथचा नाईलाज झाला. त्याची बायको त्याला म्हणाली,
  ‘येवद्या नं बरं! तिनं यवढा हट्ट केला तर, येईन तुमच्यासंग परत!’
  राधीला वाटलं, आई असं का म्हणाली, की येईल तुमच्यासंग परत. आजीपण येणारचं नं आपल्याबरोबर परत. ती कशाला राहील जत्रेत. जत्रेत कुठं घर असतं का? तिला आपल्या आईविषयी नवल वाटलं की एवढी मोठी होऊन सुद्धा आईला हे ठाऊक नसावं.
  ही मोठी जत्रा भरली होती. माणसांची अन् दुकानाची गर्दीच गर्दी. राधीला खेळणी घ्यायची होती. तिची नजर भिरभिरत खेळणी शोधत होती. अन् तिच्या आजीचे मात्र डोळे सारखे भरून येत होते. तिला कळलं की, आपल्या लेकाला अन् नातीला आता आपण शेवटीच पाहतो आहोत. तिनं तिच्या कंबराची पिशवी काढली, राधीला जवळ घेत, तिचे पटापट मुके घेत म्हणाली,
  ‘माजे गोडंबे राधाबाई, ही खर्ची ठिव. तुला आवडेल ते घे!’
  ‘असं काय गं आजी, असुदे नं तुझ्याजवळ!’
  ‘न्हायी बायी राहू दे तुज्याकडे, जत्रेत म्या हरवले मग?’
  ‘आजी काही पण! आपले बाबा आहे नं, आपल्या बरोबर; ते हरवून देतील का तुला. काय वो बाबा!’
  काशिनाथ काहीच बोलला नाही. राधीला तिची आवडती खेळणी दिसली.
  ‘बाबा मला ती बाहुली घ्यायचीय!’
  काशिनाथने तिला तिची आवडती बाहुली घेऊन दिली. राधी बाहुलीत बुडाली. रंगूनच गेली. गुंग झाली. काशिनाथने याच गोष्टीचा फायदा घेत गर्दीच्या भिंतीला भेदलं. अन् आईचा हात धरून तो ओढू लागला. निष्ठुरासारखा!
  ‘अरे, काशी कुडं नेतोय माला?’ पण त्याला काहीच ऐकायला येत नव्हतं. त्याच्या मनाचा दगड झाला होता. त्यानं गपकन गर्दीच्या भोवऱ्यात आईचा हात सोडला. अन् गर्दीचं कडं भेदून बाहेरही पडला. राधी अजूनही बाहुलीत गडलेली. तिला काहीच कळलं नाही. राधीचा हात धरून तो झपझप चालत होता.
  ‘आजी आगं माझी बाहुली पाहिलीत का? किती छानय!’ पण आजी कुठे होती?
  ‘बाबा, आपली आजी?’ घाबरत राधीनं विचारलं.
  ‘अरे, हरवली वाटतं! इडं व्हती कुडं गेली?’
  ‘बाबा, तुम्ही आजीचा हात का सोडला? हरवली नं आजी?’
  ती एवढुशी पोर आर्ततेनं हाका मारू लागली, तिच्या आजीला. पण तिचा बाप माणसांच्या डोंगरापलीकडे सोडून आला होता, तिच्या आजीला. तिच्या पिन्हुल्या हाका आजीपर्यंत कुणीच पोचू देणार नव्हतं. ती रडायला लागली. हुमसून हुमसून. तेवढ्यात जत्रेला आलेला एक माणूस घाईनं काशिनाथ जवळ आला. त्याचा चेहरा रडवेला होता. तो कळवळून काशिनाथला म्हणाला,
  ‘अहो, माझ्या आईला पाहिलं का? लाल लुगडं घातल होतं, तिनं अंगात; दिसली का तुम्हाला?
  ‘नाही तर!’ कोरडेपणाने काशिनाथ म्हणाला.
  ‘परत एकदा पहा, अहो तिनंच हट्ट केलं होता, जत्रेला यायचा. एकतर आंधळी आहे माझी आई. गर्दीत हिसका बसला अन् माझ्या आईचा हात माझ्या हातातून निसटला!’ असं म्हणत, लहान मुलासारखं रडू लागला. राधीला नवल वाटलं की, हा माणूस आपल्या बाबाएवढा मोठा असूनही रडतो. जराशानं तिला वाटलं, आपल्याही बाबाची आई हरवलीय, तो तर कुणाला विचारतही नाही अन् रडत नाही, शोधतही नाही.
  ‘राधी, चल बाळा, आपल्याला निघायचंय!’
  ‘आजीला इथं एकटीला टाकून कसं जायचं बाबा?’
  ‘हरवलीय ती, आता न्हायी सापडायची!’
  ‘असं कसं बाबा! आपण शोधू आजीला?’
  ‘राधे मुस्कटात मारीन हं तुझ्या!’
  कसा निष्ठुरय आपला बाबा. तिनं रागानं तिच्या हातात बाहुली फेकून दिली गर्दीत.काशिनाथच्या नकळत. अन् म्हणाली
  ‘बाबा माझी बाहुली हरवलीय!’
  ‘कशी गं यवढी धांदरट तू! शोध इडंच असंल आसपास!’ असं म्हणत काशी शोधू लागला राधीची खेळणी.
  ‘बाबा, तुम्ही आजी हरवली, ती शोधत नाही. माझी बाहुली मात्र शोधता आहात! बाहुली काय, ती परतही घेता येईन. आजीनं दिलीय नं, मला खर्ची; त्यात घेईन! पण आजी थोडीच घेता येईल?’
  तेवढ्यात, ज्या माणसाची आई हरवली होती. तो आला. खूप आनंदी दिसत होता. काशिनाथला म्हणाला,
  ‘दादा,सापडली माझी, आई!’
  राधी त्या माणसाच्या आईला बिलगत म्हणाली,
  ‘आजी, माझी आजी हरवलीय जत्रेत. ती सापडेल काय?’
  ‘सापडेल वो बाळा! तुझी आजी नक्की सापडेल!’ राधीच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली.
  हळूहळू जत्रा पांगू लागली होती. अंधार पडू लागला होता. काशिनाथने राधीला खूश करण्यासाठी बऱ्याच खेळण्या घेतल्या.
  ‘बघ राधी, काय काय घेतलं म्या तुज्यासाठी!’
  एरवी, राधी एवढ्या खेळण्या पाहून हरकून गेली असती. आनंदाने गिरकी घेत नाचली असती पण तिला आता काहीच वाटलं नाही. त्या सगळ्या खेळण्या आजीच्या बदल्यात तिच्यासाठी कुचकामी होत्या. बापाविषयी तिच्या मनात राग साचू लागला होता. ती म्हणाली,
  ‘बाबा खरंच मी मोठी झालीनं, असंच तुम्हाला अन् आईला जत्रेला घेऊन येईन! अन् देईन सोडून!’
  काशिनाथचं काळीज चरकलं. सगळी जत्रा त्याच्याभोवती गरगरली. त्याचं काळीज हुंद्कून आलं. त्यानं आईसाठी हंबरडा फोडला. अन् वेड्यासारखं शोधू लागला आईला. आता आई सापडेल की नाही माहीत नाही. पण खूप मोठं काहीतरी त्याला हरवल्यासारखं वाटू लागलं. तो रडू लागला. अन् ज्याला त्याला विचारू लागला.
  ‘माझ्या आईला पाह्यला का?’
  राधी रडत होती. आजी आजी करत होती. आता आजी सापडेल की नाही माहीत नाही! मात्र आजीनं दिलेली खर्ची, तिनं हातात घट्ट धरून ठेवली होती. त्यातला एकही पैसा ती खर्च करणार नव्हती. त्या खर्चीत असं काहीतरी होतं, जे तिला आजीशी बांधून ठेवत होतं...

  ऐश्वर्य पाटेकर
  oviaishpate@gmail.com
  लेखकाचा संपर्क : ८८३००३८३६३

Trending