आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मळभ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारी मदतीचा एक लाखाचा चेक ग्रामसेवकाने हरी वाघाच्या घरच्यांच्या हाती दिला. आमदारांनी पन्नास हजारांची रक्कम दिली. त्याचा फोटो घेण्यात आला. ते सगळ्यांचे सांत्वन करत निघून गेले. गर्दीत उभ्या असलेल्या तानाजीला वाटलं आपण जर आत्महत्या केली असती तर आपल्या कुटुंबाला अशीच मदत मिळाली असती.

 

शाळेचा गणवेश असेल तरच वर्गात बसायचं! अशी तंबीच त्याला मास्तरने दिली होती. कुठून आणायचा गणवेश? किती स्वप्नं पाहिली होती दादूनं. पण स्वप्न पेरलेली माती कलाकला उलली होती. भेगाच पडल्या होत्या तिला मोठ्या मोठ्या.

 

दादू आडून बसला होता. काल त्याचा शाळेचा पहिला दिवस अन् कालच त्याला वर्गातून बाहेर हुसकावून दिलं. शाळेचा गणवेश असेल तरच वर्गात बसायचं! अशी तंबीच त्याला मास्तरने दिली होती. कुठून आणायचा गणवेश? किती स्वप्नं पाहिली होती दादूनं. पण स्वप्न पेरलेली माती कलाकला उलली होती. भेगाच पडल्या होत्या तिला मोठ्या मोठ्या. बापाला गणवेशचं सांगितलं तर शाळाच बंद होणार! म्हणून मग तो काहीच बोलला नाही. आतल्या आत कुढत राहिला. सातवीपर्यंत गावात शाळा होती. मास्तर खूप चांगले. त्यांना परिस्थिती ठाऊक होती? आता तसं काही नाहीये.  
मुक्ताई काठी टेकत टेकत आली. अन् दादूच्या समोर बसली. अन् त्याच्या तोंडावरून मायेनं हात फिरवत म्हणाली, 
“दादू बबड्या जेवन करून घे! रातीबी तू कायी खाल्लं न्हायी!”
“आजी, माला गणवेश हवाय!”
“दादू, नको हट्ट करू; न्हायी तं तुझा बाप तुही शाळाच बंद करून टाकीन!”
तेवढ्यात तानाजी आला. दादूचा बाप. अन् दादूस म्हणाला,
“काय रे शाळेत नाही जायचंय का?”
“गणवेश घालूनच यायला सांगितलं सरांनी!”
“कुडून द्यायचा रे तुला गणवेश? आभाळ जनणारंय का माती? गणवेश नसला म्हनून काय शाळा व्हणार न्हायी!”
“मग ऱ्हा घरी!”
“न्हायी! माला शिकायचीय शाळा!”
“मग तुझ्या गणवेशासाठी म्या काय कुडं गहाण ऱ्हावू का?”
“गहाण ऱ्हा न्हायी तं कायी करा! माला गणवेश हवा!”
तानाजीचं आधीच डोकं तापलं होतं. पेरणी-वैरणीचा काळ. सावकाराकडून पोरीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज अजूनही फिटलं नव्हतं. त्याचा तगादा नेमकी सुरु झाला. त्यात दादूनं विस्तू टाकला. ते आणखीनच तापलं. 
“गहाण ऱ्हाय म्हण्तो व्हय रं गाबरा..”असं म्हणत तानाजी दादूला मारू लागला. दादूची आजी मुक्ताई मधे आली. अन् तानाजीवर ओरडत म्हणाली,
“आरे काय लहानलव लेकरावर हात टाकून ऱ्हायलाय, उगाच्या उगं!”
“तो काय म्हण्तो पाह्य!”
“आरे गणवेशच मांगितलाय; त्यानं असा हत्तीघोडा त न्हायी मांगितला! समजून सांगायचं का ऱ्हायला मारून!”
“न्हायी त काय! यांचं ह्ये आसंय!” दादूची आई निमा चूल फुंकता फुंकता म्हणाली. 
दादू अंगणातल्या दगडावर येऊन बसला. तेवढ्यात गावाकडच्या रस्त्यानं दोनचार फोर व्हीलर गाड्या हॉर्न वाजवत येताना दिसल्या. पहिली गाडी त्याच्याजवळ येऊन थांबली. ड्रायव्हरने गाडीची काच अर्धीशी  खाली करत त्याला विचारलं.
“ये पोऱ्या हरी वाघाचं घर कुडेय?”
“ते काय पुडं. चिंचीचं झाड दिसतंय नं तिडं!”


गाड्या गेल्या एका मागोमाग. हरी वाघाचा जन्या, दादूच्या वर्गात होता. हरी वाघानं पंधरा दिवसांपूर्वी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. दु:खाचा डोंगरच त्याच्या घरावर कोसळला. दादूला वाटलं होतं की, आता काही जन्या शाळा शिकू शकणार नाही. जन्यासाठी त्याला फारच वाईट वाटायचं. आता मात्र स्वत:साठी वाईट वाटायला लागलं. म्हणजे कीवच आली स्वत:ची. हरी वाघाच्या घरच्यांना सरकारी मदत मिळणार होती. सारं गाव तिथं जमा झालं होतं. दादू कशाला मागं राहील? तोही गेलाच तिथे. सरकारी मदतीचा एक लाखाचा चेक ग्रामसेवकाने हरी वाघाच्या घरच्यांच्या हाती दिला. आमदारांनी पन्नास हजारांची रक्कम दिली. त्याचा फोटो घेण्यात आला. ते सगळ्यांचे सांत्वन करत निघून गेले. ग्रामस्थांनी, कुणी दहा हजार, तर कुणी पंधरा हजार अशा मदतीचा भडिमार झाला. गर्दीत उभ्या असलेल्या तानाजीला वाटलं, आपण जर आत्महत्या केली असती तर आपल्या कुटुंबाला अशीच मदत मिळाली असती. आपल्या पोराला शाळेच्या गणवेशाशिवाय शाळा सोडावी लागणार नाही. काय विचार करतो आहोत आपण? म्हणून त्यालाच वाईट वाटलं. गोमाशी झटकावी तसे त्याने आपल्या मनात सुरू असलेल्या विचारांना हुसकावून लावले. उपरण्याने त्याने त्याचे डोळे पुसले. एवढ्यात गावातले काळे डॉक्टर उठले, त्यांनी वह्या-पुस्तकांचा नवाकोरा सेट लगेच जन्याच्या हातात दिला. त्या नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास दादूपर्यंत तवताक पोहोचला. त्याचे डोळे लकाकले. अजूनपर्यंत त्याला नवे पुस्तकं कधी मिळाली नव्हती. अर्ध्या किमतीत जुनी पुस्तके त्याच्या आधीच्या वर्गात शिकणाऱ्या शिंद्याच्या शकूची तो विकत घ्यायचा. जन्याला मात्र नवीकोरी पुस्तकं! जन्याचं नशीब फळफळलं; हे तर दिलंच, शिवाय शाळेत जाण्यासाठी कोराकाटा सायकलही देण्यात आली. शाळेचा गणवेश डॉक्टरांनी जन्याच्या हातात ठेवला अन् सांगितलं की, आजपासूनच शाळेत जायचं. दादूला तर रडू फुटलं. त्याला तिथं काही बसवलं नाही. तो आपला रडतच घराकडे निघाला. बांधाच्या रस्त्यातून चालायचं सोडून तो भर पिकातून चालू लागला. मातीचा हिरवा गणवेश पायाखाली तडातडा तुडवत होता. दादूच्या दाराशी सायकलीची घंटी वाजली. म्हणून तो दारात येऊन उभा राहिला तर जन्या शाळेत निघाला होता. दादूला खिजवण्यासाठी ऐटीत सायकल चालवत होता. अंगावर नवाकोरा गणवेश. जन्या दिमाखात म्हणाला,
“काय रे दादू शाळेत न्हायी यायचं का?”
“न्हायी!” चिडक्या आवाजात दादूने नकार भरला.
“आरे काय नाहक शाळा बुडवतोय!”
दादूला त्याचा असाकाही राग आला नं, खरं तर आतापर्यंत त्याच्या मनास फारच लागलं होतं अन् जन्यानं असा विस्तू फुंकला होता; मग जाळ होणारच!
“जाय रे भो जन्या, जास्त फुशारकी नको गाजू. तुझ्या बापासारखी माझ्या बापानं आत्महत्या न्हायी केली. केली असती तर मीबी असाच नव्या सायकलीवर गणवेश घालून, ऐटीत शाळेत गेलो असतो!”
हे ऐकून मुक्ताईचं काळीज चरकलं. तानाजीनं जेवत्या ताटातच हात धुतला अन् पायात वहाणा सरकावून बाहेर निघून गेला. दादूच्या आईचा, निमाचा राग अस्मानाला पोहोचला होता. तिच्या काळजात सुरुंग फुटला. चूल फुंकायची फुंकणी घेऊन ती दादूला मार मार मारू लागली. “तुझ्या गणवेशासाठी बापाला आत्महत्या करायला लावतो का मेल्या! कसा रे उलट्या काळजाचा तू!” निमा स्वत:ही रडत होती. पण तिचा मार काही थांबत नव्हता. मात्र मुक्ताई मधे आली. 
“निमा नको ग यवढा रागबोस करत मारू लेकराला!”
“पाहा नं आत्याबाई मंग तो काय म्हणून ऱ्हायलाय!”
“त्याला गं काय कळतंय! लानलव त हाये!”
निमा स्वत:च रडत बसली. मुक्ताईलाही सूनाला काय समजावून सांगावं; म्हणून विचारात पडली. अन तिनही डोळ्याला पदर लावला. मग मात्र फुंदत फुंदत दादू रडायचा थांबला. आईला बिलगला. अन म्हणाला,
“चुकलं आई माझं! मला नाही करायची शाळा. नको तो गणवेश!”
निमानं त्याला खसकन कुशीत ओढलं अन् आणखीनच रडत बसली. मुक्ताईसुद्धा! आता घरालाही हुंदका फुटेल की काय असं वाटत असतानाच; तानाजी आला. त्यानं दादूच्या हातात गणवेश ठेवला. रडणाऱ्या घराच्या चेहऱ्यावर हसू फुटलं..! नवा गणवेश घालून दादू शाळेत जायला निघाला. पाठीवर दप्तर अन मळ्याची वाट तुडवत तुडवत निघाला. आपल्या बापावर जन्याच्या बापासारखी वेळ आपण येऊ द्यायची नाही. इतकं इतकं शिकायचं. खूप शिकायचं..लईच शिकायचं..!! त्याच्या नव्या-कोऱ्या गणवेशचा वास रानभर पांगला होता. हिर्व्या रानाचा गणवेश आणखीनंच उजळून निघाला होता. इतका नवा इतका नवा की दादूचा अन त्याचा सारखाच..!  घुसमटीचं सारंच मळभ दूर सारून मनाचं आकाश स्वच्छ स्वच्छ नितळ नितळ झालं होतं. साऱ्या रानालाच सुखाचा पान्हा फुटला होता..

लेखकाचा संपर्क : ८८३००३८३६३

बातम्या आणखी आहेत...