Home | Magazine | Rasik | aishwary patekar rasik article

शिळ्या भाकरीचं विमान

ऐश्वर्य पाटेकर | Update - Mar 17, 2019, 12:06 AM IST

शिळ्या भाकरीचं विमान तुम्ही पाहिलंय का? नसेलच पाहिलं! या गोष्टीत आहे. गोष्ट म्हटली की मग काहीच अशक्य असतं नाही! ऐकवतो तु

 • aishwary patekar rasik article

  शिळ्या भाकरीचं विमान तुम्ही पाहिलंय का? नसेलच पाहिलं! या गोष्टीत आहे. गोष्ट म्हटली की मग काहीच अशक्य असतं नाही! ऐकवतो तुम्हाला शिळ्या भाकरीच्या विमानाची गोष्ट.


  गौतम खरं तर आठ-पंधरा दिवसांपूर्वीच गावाकडे येऊन गेला होता; पुन्हा इतक्या तातडीने गावाकडे त्याला यावं लागेल, असं त्यास वाटलंही नव्हतं. आईची तब्येत अचानक बिघडली. तसा फोन त्याला आला. खरं तर अप्पा गेले; तसं आपण आईला म्हणतोय माझ्याकडे चल! तर आई ऐकत नाही. तिचा जीव मातीत गुंतून पडलाय. मागे आलो तेव्हा तर ठरवलंच होतं की आईला आपल्याकडेच घेऊन जायचं. आईच्या मागेच लागलो होतो. हट्टच धरला होता आपण.
  ‘गौतमा, लेका नको असा हट्ट करू; न्हायी करमत बाबा मला तुझ्या त्या शहरात. दाराची कडी लावून आत बसायचं!’
  ‘आई, मला काळजी लागून राहते तुझी!’


  ‘आरे नको काळजी करू माझी! नानाची माया तुझ्यागत. तो घेतो नं माही काळजी! तुझी सुमावैनी आईसारखी जपते मला!’
  अन् आज असा फोन येतो. हे खरं की नाना आणि वहिनी खूप चांगले होते. त्यामुळेच तो निर्धास्त होता. तरी गौतमची सात आठ दिवसांत गावी फेरी व्हायचीच. कारण त्यालाच मातीचा वास नाकातोंडात भरल्याशिवाय करमायचंच नाही. स्टँडवर उतरला. गाव आडमार्गाला होतं. तिथे बस जात नव्हती. तो वाजगाव फाट्यावर येऊन उभा राहिला. तेवढ्यात एक बैलगाडी त्याच्याजवळ येऊन थांबली. बैलगाडीवाला म्हणाला,
  ‘काय सायब कुडं जायचंय?’
  ‘वाजगावला?’
  ‘चला मंग बसा गाडीत; माला म्होरल्या गावाला जायचंय रेडगावला. मधी सोडतो तुमाला. का फोर व्हीलरची वाट पाहून ऱ्हायलाय?’
  ‘तसं काही नाही, येऊ द्या!’
  गौतम गाडीत बसला. तसा गाडीवान उत्साहाने सांगू लागला.
  ‘बरं का सायब, शिळी भाकर खाऊन माझं पोर इमानात बसलं; अन् फॉरीनला जानारय पार सात समिंदरापार! आमाला लई कौतुकय त्याचं! त्यालाच सोडायला आलो व्हतो बसस्टँडवर. भल्या पहाटच्या गाडीनं गेलं बी मुबैला. तिडून इमानात बसंल अन् जाईल बुंग करत साता समिंदरापार. तुमाला सांग्तो आम्च्या सात पिढ्यात कुनी इमान पाह्यलं न्हायी!’
  ‘काय करता काका तुम्ही?’
  ‘वाडवडलानी नेमून देलेला शेतीचा गाडा वढतोय; दुसरं काय करनार? पर माह्या पोरानं नाव कहाडलं!’
  ‘मुलाचं शिक्षण काय झालं?’


  ‘मोप शिकवलं. पार विंग्रजी-बिंग्रजी. शिळी भाकर खावून फॉरीनला गेला.’
  गौतमाला त्या बापाच्या डोळ्यातला आनंद मोजता येत नव्हता. आनंद मोजण्याचं मापडं जरी जगात अस्तित्वात असतं तरी ते आनंद मोजण्यात फोल ठरलं असतं. एवढा मोठा आनंद.
  गौतमचं गाव आलं. गाडीतून उतरला. त्याने शिळी भाकर खाऊन परदेशात गेलेल्या पोराच्या बापाला निरोपाचा हात हलवला. त्याने हात जोडले. घरी आला. पाव्हणेरावळे जमा झालेले होते. तो आईच्या अंथरूणाजवळ गेला. आईच उठून बसली.
  ‘आई, ऊठून का बसली? तुला त्रास होतोय नं!’ आईला अंथरूणावर झोपवून त्यानं आईच्या डोक्याला मांडी दिली.
  ‘गौतमा, लेका मी काही जास्त दिवस जगत न्हायी!’
  ‘असं नकोस बोलू आई; मी आलोय नं तुला न्यायला; चांगल्या डॉक्टरकडे दाखवू. ठणठणीत बरी होशील!’
  ‘न्हायी गौतमा, नको आस लावू. तुझ्या आप्पाने इमान धाडलं माला; तुला माहितय माझ्याबिगर तुझे अप्पा राहू शकत न्हायी! चल तुझ्या हातानं मला इमानात बसव! न्हायीतर तुझा आप्पा रुसून बसतील अन जातील इमान परत घेवून. चल लेका नको उशीर करू. ते बघ इमान निगालं, थांबव लेका!’ असं म्हणत गौतमच्या आईनं त्याच्या मांडीवर आपला देह ठेवला. अन् आप्पाचं विमान गौतमच्या आईला घेऊन गेलं...!


  आज एवढी वर्षे उलटून गेली म्हटल्यावर गौतमच्या लक्षात राहिलं असेल का अप्पाच विमान अन् शिळी भाकर खाऊन विमानात बसलेल्या पोराच्या बापाचं ‘शिळ्या भाकरीचं विमान? तर गौतम काहीच विसरला नव्हता. स्टॅँडवर त्याची गाडी थांबली. खाली उतरला. तर पोरांचा हा मोठा लोंढा गलका करत इकडून तिकडे धावत होता. एक माणूस तोंडानं विमानाचा बुंग आवाज काढत अन हाताचे पंख करत विमान उडवत पळत होता. हा मोठाच्या मोठा पोरांचा गलका त्याच्यामागे. गौतमने पोरांना हटकू पाहिलं. पण पोरं कुठे ऐकणार का? त्याला कळलं की तो माणूस वेडा झालेला आहे. अन पोरं त्याला उगाच त्रास देताय. त्याने जोर करुन धरलंच एका मुलाचं बखोटं.
  ‘काय रे का त्रास देताय त्याला?’


  ‘आम्ही कुठे त्रास देतोय; तोच आम्हाला म्हणतोय की विमानात बसा!’
  बाकी मुलंही गौतमभोवती गोळा झाली. अन् विमान चालवणारा तो माणूसही.
  ‘सायब सोडा त्याला. न्हायी तर फलाईट हुकेल नं त्याची! त्याला फॉरीनला जायचंय; न्हायी तर ऱ्हाईल इडच शिळ्या भाकरी खात!
  ‘हा हा आम्हाला विमानात बसायचं आहे!’ लहान पोरांनी गलकाच केला.
  ‘सायब, पोराची इच्छा नगा मोडू बसू द्या त्यायला इमानात!’ बुंग..........बसारे जल्दी इमान निगालं’ आणखी जोराचा बुंग आवाज करत त्याचं विमान निघालं अन पोरांचा लोंढा त्याच्यामागं. गौतम विचार करू लागला की आपण या माणसाला कुठे पाहिलंय? त्याची चरफड झाली. स्वत:चा राग आला. शेवटी त्यानं बसस्टँडवरच्या एका प्रवाशाला विचारलं. बिडीची राख झटकत तो प्रवासी म्हणाला,
  ‘त्यो आमच्या गावचा गणू पानसरेय! यडाय त्यो. म्हण्जे आधी यडा न्हवता. त्याचं झालं आसं जाउद्या मस मोठी हकीगत हाये ती.’ असं म्हणून तो थांबला
  ‘सांगा काका मला कळून घ्यायची आहे त्याची हकीकत!’


  ‘पोराला मोप शिकवलं. लई हुशार! आमच्या रेडगावात सोडा पुऱ्या तालुक्यात कुणी फॉरीनला गेलं न्हायी. गावानं मोठा सत्कार केला याचा. याचं पोरगं फॉरीनला गेलं म्हनून! पण पोरगं जे फॉरीनला गेलं ते परत आलंच न्हायी. पार इसरलं मायबापाला. त्याला लाजच वाटायला लागली किवो मायबापाची! पर यानं आस सोडली न्हवती. माझं पोरगं असं करू शकत न्हायी. असा इस्वासच त्याला व्हता. आज पोरगं येयील उद्या येयील म्हनून हा रोज स्टँडवर येऊन वाट पाहायचा पोराची. लोकांनी लई समजवलं; पण हा आयकायलाच तयार न्हायी. तशातच यक दिवस यड लागलं. तसपासून घरी गेलाच न्हायी. सायब पोटी संतती नसली तरी चालेल पण असं पोर देऊ नये, जे मायमातीला इसरतं असं पोर काय कामाचं!’


  सांगताना त्या माणसाचे डोळे भरून आले होते. अन गौतमचेही! तेवढ्यात शिळी भाकर खाऊन फॉरीनला गेलेल्या पोराच्या बापाचं विमान गौतम जवळून जाऊ लागलं. गौतमने त्याला धरलं.
  ‘सोडा सायब इमान मधीच थांबवता येत न्हायी!’
  ‘इमानाच्या पायलटला भूक लागली असेल नं!’
  ‘हा हा पायलटला भूक लागली. भूक लागली पायलटला!’
  ‘जारे पोरांनो पायलटचं जेवण होईपर्यंत इमान थांबेल.’
  पोरं बाजूला झाली. अन् त्याला घेऊन गौतम जवळच्या उपाहारगृहामध्ये गेला. गौतमची भूक तर मेलीच होती. म्हणून त्यानं शिळी भाकर खाऊन फॉरीनला गेलेल्या पोराच्या बापासाठी जेवण मागवलं. खूप वर्षांचा भुकेला असल्यासारखा तो खाऊ लागला. मध्येच त्याला ठसका लागला. गौतमने त्याची पाठ थोपटत त्याला पाणी पाजलं.
  ‘सायब माझं पोर शिळी भाकर खाऊन इमानात बसलं अन ्फॉरीनला गेलं...’
  ‘........................’
  गौतमला शिळी भाकर खाऊन विमानात बसणाऱ्या पोराच्या बापाविषयी खूप वाईट वाटलं. अन् शिळी भाकर खाऊन परदेशात गेलेल्या पोराला शिळ्या भाकरीचीच लाज वाटायला लागली. याच्याविषयी तर आणखीनच वाईट वाटायला लागलं! विमान उडवायला गणूच्या हातापायात आता बळ आलं होतं. तो गौतमच्या समोरून विमान उडवत निघून गेला. त्याचं विमान एकाजागी थांबणार थोडच होतं...
  कितीतरी कंपन्यांची विमानं आतापर्यंत तुम्ही पाहिली असतील मात्र शिळ्या भाकरीचं विमान जर का पहिल्यांदीच पाहत असाल तर अशी विमानं खूप आहेत...!


  ऐश्वर्य पाटेकर
  oviaishpate@gmail.com
  लेखकाचा संपर्क : ८८३००३८३६३

Trending