Home | Magazine | Rasik | Aishwary Patekar writes about dreams

स्वप्नविक्या...

ऐश्वर्य पाटेकर | Update - Apr 28, 2019, 12:16 AM IST

आतापर्यंत मी लाखो स्वप्नं विकली आहेत. माझ्या स्वप्नांनी लोकांचं दारिद्र्य मिटवून त्यांस गर्भश्रीमंत केलं आहे.

 • Aishwary Patekar writes about dreams

  स्वप्नविक्या म्हणून मी चौमुलखात प्रसिद्ध झालो आहे! आतापर्यंत मी लाखो स्वप्नं विकली आहेत. माझ्या स्वप्नांनी लोकांचं दारिद्र्य मिटवून त्यांस गर्भश्रीमंत केलं आहे. जे गोधडीवर झोपत होते ते गादीवर झोपू लागले. जे सायकलवर फिरत होते. ते चारचाकी मर्सिडीझमधून फिरू लागले! जे झोपडीत राहत होते. ते महालात राहू लागले. अरे हा स्वप्नांचा व्यापार आहे.

  ज्यांनी स्वप्न विकत घेतलं नाही ते लोक घरी आल्यावर हळहळ व्यक्त करू लागले. आपणही जर स्वप्न विकत घेतले असते तर आपल्यालाही खूप पैसे मिळाले असते. काही काही थव्याने उभे राहिले स्ट्रीट लाइटच्या उजेडात. पश्चात्ताप करू लागले. डोक्यात मारून घेऊ लागले. हातची लक्ष्मी लाथाडली म्हणून स्वत:स दोष देऊ लागले.

  सायकलची ट्रिंग ट्रिंग घंटी वाजवत तो गावात आला. लोकांना वाटलं की बुढ्ढी का बालवाला असेल किंवा कुल्फीवाला. लोक घराच्या बाहेर आले. लहान पोरं जणू कुठे गडप झाली होती; अन् ही मोठी माणसं लहान मुलांसारखीच त्याच्या पाठीमागे लागली. ही मोठी गर्दी!! त्याच्याकडे बुढ्ढी का बाल नव्हता ना कुल्फी. मग लोकांना वाटलं हा विकतो तरी काय? लोक मुठीतले अन् खिशातले पैसे चाचपून पाहत होते. लोकांचा कोण हिरमोड झाला की त्याच्याकडे कुल्फी नव्हती. लोक आपापसात कुजबुजू लागले. सायकलच्या कॅरेजला भलीमोठी स्वप्नाची पेटी तो बांधून आला होता. लोकांना हे माहित नव्हतं. त्यास कुणी विचारेनाही! मात्र त्यातला एक जण बोललाच.
  ‘अरे, तू विकायला काय आणलंय?’
  ‘स्वप्न विकायला आणलीय. घ्यायची का तुम्हाला?’
  ‘चल काही तरीच सांगू नको. स्वप्न ही काय विकायची गोष्ट आहे काय? की तू आम्हाला वेड समजलास!’
  ‘नाही तर काय? वेडं बनवायचे धंदेच उघडलेत ज्याने त्याने अलीकडे!’
  ‘तुझ्या भोंदूगिरीला बाकीचे बळी पडले असतील!’
  ‘नाही खरं तेच सांगतोय!’
  ‘चल बाबा पुढच्या गावाला लाग!’
  ‘मला एका गोष्टीचं विशेष वाटतं की तुमच्या गावापर्यंत माझं नाव कसं पोहोचलं नाही. स्वप्नविक्या म्हणून मी चौमुलखात प्रसिद्ध झालो आहे! आतापर्यंत मी लाखो स्वप्नं विकली आहेत. माझ्या स्वप्नांनी लोकांचं दारिद्र्य मिटवून त्यांस गर्भश्रीमंत केलं आहे. जे गोधडीवर झोपत होते ते गादीवर झोपू लागले. जे सायकलवर फिरत होते. ते चारचाकी मर्सिडीजमधून फिरू लागले! जे झोपडीत राहत होते. ते महालात राहू लागले. अरे हा स्वप्नांचा व्यापार आहे. अन् ही तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे! तुम्ही दवडता आहात. रंकाचा राजा करतो मी एका रात्रीत; अशी ताकद आहे स्वप्नांत!’
  ‘कसा चालतो बाबा तुझा हा स्वप्नांचा व्यापार?’
  ‘अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने!’
  ‘कसा तो?’
  ‘तुम्ही मला दहा पैसे द्या त्या बदल्यात मी तुम्हास शंभर पैसे देईन
  तुम्ही मला शंभर पैसे द्या त्याचे मी दहा रुपये देईन
  तुम्ही मला दहा रुपये द्या त्याचे मी शंभर रुपये देईन
  तुम्ही मला शंभर रुपये द्या त्याचे मी पाचशे रुपये देईन
  तुम्ही मला पाचशे रुपये द्या त्याचे मी पाच हजार रुपये देईन
  तुम्ही मला पाच हजार रुपये द्या त्याचे मी लाख रुपये देईन
  तुम्ही मला लाख द्या मी करोड देईन
  लोकांचे डोळे दिपले. तोंडाचा आ वासला. भोवळ यायची बाकी राहिली. मात्र तवताक लोक भानावर आले.
  ‘ये बाबा डोकं फिरायच्या आत तुझा पाय उचल गड्या या गावातून!’
  ‘हा पैसे असे देणार आहे, जशी याच्या बापाची पैशाची फॅक्ट्रीच आहे जणू!’
  ‘अरे अर्ध आयुष्य मातीत गेलं, अजुक येवढे पैसे पाह्यले न्हायी!’
  ‘यवढी जर का तुही दानत आहे तर गावोगाव असा भटकतो का बाबा?’
  ‘मला तुम्हाला श्रीमंत झालेलं पाह्यचं आहे!’
  ‘नको गंडू बाबा गरीब दुबळ्याला एखादा शेट-सावकार शोध!’
  ‘आमच्या खिसात एखादी फुटकी कवडी सापडेल तुला!’
  ‘तिच फुटकी कवडी द्या मला. अन् विश्वास ठेवा या स्वप्नविक्यावर. एका फुटक्या कवडीत रंकाचा राजा करुन दावतो तुम्हाला!’
  ‘पक्का घोरपडीसारखा चिकटला राव तू आम्हास, नादही असा दावला तू पैशाचा की मन फशी पडायलाही राजी व्हऊन ऱ्हायलंय!’
  ‘नको रे जादू करू आम्हास रंकच ऱ्हावदे!’
  मग मात्र स्वप्नविक्याचा घोर हिरमोड झाला. त्यानं काढता पाय घेण्याचा विचार केला. हे लोक समजदार आहेत. त्याहूनही शहाणे आहेत. आपल्या गळाला लागणार नाही. याची खात्री पटली अन तो पाय उचलता झाला. पण त्यातल्या एक दोघांनी केलीच हिंमत. एकाने दहा रुपये दिले. स्वप्नविक्याने त्यास शंभर रुपये दिले. दुसऱ्याने थेट शंभर रुपये दिले. त्यास पाचशे रुपये मिळाले. स्वप्नविक्याने त्याची पेर केली. त्याला माहीत होतं की आता इथे खूप मोठं स्वप्नांचं पीक उगवून येणार. अन् त्याने उत्साहाने आपल्या सायकलवर टांग मारली. जोरजोरात पायडल मारत त्याची सायकल दटवत निघून गेला.
  ज्यांनी स्वप्नं विकत घेतलं नाही ते लोक घरी आल्यावर हळहळ व्यक्त करी लागले. आपणही जर स्वप्न विकत घेतले असते तर आपल्यालाही खूप पैसे मिळाले असते. काही काही थव्याने उभे राहिले स्ट्रीट लाइटच्या उजेडात. पश्चात्ताप करू लागले. डोक्यात मारून घेऊ लागले. हातची लक्ष्मी लाथाडली म्हणून स्वत:स दोष देऊ लागले. एकमेकांवर तोंड टाकू लागले. मात्र ज्या दोघांनी स्वप्नं विकत घेतली होती ते वेळेवर आले अन् त्यांनी भांडण सोडवलं.
  ‘अरे भांडता कशासाठी, स्वप्नच विकत घ्यायचे आहे नं तुम्हाला?’
  सगळेच एकदम कालवा करत म्हणाले,
  ‘हा हा आम्हाला विकत घ्यायचेय स्वप्न...’
  ‘झालं तर मग! स्वप्नविक्या गावातून गेला म्हणजे आपल्या आयुष्यातून थोडाच गेला. तो परत येईन. आम्ही बोलवू त्याला. तुम्ही मात्र तयार राहा!’
  ‘आम्ही एका पायावर तयार आहोत!’
  दुसऱ्या फेरीत स्वप्नविक्या आला तेव्हा लोकांनी त्याच्याभोवती प्रचंड गर्दी केली. त्यातल्या शे-दोनशे जणांनी स्वप्न विकत घेतले. त्यांना खूप पैसे मिळाले. ते पाहून इतरांनाही अभिलाषा झालीच. मग स्वप्नविक्यावर लोकांचा पराकोटीचा विश्वास बसला. प्रत्यक्ष देव जरी आला असता अन् लोकांस या पासून त्याने परावृत्त करी पाहिलं असतं तर लोकांनी देवास अवमानकारक शब्द उच्चारून हुसकावून लावलं असतं. लोकांनी स्वत:जवळचे होते नव्हते तेवढे पैसे स्वप्नविक्याला दिले. त्यानेही कुठलीही कसर न ठेवता लोकांना मालामाल करून टाकले. लोक आधीचे होते तसे राहिलेच नाही. पैसेच बोलायचे अन् पैसेच चालायचे. त्याचं उठणं, बसणं, हसणं, बोलणं, झोपणं, खाणं-पिणं सारं सारं काही पैशात बदलून गेलं. लोक लोकच राहिले नाही त्यांचे पैसे होऊन गेले. ही सारी किमया केली एकट्या स्वप्नविक्याने...
  मधले काही दिवस गेले असतील. पुन्हा एकदा स्वप्नविक्या गावात आला. लोकांचं ही गर्दी. स्वप्नविक्याचं तोंड दिसत नव्हतं. जो तो टाचा उंचावून त्याचे तोंड पाहाण्याचा प्रयत्न करू लागला. काही तर गर्दीला ढूसण्या देत त्याच्यापर्यंत पोहचलेच. त्यावर त्यानेच तोडगा काढला. साऱ्यांना खाली बसण्याची सूचना केली. काय आश्चर्य एका क्षणात गर्दी ढुंगण टेकून जमिनीवर बसली. आता जर का तो म्हणाला असता सगळ्यांनी बैल व्हा! तर सगळ्याचेच बैल झाले असते. तो जर का म्हणाला असता सगळ्यांनी शेळ्या व्हा! तर सगळेच शेळ्या झाले असते. प्रश्न पैशांचा होता. तो देणारा स्वप्नविक्या. त्यासाठी लोकांची काहीही करायची तयारी होती.
  आता मात्र त्याने लोकांना वेगळे अन् अतिशय आकर्षक स्वप्न दाखवले. त्यानं असा वायदा केला की तत्काळ घेतले तर दहाचे शंभर मिळतील. दोन दिवस जर का थांबणार असाल तर दहाचे पाचशे रुपये मिळतील. आठ दिवस थांबणार असाल तर पाच हजार मिळतील. दोन महिने थांबलात तर लाख रुपये मिळतील. चार महिने थांबलात तर एक करोड. लोकांना हा सौदा मोठ्या आनंदाने मंजूर झाला. का होणार नाही. दहा रुपयांत करोडोपती होण्याची ती संधी होती. लोक अतिशय शहाणे होते. त्यामुळे ती संधी ते बिलकूलही सोडणार नव्हते. फक्त चार महिन्यांचाच तर प्रश्न. ते असे उडून जातील पाखरागत.
  लोकांनी स्वत:जवळचे होते नव्हते तेवढे पैसे त्याला दिले. लोकांकडचे पैसे संपले तेव्हा ज्याचे ज्याचे पैसे होऊ शकतील असे, जमीनजुमला. घरदार, गुरंढोरं, बैल-बारदाना अगदी सारेच विकले अन् त्याचे पैसे करून चार महिन्यांच्या वायद्यावर मोठे आणि घसघशीत स्वप्नं स्वप्नविक्याकडून विकत घेतले.
  आता लोकांच्या अंगावर फक्त कपडे शिल्लक राहिले होते..
  चार महिने उलटून गेले
  त्याच्या नंतरचेही चार महिने उलटून गेले..
  लोकांनी स्वप्नविक्याची खूप वाट पाहिली; पण तो काही परतला नाही
  अंगावरचे कपडे फाटून लोक नागवे झाले...!
  आता याही गोष्टीला चाराच्या पटीत गुणत राहिलं तरी कित्येक शतकं उलटून जातील
  तरी स्वप्नविक्या परतणार नाही...
  कदाचित येईलही, पण नव्या अवतारात..!

  ऐश्वर्य पाटेकर
  [email protected]

  लेखकाचा संपर्क : ८८३००३८३६३

Trending