आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रक्ताचं नातं आपण गृहीत धरून चालतो. आपला या नात्यावर गाढ विश्वास असतो. प्रसंगी श्रद्धाही असते. त्यातूनच नात्याला अलौकिकता प्राप्त होते. पण रक्ताच्या नात्यावर मानवी स्वार्थ वरचढ ठरतो. अपेक्षाभंगाचं असह्य दु:ख हा त्याचाच परिपाक ठरतो...


भल्यामोठ्या वाड्यासमोरचा लिंब एकाकी उभा होता. त्याला जर बोलता आलं असतं, तर ‘मी फार उदास झालो आहे!’ असं त्यानं त्याच्या सुकून गेलेल्या फांदीफांदीतून सांगितलं असतं. नेहमी अंगणात येणारे चिमणी-कावळेही दाणे न उचलता निघून गेले होते. एवढेच नाही तर गोठ्यातली गायही चारा खाणं विसरली होती. कुत्रं भाकरीच्या समोर नुसतंच तोंड टेकून बसलं होतं. त्याची भाकरीवरची इच्छाच उडाली होती. वाड्याच्या दारी सुतकी कळा पसरून राहिली होती. त्याला कारणही तसंच होतं; वाड्याचं चैतन्य असलेले अप्पासाहेब धरणीला खिळून शेवटचे श्वास मोजत होते. त्यांचा जीव त्यांच्या दोन्ही लेकांत अडकून पडला होता. दोन्ही लेक मुलखाला.
अप्पासाहेसाहेबांची पत्नी, सारजामोठ्याई रस्त्यांकडे डोळे लावून बसली होती. लेक आता येतील; मग येतील! पण अजूनही तिच्या एकाही लेकाचा पत्ता नव्हता. रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्यास  उगा विचारत होती. 
‘काय रे सुदाम, फाट्यावरच्या गाडीतून कुणी उतरलं नाही का?’
‘न्हायी तं मोठ्याई. कुणी येनार व्हतं का?’
‘अरे अभय अन् विष्णू यायचे; अप्पांचा जीव अडकला नं त्यायच्यात!’
‘येतील येतील शेवटची गाडी यायचीय अजून!’
असं म्हणत सुदाम निघून गेला अन् शेवटची गाडीही! सारजामोठ्याई हिरमुसली. तिचं कुंकू उडून जाणार या भयानं आधीच अर्धी झालेली मोठ्याई, दु:खी कष्टी झाली. तिच्या डोळ्यासमोर भरभर काळ निसटत होता. जेव्हा तिनं अप्पासाहेबांबरोबर लग्न करून; या घरात पाऊल टाकलं. तेव्हा झोपडीचा वाडा, मोठ्या कष्टानं उभा केला. पण आज त्या वाड्याला तडे जाऊ लागले होते. वाड्याचा खांबच जर असा निखळून धरणीवर पडला, तर वाड्यानं कुठवर तग धरावी? तिचे दोन्ही लेक तिच्या पदराखाली वाढले. थोरल्या विष्णूचा बापात जरा जास्तच जीव होता. तिला आठवलं.
विष्णू आठदहा वर्षांचा असेल तेव्हाची गोष्ट. अप्पासाहेबांचे पाय चिखलाने भरले होते. आप्पासाहेबांनी विष्णूला हाक मारली,
‘बाळा, विष्णू पाणी आण रे बदली भरून!’
‘अप्पा किती पाय भरले तुमचे चिखलाने!’
‘अरे पाणी देऊन आलोय पिकाला; मग पाय भरणारच!’
‘अप्पा, तुम्ही पाय ठेवा दगडावर!’ असं म्हणत विष्णूनं अप्पासाहेबांचे पाय धुऊन दिले. घरात आल्यावर लाकडी खुर्चीवर बसायला सांगितले. अप्पासाहेब नवलानं पोराच्या हरकतीकडे पहात राहिले. विष्णू त्यांच्या पायथ्याशी बसला. पाय मांडीवर घेऊन उपरण्यानं पुसून देऊ लागला. मोठ्याई चहा घेऊन आली. तीही अप्रूपानं पाहत बसली. 
‘अग्गोबाई, तुमचा लेक बघा किती सेवा करून राह्यलाय तो, बरं का बाळा! अशीच माया राहू दे मोठेपणी! नाही तर व्हायची पातळ!’
‘लेक कुणाचाय सारजा! जळू नको, उगा बापलेकाच्या मायेवर!’ अप्पा मिशा पिळत फुशारकीनं म्हणाले.
‘अप्पा, मी मोठा होईन तेव्हा, तर तुम्हाला कुठलीच कामं करून देणार नाही!’
अप्पासाहेबांचा तो मूठभर आनंद अजूनही मोठ्याईच्या काळजाच्या कागदावरून पुसला गेला नव्हता. तो तसाच ताजा होता, मात्र आज दुखरी कळ सारजामोठ्याईच्या काळजाला बिलगून आली. बापावर डोंगराएवढी माया असलेल्या विष्णूला, बापाचा निरोप मिळूनही यायला उशीर होतोय. ती स्वत:शीच हसली. अन् आठवणींची गाठ पुन्हा सोडू लागली.

 

थोरला विष्णू अप्पाचा; तर धाकला अभय आईचा. अभयला सर्वच गोष्टींत आई लागायची. आई पापणीआड झाली, की कासावीस होणारा लेक आज आईच्या डोळ्यांच्या पापण्या, वाट पाहून पाहून गळायची वेळ आली; तरी त्याचा यायचा पत्ता नाही! म्हादू चहा घेवून आला.
‘आयसायब च्या घ्या!’
‘काय रे म्हादू, कधी येतील ही पोरं?’
‘येतील येतील नौकरीची माणसं ती! आपल्यासारखी रिकामी थोडीच हाये! सुट्टीसाठी आर्जफाटं करावं लागतं त्यास्नी; त्यात येळ जानारंच!’
‘हो रे बाबा म्हादू, मनाला उगा समज घालायची! माया फार तकलादू असते; कचाकड्याच्या खेळणीसारखी! जाते फुटून. उन्हातान्हात झिजून हे सारं उभं केलं, त्यांच्यासाठी! पण त्यांना आहे का त्याचं काही? बाप मरणदारी वाट पाहून राहिलाय त्यांची. आपल्या माणसांपेक्षा कामे मोठी झाली का म्हादू?’
‘आयसायब! नका मनाला लावून घेऊ; चांगले हायेत आपले मालक!’ 
तेवढ्यात दारात अभयची गाडी येऊन उभी राहिली. गाडीतून उतरल्या उतरल्या अभयनं आईचं दर्शन घ्यावं, गहिवरून बापाकडे धाव घ्यावी! पण तसं काहीच झालं नाही. तो म्हणाला,  
‘आई, काय गं विष्णूदादा नाही आला का अजून?’
‘तू आला नं! येईल तोही; निघालं असेल काही काम!’
‘त्याला फोन करून कळवलं होतं मी की, मला सुटी नाहीये म्हणून! पण त्याचं असंचंय!’
‘सूनबाई, पोरांना नाही आणलं बरोबर?’
‘त्यांचं काय काम आई! मी आलोय नं !’
‘माझ्या मेलीच्या लक्षात कुठं आलं की, अप्पाचा जीव तुमच्यात अडकला होता. तुमच्या लेकराबाळांत थोडाच?’
‘आई टोमणे नको मारू; त्यांचा जीव रमला नसता इथं! म्हणून नाही आणलं. मी तर मोठ्या मुश्किलीनं आलोय!’
‘बरं झालं बाबा तू आला; थकला असशील, आधी चहापाणी घे!’
‘चहापाणी रस्त्यातच झालं आई!’
सारजामोठ्याईच्या जिवाला फार लागलं. ज्या पोराचं आईशिवाय पान हलत नव्हतं; त्याला आता आईचीही आवश्यकता राहिली नव्हती. आल्या आल्या बापाकडे जाऊन साधी चौकशी करावी, तर तेही नाही. काळ फारच बदलला. माणसाला माणसाची कवडी गरज उरली नाही. अभय खूपच मोठा झाला; असं तिला जाणवलं. काळजात सुपारी चरचरत गेल्यासारखी वाटली. जरा वेळानं विष्णूही आला. तोही एकटाच.
सारजामोठ्याईचा हात दोन्ही लेकांच्या हातात देत अप्पासाहेबांनी जीव सोडला. सतीगती लावून आल्यावर मोठ्याई खांबाला टेकून बसलेली. खरं तर तिचा जीव आप्पासाहेबांबरोबर निघून गेला होता. कुडी तेवढी मागं राहिली होती. पोरांची कोरडी झालेली माया पाहून स्वत:लाच खिजवल्यासारखी पुन्हा एकदा आठवणींची गाठ सोडून बसली.
‘सारजा, माझे दोन्ही लेक फार गुणीय. आपल्याला कधीच अंतर देणार नाही!’
‘अवो,पण शहराचा वारा लागला नं, त्यांना मातीत काही करमणार नाही. म्हणून म्हणते, पुरी झाली शाळा. आपण एवढं कुणासाठी कमवून ठेवलंय?’
‘माती काही कुणी खंदून नेणार नाही, सारजा!’
‘अवो,पण मला नाही गमायचं बाई लेकांशिवाय! शाळा काय गावात राहूनही करता येईन की!’
‘सारजा, मला तुझं कळतंय, पण आपले लेक तसे नाही!’
‘सोन्याचा पाळणा करूनच घेऊन जातील काशी यात्रेला!’
‘नेतील नेतील माझं म्हणणं आठवेल तुला!’
सारजामोठ्याईला आज सारंच आठवत होतं. त्याचं काय करायचं? दशक्रियाविधी झाला नाही, तोच दोन्ही लेकांत वाटणीवर चर्चा सुरु झाली. मोठ्याईच्या काळजावर कुऱ्हाड  बसल्यासारखी झाली. अस्तराचा धागा धागा उसवला; त्याला कुठल्या सुई-दोऱ्यानं शिवणार? अन्् कशासाठी?
‘दादा, वाटणीचं काय?’
‘ते आताच मिटवून टाकू! परत काय येणं होणारंय का आपलं!’
‘मलाही तेच वाटलं होतं!’
‘हे बघ, आंब्याचा मळा अन् म्हसोबाचं पन्नास एकर मी घेतो, हा वाडा अन् सत्तर एकराचं वाड्याचं वावर तुझ्या वाट्यावर!’
वकिलाला अन् तलाठ्याला वाड्यात बोलवून वाटणी कागदोपत्री केली. थोरल्याला काही तरी काम होतं, तो घाईघाईनं निघूनही गेला. धाकल्याच्या वाट्याला वाडा आला होता. त्यानं दाराला कुलूप लावलं; अन् गाडीचा धुराळा उडवीत, तोही निघून गेला.
आई मागे एकटीच उरली होती; तुळशीवृंदावनाला टेकून बसलेली. म्हादू आला. म्हणाला,
‘आयसायब चलावं माझ्या घरी!’
आई काहीच बोलली नाही. म्हादूनं हात लावला. तशी आई जमिनीवर घरंगळली.
आई कुणाच्याच वाटणीवर गेली नाही...!
आईची वाटणी राहिलीच...

ऐश्वर्य पाटेकर
oviaishpate@gmail.com
संपर्क : ८८३००३८३६३