आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कावळा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐश्वर्य पाटेकर  

सुनीलला राग आला होता. त्याला म्हणावसं वाटलं, की टाका दान करून. म्हणजे मला परत परत ऐकावं लागणार नाही. ज्याच्या जिवावर मळेतळे उभे राहिले, जमीनजुमला कमावला तो दत्तोबा काहीच म्हणत  नाही. काम केल्याशिवाय चतकोर भाकर तो नको म्हणतो. नको एवढी इस्टेट. आपल्या बापानं एवढी इस्टेट कमावली. त्याबरोबर थोडी माणुसकीही कमवायला हवी होती. माणुसकी ही काही बाजारात मिळत नाही. नाही तर आपल्या वडिलांनी तीही खरेदी केली असती अन् गाठोड्यात बांधून ठेवली असती
 
‘सरकार, आयती भाकर माला कायी गोड लागनार न्हायी. माझ्या गळ्याच्या खाली घास कायी उतरायचा न्हायी. माला चतकोर भाकरीपुरतं काम तेवढं सांगा!’’ 
 ‘‘नाना, चला मी तुम्हाला जेवायला वाढतो!’’
 ‘‘न्हायी छोटं सरकार, काम केल्याबिगर कसं खायचं? ते काही माझ्या मनाला पटत न्हायी!’’ 
सुनीलला ठाऊक होतं, की दत्तोबा फार स्वाभिमानी आहे. तो ऐकायचाच नाही. काम केल्याशिवाय तो भाकरीला काही केल्या शिवणार नाही. त्याच्यापुढे पेच उभा राहिला, की दत्तोबाला काय काम सांगायचं? ज्याला तांब्या भरून पाणी घ्यायला कोण प्रयास करावे लागतात! सुनील असा विचार करत असतानाच दत्तोबाने सुनीलच्या चपला हातात घेऊन पॉलिश करायला सुरुवात केली. सुनीलने ते पाहिलं अन् धावला. त्याने चपला दत्तोबाच्या हातून काढून घेतल्या.
‘‘नानाऽऽ काय हये तुम्ही मला माझ्या वडिलांच्या जागेवर आहात! अन् माझ्या चप्पला हातात घेतल्या!’’
मात्र दुसऱ्याच क्षणाला सुनीलला वाटलं, की आपण दत्तोबाची भाकर हिसकावून घेतली.. 
तो वडिलांचं जेवणाचं ताट घेऊन पायऱ्या चढून वरती त्यांच्या खोलीकडे आला, तर ते बेफाम चिडले होते.
‘‘अरे भाकरीवाचून मारता का बापाला सुक्कळीच्यायवोऽऽ यवढी इस्टीट कमवली; पण तुमाला हाये का त्याचं कायी? तुमीच उपाशी मारून ऱ्हायले बापाला!’’
आपला बाप अन् दत्तोबा एकाच वयाचे. खरं तर आपल्या वडिलांनी पुढारकीच जास्त केली. दत्तोबा मात्र बैलासारखा राबला म्हणून हे सगळं उभं राहिलं. वडिलांचा अवमान करायचा माझा हेतू नाही. आपण त्यांची नितनेम सेवा करतोय. कशात कसूर होऊ दिली नाही. वेळच्या वेळी सगळी अस्तवार केली. आज जरा मळ्यात लावणीचं काम आलं. घरातल्या बायाही मळ्यात गेल्या, त्यामुळे झालं थोडं मागेपुढे.
‘‘दादा, आज जरा उशीर झाला!’’
‘‘झालाच का? मी म्हण्तो! म्या कमावलंय हे सारं!’’
‘‘चूक झाली दादा! पण इथून पुढे असं कायी होणार नाही. एवढ्या वेळ माफ करा!’’ 
‘‘वरतोंड करून माफ कर म्हंतो. बापाला उपाशी मारून. सगळं दान करून टाकीन. कवडी उरू द्यायचो न्हायी तुमाला! मग बसा गावोगाव भिक मागत!’’
आता मात्र सुनीललाही राग आला होता. त्याला म्हणावंसं वाटलं, की टाका दान करून. म्हणजे मला परत परत ऐकावं लागणार नाही. ज्याच्या जिवावर मळेतळे उभे राहिले, जमीनजुमला कमावला तो दत्तोबा काहीच म्हणत  नाही. काम केल्याशिवाय चतकोर भाकर तो नको म्हणतो. नको एवढी इस्टेट. माणसाला नं पोटापुरतंच हवं! आपल्या बापानं एवढी इस्टेट कमावली. त्याबरोबर थोडी माणुसकीही कमवायला हवी होती. माणुसकी ही काही बाजारात मिळत नाही. नाहीतर आपल्या वडिलांनी तीही खरेदी केली असती अन् गाठोड्यात बांधून ठेवली असती. सुनीलने जेवणाचं ताट वडिलांच्या समोर ठेवलं. 
‘‘भिकारी समजलास का मला भडव्याऽऽ’’ असं म्हणत रावसाहेबांनी रागानं भरलं ताट लाथाळून दिलं. दत्तोबा पायरीच्या कोपऱ्याला ओट्यावर बसलेला होता. ते ताट त्याच्या पुढ्यात सरकत आलं. दत्तोबानं त्या ताटाचं दर्शन घेतलं. अन् म्हणाला,
‘‘मोठं सरकार, काम्हून अन्नाला लाथ मारली? अन्नाचा कशाला अवमान करायचा?’’
‘‘हे भिकारड्याऽऽ तूच खा! न्हायीतरी माझ्या दाराशी कुत्र्यावानी पडला हायेसच! जगात तुला हाये तरी को?! इडंच कुटके मोडत बसशील!’’
 सुनीलला वडिलांचा राग आला. दत्तोबाची यात काय चूक होती. त्यांचा असा पाणउतारा करायला नको होता. तो वडिलांना काही म्हणणार तोच दत्तोबानं ताट उचललं. सुनीलला आनंद झाला, की आता तरी त्याच्या पोटात अन्न जाईल. वडिलानी केलेल्या अपमानापेक्षा ही गोष्ट फार मोठी अन् आनंदाची होती. मात्र दत्तोबानं ताट गाईपुढं ठेवलं अन् तो त्याच्या खोलीत जाऊन बसला. सुनील मनातच म्हणाला. माणसानं एवढंही नम्र नसावं! मानी आहे बिचारा. आपल्या बापानं त्याचं लग्न लावून दिलं असतं; तर तो त्याच्या घरी सन्मानानं राहात असता. लेकाराबाळांचा धनी झाला असता. आपल्या वडिलांनी स्वार्थापोटी त्याला अविवाहितच ठेवलं. काय तर म्हणे पोराबाळांत लक्ष पांगलं तर शेतीकडे दुर्लक्ष होईल. हे वडिलांचं प्रचंड स्वार्थी धोरण. त्याचा बळी दत्तोबा. खरंच आपल्या दारच्या ढंगर बैलात अन् दत्तोबात काय फरक उरलाय? याच दत्तोबानं आपला जीव वाचवला. नाहीतर आपण आज या जगात नसतोही. मी चार-सहा महिन्यांचा होतो तेव्हाची गोष्ट. आईनं सांगितलेला तो प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा उभा राहिला.
‘‘सुनील लेका, काय सांगू तुला. अशी यळ वैऱ्यावं यायला नको. तू असा फणाफणा तापलेला. माला कायी सुचेना. म्या तुला उचललं अन् दत्तूभावजीच्या दाराशी जाऊन उभी ऱ्हायले!’’
‘‘काय झालं वैनीसायब?’’
‘‘दत्तूभावजी, अहो हे पोर लई लई फणाफणा तापलं. माला त काय करावं समजेना बायी! मी त सूद हरले!’’ 
‘सरकार कुठं गेलं वैनीसायब?’’ 
‘‘त्यायला आजच जत्रा सुचली! गेलंत तमाशाला!’’
‘‘आपल्या त बैलगाडीचं यक चाकबी मोडलंय!’’
‘‘जीप घेऊन गेलेत ह्ये, माज्या त मनात काय काय येऊन ऱ्हायलंय!’’
‘‘वैनीसायब तुमी बिनघोर ऱ्हावा. म्या घेऊन जातो छोट्या सरकारला. माझ्या पाठगुळी द्या बांधून त्याला!’’ 
‘‘भावजी दहा मैलय दवाखाना! पाय ऱ्हातील का?’’
‘‘तुमी नका काळजी करू! धाकल्या सरकारच्या जीवापरी पाय मोठे न्हायी!’’
‘‘सुनील लेका, माझा त रातभर डोळ्याला डोळा न्हायी. सारा जीव तुझ्यापाशी गुंतला व्हता. काय नं काय मनात यायलं लागलं. तुझ्या दादाची वाट पात व्हते सारखी की तमाशा संपला, की येतील अन् तवताक रातीच्या राती यायचं दवाखान्यात; पण तुढे दादा कायी राती आले न्हायी! सकाळी दहाच्या वख्ताला आले. लगेच निंगालो, तुला पाहण्यासाठी दवाखान्यात. आईचा जीव लई वायीट. डॉक्टर म्हण्ले बरं झालं वेळेवं आणलं. न्हायी त पोर वाचलं नसतं. तुला यमाच्या दारातून आणलंय लेकरा या दत्तोबानं, त्यायला आपल्या घरचा गडी समजून अंतर देऊ नको.’’ 
आईची भाषा ही अशी पोटातून आलेली. कसं अंतर द्यायचं आपण दत्तोबाला? ज्याच्याकडून आपला जीव जर आपल्या आईवडिलांनी उधार घेतलाय. उलट त्याचं कर्ज आपल्या वडिलांवर आहे. जे त्यानं कधीच फेडता येणार नाही. 
सुनील अन् त्याची बायको, रातच्याला सर्वांची जेवण झाल्यावर दत्तोबाला जेवणाचं ताट घेऊन गेले. त्या ताटातला अन्नाचा एक घास उचलण्यासाठी दत्तोबा जिवंत थोडाच राहिला होता. तो जग सोडून गेला होता. कुत्र्यासारखं दुसऱ्याच्या दाराशी पडून राहण्यापेक्षा त्याला मरण जास्त सन्मानाचं वाटलं असावं. सुनील ओक्साबोक्सी रडला. आपण उपाशी मारलं या माणसाला. दुपारी भाकरीसाठी आपल्या चपलेला पॉलिश करत होता. आपण करून द्यायला पाहिजे होती. त्याच्या बायकोच्याही डोळ्यांत पाणी होतं; पण तिनं सावरलं सुनीलला.
सुनीलनंच दत्तोबाचे अंत्यसंस्कार केले. त्याचा मुलगा होऊन अग्निडाग दिला. दशक्रियेच्या दिवशी पिंडाला कावळा शिवेना. सुनीलनं ज्या चपला नाइलाजास्तव दत्तोबाकडून हिसकावल्या होत्या. त्या हातात घेऊन सुनील पिंडाजवळ गेला अन् लगोलग कावळा पिंडाला शिवला खरा; पण सुनीलला खूप वाईट वाटलं; की आपण दत्तोबाचा मुलगा नाही होऊ शकलो. त्याला कावळ्याचा बेफाम राग आला. मेल्यानंतरही ज्याच्यामुळे आपल्याला दत्तोबा काम सांगावं लागलं. त्यानं दगड उचलून रागानं कावळ्याच्या दिशेनं भिरकावला.
 ही कथा वाचल्यावर तुम्हाला वाटंल, की पिंडाला कावळा शिवणं ही अंधश्रद्धा आहे; पण एवढंही आठवायला काय हरकतय, की आपण रक्ताचं नातं सोडून एवढा जीव कुणाला लावला का? कावळ्याचं काय! तो शिवलाही न शिवलाही म्हणून मेलेला माणूस काही उठून बसत नाही... 

लेखकाचा संपर्क : ८८३००३८३६३

बातम्या आणखी आहेत...