आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रोफेसरचा बाप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ऐश्वर्य पाटेकर  

बसस्टँडवर गावाकडे जाणारी गाडी लागलीच होती. सुदाम गाडीत शिरला. तसा राणूही गाडीत शिरू लागला. गर्दी एवढी की कसाबसा त्यानं एक पाय गाडीच्या पायरीवर टेकवला, एक पाय अधांतरीच लोंबकळत होता ..सकाळी ह्याच शहरात पाऊल ठेवलं तेव्हा तो प्रोफेसरचा बाप होता. आता ह्या शहरातून पाऊल उचलताना तो प्रोफेसरचा बाप राहिला नव्हता. तो शहराने हिसकावून घेतला होता...
प्रोफेसरचा बाप कळण्यासाठी त्यास कुठला एक युनिफॉर्म डिक्लेअर केलेला नसतो, म्हणून आपण पाहताक्षणी ओळखू शकत नाही की हा प्रोफेसरचा बाप आहे. माझ्या गोष्टीतला राणूही अगदी तुमच्या जवळ येऊन उभा राहिला तरी तुम्हाला कळणार नाही की तो प्रोफेसरचा बाप आहे! त्याचीच ही गोष्ट.. 
“सीता आवर की पटकशी! जसं तुह्या गुणाच्या लेकाला सारं गावच बांधून देणारंय गाठुड्यात!”
“अवो माह्या भानाला करंज्या लई आवडत्या!”
“तुहा लेक करंज्यायला गेल्या गेल्या बिलगणारचंय!”
“बिलगलच पात ऱ्हा तुमी!”
राणूनं हातात पिशवी घेतली. करंज्यांचं गाठोडं व्यवस्थित ठेवलं. सुदामचंही नाशकात काही काम होतं. तोही बरोबर निघाला. राणू आता चऱ्हाट वळणारा राणू मातंग राहिला नव्हता. तो प्रोफेसरचा बाप झाला होता. ही ओळख त्याला त्याच्या लेकानं, म्हणजे भानानं दिली होती. राणूनं आयुष्यभर चऱ्हाटं वळली. बाजारात नेऊन विकली. चऱ्हाटाला पिळा बसावा तसा राणूच्या काळजाला आतापर्यंत किती पीळ बसत गेले; हे त्याच्या जिवाला ठाऊक. 
तो दिवस त्याला अजूनही जसाच तसा चित्र काढून ठेवल्यासारखा आठवतोय. जेव्हा भानाला शाळेत घालायचं ठरवलं होतं. रस्त्यातच त्याला खवचट महादू पाटील भेटला. 
“काय रे राणू लेकाला शाळेत घाल्तो का काय गड्या?”
“हा पाटील!”
“मग चऱ्हाटं काय वाण्या-बामणाच्या पोरांनी वळायची?”
“पोराचं डोकं शाळेत चाल्तय त म्हन्ल शिकू देऊ. त्याला बी हौस हाये!”
“तो मोप बॅरिस्टर व्हऊन, त्याच्या कातड्याचे जोडेच तुह्या पायात घालणारय!”
“नका का घालीना; पर महा पोर बॅरिस्टर त व्हइल न!”
“च्यायला पोरगं अजून चड्डीतच मुततंय त झालं बी बॅरिस्टर.” 
हे सगळं आठवल्यावर राणूला हसू आलं. लोक म्हणतात दिवसांवर आपली मर्जी चालत नाही. मी मात्र मर्जीने आजचा दिवस उगवून आणला. असे काही राणूला वाटून गेले. 
“अय तात्या, नाशिक आलं नं भो, का गाडीतच बसून ऱ्हातो!”
“गाडीत बसून ऱ्हायला यडाय का म्या, माह्या भानाचं गाव आलंय!”
राणू गाडीतून उतरतो. पिशवी सुदामच्या हातात देतो. भक्तिभावनेने मातीवर डोकं टेकवतो. तिचं दर्शन घेतो. लोक त्याच्याकडे विस्मयाने पाहत होते,
“कायरे ह्ये तात्या!”
“सुदामा आता हीच कर्मभूमी. ह्याच मातीवर शेवटचा श्वास घ्यायचा.”
“म्हंजे तात्या तू आप्लं गाव सोडणार!”
“अरे भाना का आता आमाला तिड ऱ्हावू देईल का?”    
हा संवाद त्यांचा चालूच राहिला असता; मात्र भानाचं कॉलेज येऊन पोहचलं होतं. राणूला असं झालं होतं की कधी एकदाचा भानाच्या कॉलेजात प्रवेश करतो अन् त्यास भानाला डोळे भरून पाहतो. गेटच्या आत  पाऊल टाकणार, तोच गेटवरच्या सिक्युरिटीने त्यास हटकवलं,
“ह्ये बाबा मधी कुठं निघाला?”
“माहा पोरगा इडं प्रोपेसरय!”
    सिक्युरिटी त्याच्याकडे संशयाने पाहू लागला, तेव्हा सुदाम म्हणाला,
“सर, प्रोपेसर भानुदास खैरनाराचे ह्ये वडील हायेत!”
“आसं होय! काका स्वारी मी तुम्हाला ओळखलं नाही. खरंच मला माफ करा!”
“आसुद्या तुमची कायीबी चूक न्हायी, कपाळावर थोडंच लिव्हलेलं असतं!”
“चला मी सोडतो तुम्हाला!” सिक्युरिटी सॅल्युट मारत म्हणाला.
“कशाला तसदी घेऊन ऱ्हायला! आमाला फकस्त दावा जातो आमी!”
“अवो माझी ड्यूटी आहे ती.”
तेवढ्यात गेटवर दुसरी गाडी आली. 
“जावा तुमी. आमी हुडकतो बरुबर!”
राणू कॉलेजच्या पायऱ्या चढला. पोर्चमधल्या फर्चीवरून चालू लागला. चालता चालता मीटिंग हॉलजवळ थबकला. काचेची भिंत असल्यामुळे त्याला भाना दिसला. ‘ही’ भारीतली खुर्ची. राजाच्या सिंहासनाची बरोबरी करणारी. त्यावर एखाद्या राजासारखाच भाना ऐटीत बसला होता. बाकी लोकही भारीच होते. मात्र ते सारे राजासमोर प्रजेनं बसावं तसे बसलेले होते. भाना हातवारे करत त्यांना काही सांगत होता. हे पाहून राणूचं काळीज सुपाएवढं झालं. आपला पोरगा तर खूप मोठा साहेब झाला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू वाहू लागले. त्याच्यातला प्रोफेसरचा बाप कॉलेजचं छप्पर भेदून आभाळाला भिडला. त्यानं धाडकन दरवाजा लोटला. आत गेला. सगळे अवाक् होऊन त्याच्याकडे पाहू लागले. भानानं बापाला पाहिलं. तो गडबडला. तरी त्याने प्रसंगावधान राखलं. एक प्राध्यापक म्हणाला, 
“कोणी सोडलं रे याला आतमध्ये?  हे प्यून कुठे मेले कुणास ठाऊक!”
प्राध्यापकांत चुळबुळ सुरू झाली. 
“अरे कोणंय हा म्हातारा?”
“म्या भानाचा...” भानानं बापाला पुढे बोलू न देता सांगितलं,
“ही इज माय सर्वंट!”
“ओ आय सी!”
“हा हा म्या याचा सर्वंट!” राणू भाबडेपणाने म्हणाला.
भाना बापाला खेचतच बाहेर घेऊन येतो. अन् म्हणतो,
“दादा, तू निरोप न धाडता कसा काय आलास?”
“आरं पोराला भेटायला का कुडं निरोप धाडला जातो का?”
भानानं खिशातून दोन हजाराची नोट काढली. राणूच्या हातात कोंबली. अन् चिडचिड करत म्हणाला,
“दादा तू जा बरं! म्या येतोच उद्याच्याला गावाकडं!”
“आर पण..!”
“मला एक मिनटाचा वेळ नाही. जरा महत्त्वाची मीटिंगय!”
“आरं तुझ्या मीटिंगला न्हायी खोळंबा करनार म्या! पण कायी बोलशील का न्हायी!”
“तेच तर सांगतोय जराही वेळ नाही!”
“बरं बाबा पण ह्या करंज्या त ठेवशील!” असं म्हणत फडकं सोडायला लागला.
नको नको दादा त्याबी घेऊन जाय!”
“आरं आसंकसं! तुज्याईने लई प्रेमाने दिल्या!”
नाही म्हणतो नं दादा! सुदाम जारे घेऊन याला. मी येतो उद्या!”  
असं म्हणत केबिनचा दरवाजा लोटून मधेही निघून गेला. त्याची मीटिंग सुरु झाली असावी. इकडे राणू अन सुदामही निघाले. 
“पाहिलं का सुदामा, भानाला उलीसा बी यळ न्हायी. याला म्हन्त्यात काम!” 
खरं तर सुदामला भानाचा खूप राग आला होता. तो आतल्या आत कसाबसा गिळत चालला होता. आता मात्र त्याला राणूच्या भाबड्या स्वभावाचा सुद्धा राग आला. माणसानं भाबडं असावं पण इतकंही असू नये. त्यास राणूची कीव आली होती. त्याला कवटाळून रडावंसं वाटत होतं. 
“काय त्याचा थाट! भाना वाटतंच न्हवता. दुसराच कुणीतरी!” 
आता मात्र हद्द झाली अन् सुदामाचा राग उफाळून आला. 
“हा तात्या भाना न्हायी ऱ्हाईला, तो दुसराच कुणीतरी व्हता. म्हनून तर त्यानं तुला सर्वंट केलं येड्या सर्वंट!”
“हायेच म्या सर्वंट. काय विंग्रजी झोडत व्हता. अशी फाडफाड!”
“तात्या यवढा कसा रं खुळा, आरं यड्या सर्वंट म्हण्जे घरगडी!” 
राणूच्या हातातलं करंज्याचं गाठोडं गळून पडलं. करंज्या रस्त्याभर झाल्या. त्याच्या काळजात धरणीकंप झाला. तो डोकं धरून खालीच बसला. एवढ्यात कॉलेजची बेल झाली. पोरांचा लोंढा बाहेर पडला. करंज्या पोरांच्या पायाखाली तुडवल्या गेल्या. त्याचं मन आक्रंदून उठलं होतं. त्याला मोठ्याने आरंदळून ओक्साबोक्शी रडावसं वाटत होतं. भानाच्या शाळेच्या पहिल्या दिवसापासून ती सारीच दृश्ये त्याच्या डोळ्यासमोर सरकत होती? काय माहीत कसं ? पण त्यानं स्वत:ला सावरलं. दोन हजार रुपयांच्या नोटांची चुरगळी करून तिथेच टाकून दिली; फडकं तेवढं उचललं.. बसस्टँडवर आला. गावाकडे जाणारी गाडी लागलीच होती. सुदाम गाडीत शिरला. तसा राणूही गाडीत शिरू लागला. गर्दी एवढी की कसाबसा त्यानं एक पाय गाडीच्या पायरीवर टेकवला, एक पाय अधांतरीच लोंबकळत होता ..सकाळी ह्याच शहरात पाऊल ठेवलं तेव्हा तो प्रोफेसरचा बाप होता. आता ह्या शहरातून पाऊल उचलताना तो प्रोफेसरचा बाप राहिला नव्हता. तो शहराने हिसकावून घेतला होता... प्रोफेसरच्या बापाचे मनावर चढवलेले केवढे तरी कपडे होते. ते त्याने इथेच उतरवून ठेवले अन् नागव्या मनाने गावाकडे निघून गेला. असंही तुम्ही म्हणू शकता..!
 लेखकाचा संपर्क : ८८३००३८३६३