आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठा लेण्यांचे ज्येष्ठ अभ्यासक वॉल्टर एम. स्पिंक यांचे निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : अजिंठा लेण्यांसंदर्भात संशोधन करून लेखनाद्वारे भारतीय कला आणि वास्तुशिल्पकलेतील अजोड कलाकृती असलेल्या अजिंठा लेण्यांची जगभराला ओळख करून देणारे ज्येष्ठ अभ्यासक वॉल्टर एम. स्पिंक (वय ९१) यांचे अमेरिकेमध्ये नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

हार्वर्ड विद्यापीठातून पदवी संपादन केल्यानंतर स्पिंक १९५४ मध्ये पहिल्यांदा भारतामध्ये आले. वॉल्टर यांनी या लेण्यांचे शास्त्रशुद्ध संशोधन केले. ऐतिहासिक साधने आणि भौतिक पुराव्यांच्या आधारे कला आणि वास्तुशिल्पकला या विषयांमध्ये अजिंठा लेण्यांचे योगदान यासंबंधी 'अजिंठा : हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट' या ग्रंथाच्या सात खंडांचे लेखन केले. या वयातही आठव्या खंडाच्या लेखनाचे काम करण्यामध्ये स्पिंक व्यग्र होते. त्यांच्या या खंडांचा मराठी आणि हिंदी अनुवाद करण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे वॉल्टर स्पिंक यांच्या अजिंठा लेण्यांच्या आकलनावर आयआयटी पवईतर्फे पाच लघुपटांच्या निर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे. आपल्या संग्रहातील वस्तू आणि मूर्ती त्यांनी प्रिन्स ऑफ वेल्स आणि बनारस संग्रहालय येथे दिल्या होत्या. गेल्या ३५ वर्षांपासून ते दरवर्षी पावसाळ्यात आणि जानेवारीत अजिंठ्याजवळील फर्दापूर गावामध्ये वास्तव्य करत असत, अशी माहिती अभ्यासक सायली पलांडे-दातार यांनी दिली.

वयाच्या १८ व्या वर्षी लेणी घडवल्याचा सिद्धांत


वाकाटक राजवटीत अजिंठा लेणी ही सम्राट हरिसेन यांच्या कालखंडात साकारली गेली आहेत, असे सांगणाऱ्या स्पिंक यांनी अवघ्या १८ वर्षांत ही लेणी घडवली असल्याचा सिद्धांत मांडला होता. वाकाटक राजवटीचा उत्कर्ष आणि ऱ्हास कसा झाला याची वस्तुनिष्ठ मांडणी त्यांनी केली होती. 'अजिंठा : द एंड ऑफ द गोल्डन एज', 'अजिंठा : ए ब्रीफ हिस्ट्री अँड गाइड' आणि 'कृष्णा : डिव्हाइन लव्हर' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...