आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तान्हाजींची गौरवगाथा हिंदीसोबत आता मराठीतही... या दिवशी मराठीत प्रदर्शित होणार ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः शूरवीर मराठा योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या दिमाखदार जीवनाची छाप भारतीय इतिहासावर आजही कायम असून आता मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे! दृश्यात्मक रोमांचाने परिपूर्ण असलेला 'तान्हाजी: द अनसंग वॉरीयर' हा चित्रपट हिंदीसह मराठी वर्जनमध्ये प्रदर्शित होत असून संपूर्ण महाराष्ट्रात 10 जानेवारी 2020 रोजी चित्रपटगृहांत झळकणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटवर एक पोस्ट करत 'तान्हाजी' हा चित्रपट मराठीत प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. 

तरण आदर्श यांनी ट्विटवर एक पोस्ट करत ‘तान्हाजी’ हा चित्रपट पुढील वर्षी 10 जानेवारी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे. तर त्याचा ट्रेलर 10 डिसेंबर 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.  एक महान कथा मोठ्या पटावर उलगडण्यात आल्याने त्यातून मिळणारा अनुभव हा अद्भुत असेल. शिवाय महाराष्ट्रात हा चित्रपट मराठी भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहे.याविषयी अधिक माहिती देताना अजय देवगन म्हणाला की, “एका शूर मराठा योद्ध्याची कथा हिंदी  भाषेसह त्याच्या मातृभाषेत प्रेक्षकांसोबत शेअर करता येणार आहे, हे मी माझे भाग्यच समजतो. ज्या पद्धतीने संपूर्ण देशासमोर इतिहासाची पाने उलगडणार आहेत, त्याच दिमाखदार प्रवासाची अनुभूती समस्त महाराष्ट्राने घ्यावी असे मला वाटते.”  मराठी आवृत्तीविषयी बोलताना काजोल म्हणाली की, “मला ही महाराष्ट्रीय व्यक्तिरेखा निभावणे प्रचंड भावले. मी आजीच्या, पणजीच्या मायेखाली लहानाची मोठी झाले. मी त्यांना पाहायचे. मी माझा स्वत:चा भूतकाळ जगले असे वाटते. मी माझ्या आईच्या साड्या नेसून बालपणीचा खेळ खेळतेय असेच वाटले. जणू मी सिनेमात माझ्या आईचीच भूमिका वठवतेय अशी धारणा झाली. मी प्रचंड प्रेमात पडले. मला संधी मिळाली तर मी रेड कार्पेटवर देखील नऊवारी साडी नेसून जाईन! हा पेहराव परिधान न करणे म्हणजे सेक्सीपणाचा कहर म्हणावा लागेल. साडीत स्वत:ची अशी एक देहबोली (बॉडी लॅग्वेज) तयार होते. साडीत बाईपण खुलून येते. सावित्री ही व्यक्तिरेखा कणखर आणि अफलातून आहे. माझ्यात तिच्यातले करारीपण चपखल उतरले. मी अत्यंत प्रतिकूल स्थितीतल्या तिच्या रुबाबाच्या प्रेमात आहे." याविषयी बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत म्हणाले,''ग्लोबली हा चित्रपट पोहोचावा म्हणून हा चित्रपट केवळ हिंदीत प्रदर्शित करण्याचा माझा मानस होता. पण मराठीत चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय अजय देवगणचा आहे. त्यांच्या मते, हा चित्रपट प्रत्येक मराठी घरापर्यंत पोहोचायला हवा.'' या चित्रपटात अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांच्यासह मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी काम केले आहे. शरद केळकर (छत्रपती शिवाजी महाराज), देवदत्त नागे (सुर्याजी मालुसरे) आणि शशांक शेंडे (शेलार मामा) हे मराठी कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटात शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगण्यात येणार आहे अजय देवगणच्या करिअरमधील हा 100 वा चित्रपट आहे.