आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवार कुटुंबाच्या सत्तासंघर्षातील 'अजित' हट्ट; बंड करून मिळवला 'राजमार्ग'!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : पवार कुटुंबातील संघर्ष हा विषय राज्याच्या राजकारणाला नवीन नाही, परंतु शुक्रवारी मध्यरात्री भाजपशी हातमिळवणी करून पहाटे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतल्याची घटना पवार कुटुंबातील सत्तासंघर्षाचे शिखर ठरले आहे. या प्रत्येक सत्तासंघर्षात अजित पवार यांचे ना'राजी' नाट्य हा समान धागा राहिला होता.

या वेळीही अजित पवार हेच या कुटुंब कलहाचे केंद्रबिंदू बनले आहेत. परंतु या वेळी त्यातून निर्माण झालेली कोंडी पवार कुटुंब किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापुरती सीमित न राहता यात तीन पक्षांची परवड झाल्याचे दिसते. यापूर्वी अजित पवारांच्या 'नाराजी'नाट्यापुढे पवार यांनी नरमाईची भूमिका घेतली होती, परंतु रोहित पवार यांच्या माध्यमातून आधाराची भक्कम पाती हाताशी आल्यावर माेठ्या पवारांनी अजितदादांच्या नाराजीकडे दुर्लक्ष सुरू केले. सप्टेंबरमधील तडकाफडकी राजीनामा देऊन पवारांच्या 'ईडी' लढाईतील हवा काढून घेतल्यावरही ते अजित पवारांची पाठराखण करीत राहिले. परंतु लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे, सध्याच्या सत्तास्थापनेत उद्धव ठाकरे या दाेन भावांना काकांनी जवळ करायला सुरुवात केल्यावर अजितदादा मात्र त्यांच्यापासून दुरावत गेले.

ताई विरुद्ध दादा


सुप्रिया सुळे राजकारणात सक्रिय झाल्यावर पवारांचे वारसदार समजल्या गेलेल्या अजित पवारांनी पहिल्यांदा कुरबुर सुरू केली. त्या वेळी सुळे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकारणात आणि अजितदादा राजकारणात अशी विभागणी झाली होती. पुढे सुळे खासदार झाल्यावर पुन्हा 'दादा विरुद्ध ताई' असा वाद वारंवार उपस्थित होऊ लागला. त्यावर 'दादा राज्यात आणि मी दिल्लीत' अशी स्पष्टीकरणे देत सुळे यांनी 'दादा'गिरीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला.

आबा विरुद्ध दादा


२०१३ च्या आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांना उपमुख्यमंत्रिपद दिल्याने अजित पवार यांचे नाराजीनाट्य झाले होते. त्या वेळी फोन बंद करून ते अज्ञातस्थळी रवाना झाले होते. फक्त आर. आर. पाटीलच नव्हे, तर जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ या नेत्यांसोबतही अजित पवार यांचा कायम संघर्ष झाला आहे.

पार्थ विरुद्ध रोहित


लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील हा सत्ता संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला. पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याच्या उमेदवारीसाठीच्या अजित पवारांच्या हट्टासाठी शरद पवारांवर माढ्यातील स्वत:ची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की ओढवली होती. त्या वेळी दुसरे नातू रोहित पवार यांनी प्रथमच फेसबुक पोस्टद्वारे पवारांची बाजू घेतल्याने हा वाद जाहीर झाला.

सप्टेंबरमधील राजीनामा


ईडीच्या कार्यालयात स्वत:हून हजर होत भाजपने खेळलेली खेळी नाकाम करून प्रकाशझोतात राहिलेल्या शरद पवार यांनी सप्टेंबरमध्ये त्याच दिवशी अडचणीत आणले ते अजित पवार यांच्या राजीनाम्याने. ईडीची लढाई यशस्वी करून पवार पुण्यात आले असता अजित पवारांच्या राजीनाम्याची आपल्याला कल्पना नाही, आपल्याशी चर्चा झाली नाही, असे सांगत पवारांना तोंडघशी पाडण्याची वेळ अजित पवारांनी आणली होती.
 

बातम्या आणखी आहेत...