आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेमुळे चिकटायला आलेल्यांना जवळ करू नका, दोन वर्षे थांबवा; अजित पवारांच्या सूचना

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • गयारामांच्या अनुभवामुळे अजित पवारांचा सल्ला

मुंबई- गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या काही नेत्यांनी भाजप व शिवसेनेची वाट धरली होती. त्या गयारामांवर राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सडकून टीका केली. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाचे किमान ६० नगरसेवक निवडून आणण्याचा निश्चय पक्षाने केला.


मुंबईतील सोमय्या मैदानावर ‘मिशन मुंबई २०२२’ या शिबिराचे आज आयोजन केले होते. पवार म्हणाले, ‘सत्ता असताना पक्षात हवशे- नवशे येतात. सचिन अहिर, प्रसाद लाड, चित्रा वाघ, संजय पाटील यांना सगळे दिले. तरी ते निघून गेले. आता आपले सरकार आले म्हणून काहीजण चिकटायला येतील. त्यांना जवळ करू नका. अशा लोकांना दोन वर्षे थांबवा, अशा सूचना त्यांनी दिल्या. काम करताना तुमच्याजवळ असलेल्या पदाचा उपयोग करा. पक्षाची आणि पवार साहेबांची बदनामी होऊ देऊ नका’, अशी सूचना पवार यांनी नेत्यांना दिल्या.
आम्ही शपथ घेऊन बरोबर २ महिने झाले. भाजपने अनेक  चुकीचे निर्णय घेतले होते, ते पूर्ववत करत आहोत. आपण कोणतीही विकासकामे थांबवली नाहीत. कुठेतरी पाणी मुरतेय असे वाटतेय तिथे आपण कामे थांबवली आहेत’, असे पवार म्हणाले. 


राष्ट्रवादी ग्रामीण भागात नाळ जोडलेला पक्ष आहे. मात्र, शहरात राहणाऱ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यास आपण कमी पडतोय, असे माजी खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. 

मुंबई महापालिकेत ६० नगरसेवक निवडून आणा

‘शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेलासोबत घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. शिवसेना मुंबई महापालिकामध्ये एक नंबरचा पक्ष आहे. त्यांनी एक नंबरवरच राहावे, पण राष्ट्रवादी दोन नंबरवर असायलाच हवी’, असा दमही पवार यांनी मुंबईतल्या नेत्यांना दिला. मुंबईत पक्षाचे केवळ ८ नगरसेवक आहेत.
आगामी निवडणुकीत ५० ते ६० जागांवर विजय मिळाला पाहिजे. 

पाच हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती


सोमय्या मैदानावरील शिबिराला सुमारे ५ हजारपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची हजेरी होती. खासदार सुनिल तटकरे, आमदार किरण पावसकर, मुंबई अध्यक्ष आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, पत्रकार संजय मिस्कीन व अमेय तिरोडकर यांनी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...