आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या पहाटेच्या वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथेवर दोघांनीही अळीमिळी गुपचिळी घेतल्याने गुरुवारी विधानसभेत पुढे चर्चा झाली नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबतचा मुद्दा उपस्थित करताना या शपथविधीची आठवण करून दिली होती.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चंद्रकांत पाटील यांनी स्थगनच्या द्वारे मांडण्याचा प्रयत्न केला परंतु अध्यक्ष नाना पटोले यांनी तो नाकारला असल्याचे सांगितले. तेव्हा हा महत्वाचा मुद्दा असल्याने बोलण्याची परवानगी मागत चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा समाजाचे लोक गेल्या अने दिवसांपासून आझाद मैदान येथे आंदोलनाला बसले आहेत. काही जणांची प्रकृती बिघडली आहे. या मुलांची सेवा कायम ठेवावी अशी त्यांची मागणी आहे. परंतु त्यात अजून मार्ग निघालेला नाही. अजित पवार ऑन द स्पॉट निर्णय घेतात. जसा त्यांनी रात्री निर्णय घेतला आणि सकाळी शपथविधी झाला असा उल्लेखही चंद्रकातंत पाटील यांनी केला.
यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ज्यांना नोकरी मिळाली त्यांचा आणि ज्यांना नोकरी नाही त्यांचा असे वेगळे मुद्दे आहेत. दोन-तीन दिवसात मराठा आंदोलकांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे सांगून.अजित पवार पुढे म्हणाले, चंद्रकांतदादा तुम्ही म्हणाला रात्री निर्णय घेतला आणि सकाळी शपथ… मात्र ते पुढे काही बोलणार तेवढ्यात देवेंद्र फडणवीस यांनी खाली बसूनच अजित पवार यांच्याकडे पाहून तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही बोलू नका, मीही बोलत नाही असे म्हटले. त्यावर अजित पवार यांनी फडणवीस सांगत आहेत म्हणून मी यावर बोलत नाही असे म्हटले. आणि दोघांचे गुपित पुन्हा एकदा गुपितच राहिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.