आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांना अश्रू अनावर: माझ्यामुळे पवारांची बदनामी होऊ नये म्हणून आमदारकीचा राजीनामा दिला -अजित पवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सहकारी, कार्यकर्त्यांना न सांगता राजीनामा दिल्याबद्दल माफी मागतो
  • शरद पवारांचा शिखर बँक प्रकरणाशी काहीच संबंध नाही -अजित पवार
  • शरद पवारांच्या विषयी खूप आदर, त्यांच्यासमोर मान वर करू शकलो नाही

मुंबई - ज्या बँकेच्या 12 हजार कोटींच्या ठेवी आहेत त्या बँकेत 25 हजार कोटींचा घोटाळा कसा होऊ शकतो. 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार, शरद पवार-अजित पवारांसह 70 जणांची नावे अशा बातम्या प्रसारित झाल्या. हा आकडा आला तरी कुठून? हे सर्व पाहत असताना मी अस्वस्थ झालो. त्यामुळे, माझ्या बुद्धीला पटलं ते केलं. माझ्यामुळे साहेबांना (शरद पवारांना) हे सहन करावे लागते असे मला वाटले. या वयात त्यांना इतकं सहन करावे लागते. हे मला पाहावलं गेलं नाही. असेही अजित पवारांनी म्हटले आहे. हे सर्व बोलत असताना अजित पवारांना आपले अश्रू आवरले नाही.

शरद पवारांबद्दल खूप आदर, त्यांच्यासमोर मान वर करू शकलो नाही
पवारांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. शरद पवारांना न सांगताच आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर आपल्याला भेटण्यासाठी पवार थेट पुण्याहून मुंबईला आले. मी त्यांच्या नजरेला नजर सोडाच त्यांना मान वर करून बोलू शकलो नाही. त्यांनी माझे सर्व काही ऐकून घेतले. यानंतर सांगितले की उद्या मी जो काही आदेश दिला तर तुला ते करावे लागेल. मी त्यांना होकार दिला. शरद पवारांचा शिखर बँक प्रकरणाशी काहीच संबंध नसताना सुरुवातीला त्यांचे नावच कसे घेण्यात आले असा सवाल देखील अजित पवारांनी केला आहे.

शिखर बँक प्रकरणात पवारांचा काहीच संबंध नाही -अजित पवार
शरद पवारांचा शिखर बँकेच्या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. सोबतच मी राजीनामा दिला त्यात माझी चूक होती किंवा नव्हती याचा देखील काहीच संबंध नाही. शरद पवारांची माझ्यामुळे बदनामी होऊ नये. त्यांना या वयात हे सर्व सहन करावे लागू नये म्हणून मी आमदारकीचा राजीनामा दिला असे अजित पवारांनी सांगितले.

सहकारी, कार्यकर्त्यांना न सांगता राजीनामा दिल्याबद्दल माफी मागतो -अजित पवार
मी आपल्या ज्येष्ठांना आणि सहकाऱ्यांना न विचारता राजीनामा दिल्याने अनेकांची मने दुखावली. ज्यावेळी असा प्रसंग येतो तेव्हा मी कुणालाही सांगितले, तेव्हा कुणीही मला राजीनामा देऊ नये असेच सांगितले असते. सहकारी आणि कार्यकर्त्यांची मने दुखावल्याबद्दल मी माफी मागतो असे अजित पवार म्हणाले.

माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद वाय बी चव्हाण सभागृहात घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनीही उपस्थिती लावली. पत्रकार परिषदेची सुरुवात जयंत पाटील यांनी केली. तसेच अजित पवार किती भावूक आहेत हे सांगितले. आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते 19 तास अज्ञातवासात होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ आहे. तत्पूर्वी सिल्व्हर ओक येथे त्यांची शरद पवार, सुप्रिया सुळे आणि श्रीनिवास पवार यांनी भेट घेतली. त्यानंतरच अजित पवार स्वतः या मुद्द्यावर अधिकृत प्रतिक्रिया देतील असे स्पष्ट करण्यात आले.