आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडामुळे अजित पवार यांचा मंत्रिमंडळात जाण्यास नकार! चार दिवसांची सत्ता साेडल्यानंतर पुन्हा पक्षात परतले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शरद पवार यांच्याशी बंड करून भाजपसोबत सत्तेत गेलेले अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन चारच दिवसांत स्वगृही परतले. खरे तर बंड करून स्वगृही परतलेल्याची देहबोली वेगळीच आणि थोडीशी आराेपीसारखी असते. परंतु, बुधवारी राष्ट्रवादीच्या बैठकांत अजित पवार यांची देहबोली अगदी सामान्य नव्हे तर एखाद्या 'विजेत्या'सारखी दिसून आली. राष्ट्रवादीतील सर्व नेते, आमदार त्यांचे मनापासून स्वागत करीत होते. एवढेच नव्हे तर अजित पवार यांना सत्तेत सहभागी करावे, अशी मागणीही नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे केली. असे असले तरी अजित पवार यांनी काही दिवस मंत्रिमंडळात सहभागी न हाेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरण्याची खात्री पटल्यानंतर देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी राजीनामे दिले. या दरम्यान कुटुंबीयांकडून दबाव वाढल्यामुळे अजित पवार पुन्हा पक्षात आल्याचे सांगितले जाते. अजित पवार यांच्यासोबत आजही ३५ ते ४० आमदार असल्याने त्यांचे बंड यशस्वी झाले असते तर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असता, असे मानले जाते. त्यांची हकालपट्टी केली असती तरी पक्षात फूट पडण्याची चिन्हे हाेतीच. म्हणून अजित पवारांसारखा दिग्गज नेताा राष्ट्रवादीला गमवायचा नव्हता. जयंत पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळेंसारख्या दिग्गज नेत्यांनी 'झाले गेले विसरून दादांना पुन्हा पक्षात आणा' अशी गळ शरद पवारांना घातली आणि त्यांनीही ते मान्य करत दादांना पक्षात आणले.

अजित पवार स्वगृही आल्यावर दादांचे महत्त्व कमी झाले असे म्हटले जात होते. परंतु, तसे न होता ते उलट आणखीनच वाढलेले दिसत आहे. बुधवारी पक्षाच्या बैठकीत सहभागी हाेऊन त्यांनी नवनर्वाचित आमदारांना मार्गदर्शन केले. या बैठकीत समर्थक अामदारांनी अजितदादांना सत्तेत मानाचे स्थान द्यावे, अशी मागणीही शरद पवार यांच्याकडे केली. शरद पवार या गोष्टीला तयारही झाले. यामुळे अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी चर्चा हाेती. मात्र, स्वत: अजित पवार यांनीच इतक्यातच महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जयंत पाटील यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड केली जाऊ शकते असे सांगितले जात आहे; परंतु एक गोष्ट नक्की की, राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांच्यानंतर अजित पवार यांचाच शब्द अजूनही अंतिम आहे, आणि आजही अनेक आमदार त्यांच्यासोबत असल्याचेच दिसून येत आहे. पुढील काळात अजित पवार राजकीय वर्तुळात मोठी शक्ती म्हणून समोर येऊ शकतात.

मी कुठे बंड केले, मी पक्षातच : अजित पवार

'झालं ते झालं, आता नव्याने सुरुवात करायची आहे. मी राष्ट्रवादी सोडलेली नव्हती, आजही मी पक्षात आहे. मी नाराज नव्हतो. मी कुठलेही बंड केले नव्हते. पक्षानेही माझी हकालपट्टी केली नव्हती,' असे अजित पवार यांनी माध्यमांशी बाेलताना सांगितले.